गाईसाठी जे अन्न रस्त्यावर असते ते खाणार !
सदर कथा व पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून जर याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
रवी, सर्वसामान्य कुटुंबातील एक होतकरू तरुण. अतिशय कष्ट करून त्याच्या आई-वडिलांनी त्याला शिकवले व मोठे केले आणि त्यामुळे रवी एक सुखी व संपन्न जीवन जगत आहे. लग्न करून संसार सुरु झाला आणि एका मुलाचा बापही झाला. रवी नेहमी शिक्षणावर भर देत आला. नक्कीच फक्त शालेय नाही तर ‘दुनियादारी’चे शिक्षण सुद्धा तेवढच महत्वाचं असून समाजामध्ये वावरताना अनेक गोष्टी असतात ज्यातून शिकत मनुष्याने पुढे जात राहिले पाहिजे असे त्याचे प्रामाणिक मत होते. आजची एकंदरीत परिस्थिती ही नक्कीच सामाजिक बांधिलकीची नाही. घरची मंडळी जी रक्ताच्या नात्यातली असतात ती नेहमीच आपल्या पाठीशी उभी असतात. पण याचबरोबर जिवाभावाची मित्र मंडळी सुद्धा तेवढीच महत्वाची. जोवर सोशल मीडिया जोर धरत नव्हते तोवर मैत्रीची व्याख्या वेगळी होती पण कालांतराने त्यामध्ये बदल होत गेला ज्याचा अनुभव आज प्रत्येकाला येत आहे. सोशल व्यक्तिमत्व आणि खरेखुरे व्यक्तिमत्व यामध्ये खूप फरक आज दिसत आहे. तसेच समाजामध्ये एवढा असंतोष आहे की त्याचा फटका सर्वसामान्य माणसाला जोरात बसत आहे. कष्ट करून पैसे मिळवण्यासाठी आज अनेक तरुण तयार नाहीत. तरुणांना जात-धर्म अशा अनेक गोष्टीमध्ये अडकवून त्यांची दिशाभूल होते आहे. ज्यावेळी गरजा वाढल्या आणि मिळकत काहीच नाही असे चित्र दिसू लागले त्यावेळी चोऱ्या वाढल्या आणि चोऱ्यांमुळे सर्वसामान्य कुटुंबातील अनेक लोकांवर हल्ले सुरु झाले आणि त्यामध्ये अनेकांना मरण सुद्धा आले. बघता-बघता होत्याचे नव्हते होत गेले. एकंदरीत काय तर, आयुष्याची चाल ही पूर्णपणे अनिश्चित होऊन बसली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मुलाला शालेय शिक्षण देत असताना त्याच्या व्यक्तिमत्वाची प्रगती आणि विचार करण्याची क्षमता यावर रवीने भर द्यायला सुरवात केली. असच एक दिवस रवीने आपल्या ९ वर्षाच्या मुलाला असे काही प्रश्न विचारायचे ठरवले जे त्या लहान मुलाला नक्कीच डोंगराएवढे होते. हे प्रश्न मुलाला एवढ्या कोवळ्या वयात विचारणे हे कदाचित काही लोकांना चुकीचे वाटेल आणि काहींना बरोबर. हा मुद्दा महत्वाचा नसून त्या मुलाला हे प्रश्न विचारण्यामागचे कारण महत्वाचे.
रवी: पिल्लू, तुला कशाची भीती वाटते का?
पिल्लू: हो मला अंधाराची भीती वाटते म्हणून रात्री हॉलमध्ये जायचं असेल तर मी तुम्हाला घेऊन जातो.
रवी: चल, हॉल मध्ये जाऊ. (रवी मुलाला हॉल मध्ये घेऊन गेला जिथे अंधार होता आणि हॉलमध्ये तो मुलाबरोबर उभा राहिला … ) पिल्लू बघ, हे आपले घर आहे, दार बंद आहे. खिडक्या बंद आहेत आणि लाईटसुद्धा बंद आहे. म्हणजे इथे कोणीच नाही. जर इथे कोणीच नाही मग नेमकी भीती कशाची? आणि बघ बाळा, अंधारात थोडावेळ उभे रहा. थोड्यावेळाने तुला थोडेफार आजूबाजूचे दिसू लागेल. दिसले का?
पिल्लू: हो, पप्पा.
रवी: आता समज, मी घरी नाही आणि तू आणि तुझी आई घरी आहेत. दार तोडून कोणी चोर आत आले. तर तू काय करशील. (या प्रश्नाने मुलाचा चेहरा पडला).
पिल्लू: मी आईकडे पळून जाईल.
रवी: मग तो चोर तुझ्या आईला मारू लागला तर? (यावर मुलाच्या डोळ्यात पाणी आले, मग रवीने त्याला समजावून सांगितले. अशा वेळी पळायचं नाही जे हातात येईल ते फेकून त्याला मारायचे. त्याच्या दोन पायाच्या मध्ये जोरात लाथ घालायची. जोरजोरात ओरडायचे म्हणजे आजूबाजूचे लोक जागे होतील आणि चोराला भीती वाटून तो पळेल. जर तू त्याला नाही मारले तर तो तुला आणि तुझ्या आईला मारेल.मग सांग तू काय केले पाहिजे?)
पिल्लू: मी किचन मधला चाकू घेऊन त्याने त्याला मारणार आणि जोरात ओरडणार. (रवी हसला आणि त्याने मुलाच्या गालाची एक पप्पी घेतली)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रवी: आता दुसरा प्रश्न, समज मी आणि तुझी आई या जगात कुठेच नाहीत. तू या जगात एकटा आहेस. रस्त्यावर कुठेतरी फिरत आहेस. तुला भूक लागली तर तू काय करशील.
पिल्लू: आई आणि पप्पा दोघेही नाहीत?
रवी: नाही.
पिल्लू: पैसे?
रवी: नाहीत.
पिल्लू: मी कोणाकडेतरी मागून खाईन.
रवी: आणि कोणी दिलेच नाही तर? (पुन्हा मुलाचा चेहरा पडला, खूप त्याने विचार केला. त्याच्या चेहऱ्यावरचे दडपण साफ दिसत होते)
पिल्लू: मग मी रस्त्यावर जे गाईसाठी लोकांनी ठेवलेले असते ते खाईल.
रवी: पण ते घाण असते. (यावर मुलाने दिलेले उत्तर म्हणजे रवीसाठी एका बाजूने समाधानाची बात होती)
पिल्लू: मग आता काहीच नसले तर काय करणार. भुकेने मरण्यापेक्षा काहीतरी खाल्लेले बरे ना …
रवी: मग रोज असेच रस्त्यावर पडलेले खाणार? (आता मात्र त्याला हे सगळं जड जात होते, एकप्रकारे तो पॅक झाला होता)
पिल्लू: नाही रोज नाही खाणार. मी काहीतरी करून पैसे कमवणार आणि मग हॉटेलमध्ये जाऊन खाणार.
रवी: कसे पैसे कमवणार.
पिल्लू: चहाची टपरी टाकणार.
रवी: तुला चहा करायला येतो का?
पिल्लू: नाही. मी शिकणार.
रवी: कोण शिकवणार तुला. आई-पप्पा तर नाहीत तुझ्याबरोबर. (आता मात्र त्याच्या चेहऱ्यावर दडपण साफ दिसत होते, पण त्यांने परिस्थिती सांभाळली)
पिल्लू: मी उद्याच आईकडून चहा कसा करायचा ते शिकतो. (हे उत्तर खूप महत्वाचे)
रवी: तुला चहाची टपरीसाठी पैसे कोण देणार? असं काही येते का तुला की काहीच न लागता तू काहीतरी करून पैसे कमवू शकतो?
पिल्लू: हो, मला चांगलं गाता येते, मी रस्त्यावर उभे राहून गाणी गाईन मग लोक मला पैसे देतील आणि मग मी त्यातून चहाची टपरी सुरु करेन.
रवी: मग, काय शिकला आज तू?
पिल्लू: भ्यायचं नाही … काहीतरी पर्याय काढायचा आणि जगायचं.
कोई एक-दो गाली देता हे तो सून लेनेका साब ..
आज सुट्टी म्हणून जिमला जरा उशीरानच गेलो. येताना मला भेटला ‘हिरालाल’. रद्दी-पत्रा-बाटली-लोखंड गोळा करायचं काम करतो हा हिरालाल. सकाळी-सकाळी त्याच्या हातगाडीच्या आणि तराजूच्या पाया पडत होता. त्याला म्हणलं “चल, बोनी करता मै आज की, रद्दी लेके जा”. माझ्या मागे मागे आला गडी. त्याला रद्दी दिली. म्हणलं जेवढं होतंय तेवढं दे नायतर राहू दे भावा. नाय म्हणला “बोनी हे साब पैसा तो देंगा मै”….
मग जरा हवापण्याच्या गप्पा..
किधर से हे तू? …
युपी से साब ….
कितना मिलता हे महिनेका इसमें?…
खाना-पिना छोडके आठ-दस हजार मीलता हे साब ….
अपने गावं मे कुछ क्यू नही करता?
गावं मे खेती बिना कुछ नही कर सकते साब, चार बिगा जमीन हे साब, हर साल बाढ की वजेसे लफडे होते हे साब … घरमे मै अकेला हू, माँ-बाप हे, बीबी हे एक छोटासा बच्चा हे…. नही होता साब उसमे …
आठ-दस हजार मे कैसे हो जाता हे?
महिनेका पाच हजार घर भेजता हू साब जिस्से माँ-बाप-बीबी-बच्चा खा सके.. छोटासा झोपडा हे साब इसलीये किराया नही देना पडता …
दो-तीन हजार मे तेरा हो जाता हे ?
वो सोचके क्या होगा साब? करना तो पडेगा ना (बारीक हसला गडी)
बीबी-बच्चे के बिना जी लगता हे इधर?
याच उत्तर त्याने एक्सप्रेशननेच दिले. त्याच्या या एक्सप्रेशन मध्ये बरच काही होतं.
इधर लोकल लोगोंसे कुछ तकलीफ होती हे?
कोई एक-दो गाली देता हे तो सून लेनेका साब …दो पैसे कमाके घर वालोंको संभालना हे साब… खा लेनेका गालिया थोडीही अपने शरीरको चिपकती हे ☺️☺️ कभी कभी मार भी खा लेते हे साब?
क्यू?
पता नही साब? किधर से आया हे पूछते हे और बतानेके बाद कानके नीचे बजाते हे साब….
फिर?
रूमपे जाके माँ-बाप-बीबी-बच्चे का फोटो देखके थोडा रो देणे का साब, मन हलका हो जाता हे ….
चाय पियेगा?
साब बारीश आ सकता हे जितना हो सके करता हू, फिर कभी चाय पियेगा साब….
उग आपलं बारीक हसून निघून गेला ‘हिरालाल’ !!!
त्यानंतर पप्पांच्या गालाची पप्पी घ्यायला रविला जमलचं नाही.
रवि तालुक्यातल्या ठिकाणचा. त्याचे वडील सरकारी नोकरीत.त्यावेळी मोबाईल नव्हते इंटरनेट म्हणजे बांदा पल्याडलं प्रकरण. रविची १०वी होती, परीक्षा झाली. निकालाचा दिवस आला. सकाळपासून घरात टेन्शनच वातावरण. रवि सारखा घड्याळाकडे बघत बसला होता. २ वाजता शाळेत मार्कशीट मिळणार होती. आईच्या चेहऱ्यावरचे भाव तिच्या मनामध्ये चाललेल्या अनेक गुंतांगुंती सांगत होत्या. वडील जीवाचं रान करून पोराला शिकवत होते. आईला, एका बाजूला रविच टेन्शन आणि दुसऱ्या बाजूला रविच्या बापाचं टेन्शन. लेकराला मार्क्स कमी पडले तर लेकरू नाराज होईल आणि बापाला झालेलं दुःख ते वेगळंच. बहीण घरामध्ये सगळी कामं पटापटा आवरत होती. तिला आईची आणि रवीची दोघांची मानसिकता कळत होती. चपाती आणि डाळीची आमटी करून रविला जेवायला वाढले. रविच्या घश्यातुन चपातीचा घास काय नरड्याच्या खाली उतरत नव्हता. जर मार्क्स कमी पडले तर पप्पांना काय वाटेल? त्यांना दुःख होईल. माझ्या भविष्याची चिंता लागलं. अशा अनेक प्रश्नांनी त्याची छाती धडधडत होती. त्यात आईचा चेहरा वेगळ्याच काळजीमध्ये घेऊन जात होता. आई, मात्र ते सगळं बाजूला करून हसत-हसत …”खा रे …. तुला बघ ७०% मार्क्स पडणार” मग तू जिल्ह्याच्या ठिकाणी कॉलेजला जाणार …. जेव लवकर शाळेत जायचं आहे ना?”
ती माऊली कधी शाळेतसुद्धा गेली नव्हती, पण ७०% म्हणजे चांगले मार्क्स असतात एवढच तिला माहित होत.
रविला आईच्या तोंडातून पडलेला प्रत्येक शब्द आधार देत होता परंतु तिचे डोळे रविला वेगळंच बोलत होते. घरात फोन नाही, त्यावेळी ४ अंकी फोन नंबर होते हो ! दोन-चार गल्लीत कुणा एकाच्या घरात फोन असायचा. रविच्या वडिलांनी ४ वेळा फोन करून निकाल लागला का? हा प्रश्न केला होता. वडील ऑफिसमध्येच होते पण त्यांचा जीव रविच्या निकालामध्ये अडकला होता.
२ वाजले. रवि शाळेत गेला. आई, मी पण येते म्हणत होती पण तो आईला नको म्हणत होता. आईला एक भीती आणि रवीला एक भीती. शाळेच्या बाहेर एक फळा होता, तिथे पास झालेल्या विद्यार्थ्यांची नावे लागली होती ज्यामध्ये रविचं सुद्धा नाव होतं. रविच्या चेहऱ्यावर दिवसभरात पहिल्यांदा हसू आलं. पास तर झालो, याचा आनंद त्याला खूप झाला हो. मग मार्कशीट घयायला तो रांगेत उभा राहिला. कधी एकदा खिडकीच्या जवळ जातोय आणि मार्कशीट हातात मिळते असे झाले होते त्याला.
रविचा नंबर आला. मार्कशीट हातात आली. शेवटचा रकाना पाहिला ज्यामध्ये टक्केवारी होती आणि ती होती ७५.४६%. रवि घराकडे पळत सुटला. घरी गेला आईला मिठी मारली आणि म्हणाला …
“आई …… मला ७५ टक्के मार्क्स पडले”….
आई म्हणाली ७५ म्हणजे ७० पेक्षा जास्त का कमी ? रवि हसत म्हणाला, आग आई ७० मध्ये अजून ५ टाक … त्या माऊलीच्या डोळ्यातलं पाणी म्हणजे खरी मार्कशीट होती. तांदळाच्या डब्यात ठेवलेले १० रुपये काढून तिने दुकानातून चार पेढे आणले. रविला पेढा खायला दिला. रविच्या बहिणीने त्याला एक घट्ट मिठी मारून …
“रव्या … तुला ७५ टक्के मार्क्स पडले!!” असे म्हणत त्याच्या गालाची एक पप्पी घेतली.
रवी पळत-पळत ज्या घरात फोन आहे त्या घरात गेला आणि पप्पांच्या फोनची वाट पाहू लागला. थोड्याच वेळात पप्पांचा फोन आला. रवि एकदम जोरात ओरडून म्हणाला….
“पप्पा….. पास झालो, ७५ टक्के पडले !!!”….
ऑफिसमधून वडिलांनी एस. टी. स्टॅन्ड गाठले. ५० किलोमीटरवर गाव. येताना स्टँडवरून पेढे घेतले. घरी आले. रविला न भेटताच सगळ्या गल्लीत पेढे वाटत फिरले आणि प्रत्येकाला पेढा देताना ..
“माझ्या रविला १०वीला ७५ टक्के मार्क्स पडले !”
असे अभिमानाने आणि आंनदाने सांगत होते. पेढे वाटून झाल्यावर घरी आले आणि रविला जवळ बोलवले. मार्कशीट पहिली. खुश झाले. वडील मार्कशीट पाहत होते तोवर रविने पप्पांच्या डोक्याला धरून त्यांच्या गालाची एक पप्पी घेतली आणि ढसा-ढसा रडू लागला.
आज रवि मोठा झालाय. लग्न केले. पैसा कमवतो. घर-गाडी घेतली. रवि सुद्धा आज बाप झालाय. पण का कुणास ठाऊक निकालाच्या दिवसानंतर कधीच पप्पांच्या गालाची पप्पी घ्यायला त्याला जमल नाही….. !!!
लागलं कुठंतरी नोकरी …
आत्ता ऑफिसला येताना, वाटेमध्ये हा गडी दोनचाकी वाल्यांना हात करत होता. त्याला पाहिलं आणि म्हणलं हा आपला माणूस आहे ☺️. गाडी थांबवली आणि म्हणलं बस भावा.
“चेतन शैलेंद्रसिह राठोर”, विद्यापीठाच्या जवळ कुठंतरी एक मिनी मार्केट आहे तिथे हा हाताखालचा गडी म्हणून काम करतो. आई चाळीसगावची. वडील सुरतचे. २००४ साली वडील वारले. ना भाऊ, ना बहीण … वडलांच्याकडून कुणी पटवून घेतले नाही. मग मामाने आधार दिला. मामाने सुद्धा फक्त रहायला या बाकीच तुम्हाला बघावं लागेल असे सांगितले.
कामाला का जातो, शिक्षण का नाही घेत? यावर चेतन म्हणाला… आय टी आय करायचा होता पण जातीचा दाखला मागितला. आणि ओपन मधून फी १८००० होती. मग म्हणलं, जातीचा दाखला का नाही काढला?…. यावर गप बसला…. म्हणलं का रे? मग म्हणाला … आमच्या वडलांना आवडलं नसत. मग आता काय नियोजन ?? काही नाही आता एक वर्ष गेले तोवर कामाला जाऊन जरा पैसे साठवतो आणि या जूनमध्ये बीकॉमला अर्ज भरतो….. त्याला म्हणलं तुला तो दुकानदार पगार ६००० रुपये देतो. सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत. आईची इच्छा होती की कुठेतरी धुणीभांडी करावी पण याने करू दिले नाही.
त्याला म्हणलं बीकॉम करून पुढे काय? म्हणला … अर्ज निघतील तिथं भरायचं. कुठंतरी लागलं की नोकरी.
गाडीतून उतरताना म्हणला साहेब, गाडी चांगली आहे तुमची, आईला एकदिवस अशा गाडीतून फिरवायचं आहे मलापण.
म्हणलं ….”इनशाल्हा….” फिरवणार नक्की तू. साला नियत बहुत साफ हे तेरी
💋💋💋 रवी आणि त्याची पहिली “पप्पी” 💋💋💋
रवी गाव भागातला. शिक्षन संपवून पुण्यात आला. तस पुढे शिक्षण काय तो करणार नव्हता म्हणून सरळ आपलं नोकरी धरली. सुरवातीचा काळ तसा हालाकीचा गेला. म्हणावी तशी नोकरी मिळाली नाही. अनुभव मिळावा म्हणून फुकट नोकरी सुद्धा त्याने केली.
बऱ्यापैकी पगार झाला आणि मग लग्न करायचं ठरवलं. रवी तसा मस्त मौला आणि रोमँटिक माणूस. जास्त काही अपेक्षा त्याची नव्हती. मुलगी बऱ्यापैकी शिकलेली असावी आणि सर्व साधारण घरची असावी म्हणजे बर असत अशी त्याची अपेक्षा होती. कारण रवी पण असाच सर्वसामान्य घरातला मुलगा. मुलगी कशी का असेना तिचे ‘नाक” आणि ‘ओठ’ सुंदर असावेत अशी त्याची माफक अपेक्षा होती. मग ती काळी असो वा गोरी.
मुलगी पहायला सुरवात झाली. पहिली मुलगी पाहिली मनात बसली. घरच्यांच्या आग्रहाखातर अजून काही मुली पाहिल्या पण पहिली पाहिलेली खूपच मनात बसली होती. झालं मग रवीच्या घरच्यांनी मुलीच्या वडिलांना सुपारी फोडायला यायचे आमंत्रण दिले. तारीख ठरली.
मुलगी पुण्याचीच होती (म्हणजे आपल्या आई वडिलांच्या सोबत राहत पुण्यात होती). रवीला तिला भेटायची इच्छा होत असे. पण मुलीच्या आई-वडिलांना कसे सांगायचा हा प्रश्न आणि मुलीला पण तोच प्रश्न. शेवटी रवीने मुलीच्या वडिलांना विचारले की मी तिला बाहेर जेवायला घेऊन जाऊ का म्हणून. तिच्या वडिलांनी सुद्धा होकार दिला मग काय …. पिकअप अँड ड्रॉप सुरू झाले. एका लिटरमध्ये ८० किलोमीटर एव्हरेज देणारी गाडी होती त्यामुळे लै खर्चिक काम नसायचं. एक दोन भेटी झाल्या. नंतर एका भेटीत रवी तिला घरून पिकअप करून लॉंग ड्राइव्हला गेला. आता दोघांची चांगली ओळख झाली होती. गाडीवर बसल्यावर दोघांच्या मधलं अंतर आता कमी नव्हे संपलेच होते. दोघेही तो काळ खूप एन्जॉय करत होते. एक दिवस रवी तिला सहज म्हणाला,
“मला असं का वाटत की तुला मी आवडत नाही 😢”
त्यावर ती म्हणाली …
“वेडा आहेस का असा का वाटत तुला? तू मला खूप आवडतोस म्हणून तर होकार दिला”.
मग रवी म्हणाला …
“मग तुझं प्रेम नसेल माझ्यावर 😢😢”
यावर ती म्हणाली …
“ऑफिसमध्ये काय भांडण झाले आहे का तुझे? असा का वेड्यासारखा बोलत आहेस?”.
मग रवी म्हणाला “आवडतो, प्रेम आहे मग आजवर एक पप्पी दिली नाही तू मला? का??” (किस पर्यंत जाणे दोघांच्याही डोक्याबाहेरचे होते त्यावेळी)
यावर ती जी लाजली म्हणता …. काय नव्हच …. दोघांच्याही तोंडावर एक भलताच आनंद आणि वेगळेच एक हष्य होते.
काहीच न बोलता दोघेही गाडीवर बसले आणि घरी निघाले.
गाडी थोड्या अंतरावर गेली आणि तिने हळूच रवीच्या गालावर तिने तिचे नाजुक ओठ ठेवले आणि मग तो पप्पीचा आवाज … मूहहहहहहाआ.
आजही ती पप्पी दोघांच्या ह्रदयात आहे. आणि तो क्षण आठवला की दोघेही अगदी नवीन नवरा-बायकोसारखे लाजतात.
अपेक्षा फक्त एका पप्पीचा होती पण संपूर्ण जीवन त्या पप्पीचा रंगात रंगून जात आहे.
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
हागणाऱ्यांची संख्या
गाव भागातला एक साधारण माणूस शिक्षण पूर्ण झाल्यावर शहरात नोकरीस जातो. स्वच्छ आणि पवित्र वातावरणात वाढलेला असतो. सामाजिक आणि मानवी मनाचे प्रदूषण त्याला माहीतसुद्धा नसते.
शहरात जातो, राहण्यासाठी एक साधी खोली बघतो. राहत्या ठिकाणावरून कार्यालय थोडं दूर असत. एस. टी. वगैरे कुठून व कशी आहे याची चौकशी करून दुसऱ्या दिवशी कामावर जाण्यास सज्ज होतो. बस मध्ये बसतो, कार्यालय ज्या भागात आहे तिथल्या बस स्टॉपवर उतरतो आणी तिथून कार्यालयात पोहचण्यासाठी पाच एक मिनिटांची चाल-चाल त्याला करायची असते. चालत जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकं संडासला बसलेले असतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भयानक घाण असते, अतिशय घाणेरडा वास येत असतो. त्याला ते सहनच होत नाही. अक्षरशः त्याला उलट्या होतात. तो ठरवतो उद्यापासून दुसरा मार्ग शोधू पण त्याच्यासमोर दुसरा पर्याय नसतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच… अस करत करत ५-६ दिवस जातात आणि ७व्या दिवशी तो असा चालत जातो जसे आजूबाजूला काही घाण नाहीच ! तो त्या सर्व गोष्टींचा स्वीकार करतो आणि सवय लावून घेतो. पण काळजी घेतो की आपला पाय त्या घाणीत पडणार नाही.
ज्याला समाजाची लाज अजिबात नसते तो फक्त जिथे जागा मिळेल तिथे हागत असतो त्याला सुधरवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्या हगणदारीचा एक भाग होणे असे होईल. असा त्याचा विचार होतो आणि तो अजिबात ते सुधरवण्याचा प्रयत्न करत नाही.
आता प्रश्न (अपेक्षा) एवढाचं, की हागणाऱ्यांची संख्या कमी करायची का हातात खराटा घेणाऱ्यांची संख्या वाढवायची.
गरिबानं फक्त श्रीमंतांच्या पायाच्या चपला म्हणून राहायचं बघा साहेब ..
रवीच्या घरी एक मावशी घरकासाठी रोज येतात. योगायोगाने मावशी रवीच्या गावाकडच्या निघाल्या त्यामुळे मावशी रवीशी मनमोकळ्यापणाने बोलायच्या. रवी जरी उच्च शिक्षित आणि मोठ्या कंपनीत काम करत असला तरी आहे गावकडचाच त्यामुळे अतिशय साधं आणि सरळ वागणारा एक जबाबदार आणि माणुसकी जपलेला तरुण. त्याच्या या मनमिळावू स्वभावामुळे कोणीही अगदी सहजपणे रवीशी खूप मोकळ्या मनाने बोलायचे.
सहज रवीने एकदा मावशीला त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींबद्दल विचारले … जसे की “मावशी तुमचा नवरा काय करतो हो?”, “मुलं किती? ती काय करतात?”….. वगैरे वगैरे
या प्रश्नाचे मावशीचा चेहरा पडला, त्या अचानक शांत झाल्या … रवीला अंदाज आला की काहीतरी गडबड आहे, मावशी बोलत नाहीत म्हणजे काहीतरी नक्कीच गडबड आहे… मावशी शांत होत्या पण रवी त्यांना अगदी विश्वासात घेऊन त्यांना जे काही असेल ते सांगाच म्हणून मागे लागला … मग मावशीने उत्तर दिले ..
“साहेब, २० वर्षे झाली लगीन होऊन. गावाकडे पाऊस पाणी नाय म्हणून पुण्याला काम हुडकायला आम्ही आलो, माझा नवरा एका कंपनीत कामाला लागला …४-५ हजार पगार मिळत व्हता पण एवढ्यात भागत नव्हतं म्हणून मी घरकाम करू लागले. रोज ८-१० घरात जाऊन भांडी घासायची, धुणं धुवायचे … अस चालू केले. एक मुलगा झाला आणि आमी ठरवलं की मुलाला कसल्याही परिस्थितीत शिक्षण द्यायचे आणि चांगल्या कंपनीत साहेब म्हणून नोकरीला लावायचं. दोन-चार वरीस गेलं आणि आमच्या मालकाची दोन्ही हाताची बोटं मशनीत सापडून तुटून गेली, नवरा घरी बसला … मगतर सगळी जबाबदारी माझ्यावर आली… यांनी वाचमन म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला पण हातात काठीसुद्धा धरता येत नव्हती म्हणून कामावर काय जमना … संसाराचा गाडा वडत व्हते, पोराला शिकवलं … पोरगं एका कंपनीत कामाला लागल … ८००० रुपय मिळवू लागलं …. पोरानं गाडी घेतली … बापाला हौसन गाडीवर फिरवायचा … मला बी कधी कधी सोड-आन करायचा … एक दिवशी एका टेम्पोने मागणं धडक दिली आणि माझं लेकरू रस्त्यावर मरून गेलं. आभाळ कोसळलं संसारावर … आज पुन्हा आमी दोघेच आहोत, तरुण लेकरू आमचं गेलं या धक्क्याने माझा नवरा हादरून गेला … आज पुन्हा दोघांच्या पोटासाठी मी जोमानं काम करत्या … पण लेकराच त्वांड डोळ्यासमोरून जात नाय … शेवटी काय पर्याय हाय या जगण्याला?
रवीने विचारले ज्या टेम्पोने धडक मारली त्यावर पोलीस केस नाय का केली?
मावशी म्हणली, केली की साहेब !!! २ वरीस झालं केस चालू होती .. पण इथल्या एका मोठ्या पुढाऱ्याने त्याला सोडवले कारण तो टेम्पोवाला त्या पुढाऱ्याचा कार्यकर्ता होता … आपल्या गरीबाच काय चालतंय साहेब … “श्रीमंतांच्या पायाच्या चपला म्हणून राहायचं बघा …”
रवीला आजही समजन कठीन जातंय की, अशी कोणती अपेक्षा त्या मावशीने आयुष्याकडून केली होती की या नियतीनेच तिला दगा दिला”
गिऱ्हाईक दुसरीकडे जाईल म्हणून सुट्टी काढून मी बसलोय दादा
घरापासून दोन मिनिटांच्या अंतरावर सायकल रिपेर करणारा एक तरुण आहे. मी नेहमी सायकल सर्व्हिसिंगला त्याच्याकडेच घेऊन जातो, गरीब आणि प्रामाणिक आहे गडी आणि मन लावून काम करतो. काही दिवसांनी त्याच्या पुढच्या बाजूला एक काका आपलं बूट पॉलिशचे दुकान मांडून बसले. सहज आपल्या गप्पा-टप्पा झाल्या , काका म्हणाले “.. कधी बूट पॉलिश करायचे असेल तर येत जा माझ्याकडे …”. मग त्यांच्याकडे जाऊ लागलो आणि कधी कधी असच फिरत फिरत गेलो की त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसत असतो मी. भारी वाटत. साधी आणि प्रामाणिक माणसं. अगदी हळक्यात हलक्या आणि साध्यात साध्या गोष्टीमधून समाधान मानणारी माणसं.
काल ट्रेकिंगसाठी जो मिलिटरी स्टाईलचा माझा बूट आहे त्याला जरा पॉलिश वगैरे करायचं आणि सायकल सर्व्हिसिंग करायची म्हणून गेलो होतो. यावेळी काका नव्हते त्यांचा मुलगा होता. विचारपूस केली तर समजले की काका काही कामानिमित्त गावी म्हणजे अमरावतीला गेले होते त्यामुळे त्यांचा मुलगा आला होता.
बर, मुलगा करतो काय? मुलगा MR (Medical Representative), प्रकाश दीपक कठारे, Albmebic कंपनीमध्ये नोकरी करतो, २२,००० पगार आहे. लग्न ठरले आहे. मे मध्ये लग्न आहे. मी त्याला विचारले मग तू जॉबवर नाही गेला का? किती दिवस झाले इथे येतोय?
तो म्हणाला, दादा … वडिलांनी, दुसऱ्यांची बूटं पॉलिश करून आणि चपला शिवून मला शिकवलं. त्यांच या कामात खूप मन लागतं. बऱ्याचदा मी त्यांना म्हणलं की आता बास करा हे मला नोकरी आहे, भागतय आपलं पगारात. नाही म्हणाले, काम करत राहिलो तर जास्त दिवस जगीन आणि दोन-चार पैसे गाठीला राहतील. उद्या जर आपल्याला पैसा लागला तर तुला एकट्याला लोड होईल. म्हणून मी काम करतो…. पुढे तो म्हणाला … “जर वडील गावाला गेले आणि दुकान ८ दिवस बंद राहील त्यामुळे गिऱ्हाईक दुसरीकडे जाईल म्हणून सुट्टी काढून मी बसलोय दादा…
एकमेकांकडे बघून हसलो, ते सायकलवाल पण बसलं होत बाजूला, त्याला…. तीन अमूलच्या कुलफ्या मागवल्या… तिघांनी खाल्ल्या माझा मोबाईल घरीच होता, प्रकाशकडे मोबाईल होता, सायकल वाल्याला फोटो काढायला लावला आणि व्हाट्सअप ला घेतला आणि मग तिथून निघालो. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन शिकवतात ही माणसं.
मैत्री …
नदीचा उगम बघा किती लहानसा असतो, पुढे जाईल तसे तिची व्याप्ती वाढतच जाते.
जिथून तिची सुरवात होते त्यावेळी ती एकटीच असते. जिथे तिचा अंत होतो त्यावेळी सुद्धा ती एकटीच असते.
ज्यावेळी तिची सुरवात झालेली असते त्यावेळी तिलाही माहीत नसतं तिला कुठेपर्यंत जायचं आहे आणि कुठून जायचं आहे, ना तिला वाटेतील संकटांची माहिती असते ना कुठल्या फसवणूकीची कल्पना असते. पण कळत न कळत किती जणांना ती जीवन देऊन जाते !!!
निसर्गाच्या सौंदर्यात स्वतःच्या सौंदर्याचे भर टाकून लाख नेत्रांना स्वर्गाचे सुख देऊन जाते. शेतकरी मित्रांच्या पोटाला दाणा देऊन जाते तर उद्योगधंद्यांना चालना देऊन जाते. जो कोणी कोणतीही घाण तिच्या पदरी टाकतो ती मुकाट्याने पदरात घेऊन पुढे जाते. स्वतःच पावित्र्य जपण्यासाठी दगडधोंड्यांची मदत घेते परंतु कसलीही तक्रार करत नाही. आणि हो, एवढे करून तिळमात्र अपेक्षा ठेवत नाही.
धार्मिक भावनांचा आदर करते तर प्रगतीला प्रोत्साहन देते. कितीहो पुरोगामी विचारांची असावी ती ???
जन्मापासून ते मृत्यूपर्यंत स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतःच लढते पण कधीही कोणापुढे रडगाणं गात नाही. कधीही कुणाला फसवत नाही … विशेष म्हणजे वाटेत आलेल्या दुसऱ्या नदीला सुद्धा प्रेमाने आपल्या कुशीत घेते … सागराला जाऊन मिळते त्यावेळी तिला माहीत असते की इथे तिचे अस्तित्व संपणार आणि हा तिचा अंत आहे पण हा अंत सुद्धा ती हसत हसत स्वीकारते …
खरचं “मैत्री” अशी असती तर ??
फांदी घट्ट धर रे बाळा …
वाचनात आले जे मी माझ्या पद्धतीने मांडत आहे.
रवी आणि प्रणिल दोघे चांगले मित्र, शेजारी शेजारी राहत असतात आणि एकच शाळेत शिकत असतात. दोघेही अगदी लहान. रवी असतो ७ वर्षाचा आणि प्रणिल त्याच्यापेक्षा एक वर्ष लहान. रवी खूपच खेळकर असतो आणि नुसता उचापती असतो. प्रणिल मात्र शांत असतो पण रवीमुळे तोही कधी कधी उचापती करत असतो. एक दिवस रवी एका झाडावर चढतो. दहा एक फूट वरती जातो आणि एका फांदीवर बसून मस्ती करत राहतो. थोड्या वेळाने अजून वरती जातो, अंदाजे ३० फूट आणि फांदीवर बसतो. हे पाहून प्रणिलपण झाडावर चढतो तो पहिल्या फांदीवर जाऊन बसतो जिथे रवी आगोदर बसलेला असतो.
हे दोघेही मस्त खेळत असतात तोवर अचानक जोरात वारे वाहू लागते. दोघेही घाबरून जातात. हे पाहून रस्तावरुन चालेले दोन व्यक्ती झाडाखाली येतात आणि एकजण रवीला म्हणतो “फांदी घट्ट धर रे बाळा …” आणि दुसरा माणूस प्रणिलला म्हणतो “पडू नको रे ….”. थोड्या वेळाने प्रणिल खाली पडतो पण त्याला ज्या व्यक्तीने सल्ला दिलेला असतो तो त्याला झेलतो म्हणून त्याला काही इजा होत नाही. रवी मात्र पडत नाही आणि वारे कमी झाल्यावर तो खाली उतरतो.
पहिला माणूस दुसऱ्याला विचारतो, हे दोघेही झाडावर बसले होते तुम्ही रवीला फांदी घट्ट धरायला सांगितली आणि मी प्रणिलला पडू नको म्हंटले. मग प्रणिल कसा काय खाली पडला.
यावर दुसरा मनुष्य उत्तर देतो ..”तुम्ही दिलेले सल्ले हे किती निघेटीव्ह असतात हे पहिले पाहिजे, माणसाच्या मेंदूला भीती आणि निघेटीव्ह सल्ले प्रोसेस करणं अवघड जात असते त्यामुळे, भीती आणि नकारात्मक सल्ले त्याच्या मनावर परिणाम करतात” याउलट मी रवीला फांदी घट्ट पकडण्यास सांगितले होते जिथे खाली पडण्याचा विचार त्याच्या डोक्यामध्ये आला नाही आणि तो पडला नाही.”
===========================================
सांगायचं एवढंच, चांगल्या आणि सकारात्मक वृत्तीच्या लोकांचे सल्ले ऐकावेत, फायदा जरी नाही झाला तर नुकसान तर १००% होत नाही.
===========================================
टीप: रवी आणि प्रणिल ही नावे माझ्या दोन चांगल्या मित्रांची आहेत म्हणून या बोधकथेमध्ये वापरली आहेत. नाहीतर पाटील आम्हालाच उद्देशून गोष्ट लिहितात असा गोडगैरसमज आजकाल बऱ्याच जणांचा आहे.
का रडतोयस ?
(कथेमधील पात्रं काल्पनिक आहेत. त्यांचा जीवित किंवा मृत व्यक्तीशी संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)
रवी, एक अतिशय सज्जन आणि नैतिकतेशी घट्ट नातं असलेला एक सुशिक्षित तरुण. एका खेडेगावातून शिक्षण घेतलेला आणि शहरात नोकरीनिमित्त आलेला एक कष्टकरी माणूस. नेहमी लोकांशी जवळीकता साधून पैशांपेक्षा माणसं महत्वाची या तत्वाने रवीने अनेक चांगल्या लोकांशी मैत्री केली. संसाराचा गाडा हाकत सामाजिक जबाबदारी सुद्धा पेलणारा हा गडी. परमेश्वराच्या कृपेने अर्धांगिनी सुद्धा अतिशय समजूतदार आणि जबाबदार अशी मिळाली. कोणत्याही परिस्थितीमध्ये कुणाशीही, कोणीही भांडण-तंटा करू नये यासाठी सदैव प्रयत्नशील असायचा.
त्याचे दोन मित्र असतात “प्राणिल” आणि “प्रशांत”. चांगले मित्र. रवी, प्रशांत आणि प्राणिल एका विशिष्ठ हेतूने एकत्र आलेली मंडळी. अगदी चांगली मैत्री असते या तिघांची. अगदी फॅमिली फ्रेंड्स होतात. घरगूती समारंभांना एकमेकांकडे येणे-जाणे असते. अनेक सामाजिक कार्यात एकत्र काम केलेले असते. अनेक ठिकाणी फिरायला एकत्र गेलेले असतात. एकमेकांची मन जपत ही मंडळी जगत असत.
एक दिवस काहीतरी गैरसमजुतीमुळे प्रशांत आणि प्राणिल या दोघांमध्ये खूप जोरात भांडण होत. भांडण म्हणजे मारामारीचे म्हणा. एकमेकांनावर जीवापाड प्रेम करणारे प्राणिल आणि प्रशांत आता एकमेकांचे तोंड बघायची इच्छा बाळगत नव्हते. फेसबुकवर एकमेकांना शिव्या-शाप, कुठे चुकून जरी भेट झाली तरी वादावादी. अक्षरशः एकमेकांच्या जीवावर बेतलेले.
रवी, हे सगळं बघत असतो. थोडा वेळ जाऊ देतो. आणि एक दिवस दोघांनाही घरी बोलवतो आणि खूप समजावून सांगतो. भूतकाळातल्या चांगल्या आठवणी काढतो. आपण का एकत्र आलो होतो याची जाणीव करून देतो. याउपर आपण एक चांगले मित्र आहोत याची जाणीव करून देतो. अनेक … अनेक प्रयत्न रवी करतो. परंतु प्रशांत आणि प्राणिलचा एकमेकांबद्दलचा द्वेष एवढा वाढलेला असतो की त्यांना रवीची एकही गोष्ट पटत नाही. असे अनेक प्रयत्न रवी करतो. परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही.
एक दिवस रवीला फोन येतो आणि त्याला समजते की ‘प्रशांत’ हे जग सोडून गेला. तो अक्षरशः सुन्न होतो. अतिशय दुःख होते. थोड्यावेळाने रवी स्मशानभूमीमध्ये पोहचतो. तेथे ‘प्राणिल’ सुद्धा आलेला असतो. पण रवी प्राणिलकडे दुर्लक्ष करतो. सगळं संपत. प्रशांत अनंतात विलीन होतो. सगळे लोक निघून जातात. परंतु प्राणिल मात्र त्या चितेकडे तोंड करून खूप रडत असतो. कदाचित त्याला सर्व भूतकाळ आठवला असेल. त्याच्या मागे रवी सुद्धा उभा असतो.
========================================
रवी त्याला एकच प्रश्न विचारतो .. “का रडतोयस ?”
या “का?” चे उत्तर प्राणिल कडे नसते. आणि या का मध्येच ब्रह्माण्डातले सत्य लपले आहे. ज्याला समजले तो ‘माणूस’.
बुद्धिजीवी आणि हुशार रवी
सदर कथेतील दोन्ही पात्रं काल्पनिक आहेत, जर यांचा कोना जीवित वा मृत व्यक्तीशी संबंध आला तर तो निव्वळ योगायोग समजावा
===========================================
रवी, खेडेगावातील मध्यमवर्गीय तरुण, बुद्धिजीवी आणि हुशार माणूस. माणूस ओळखून त्याच्यानुसार वागणूक ठेवणारा आणि माणसं जोपासणारा एक दुरसृष्टी असणारा तरुण.
सामाजिक जाणिव असल्याने आणि समाजाप्रती ओढ असल्याने सामाजिक कार्यात जास्त सहभागी असायचा. सामाजिक कार्यात एवढा तो पुढे जातो की लोक त्याला आपला नेता मानायला लागू लागतात. आणि लोकांच्या हट्टामुळे तो महानगरपालिकेच्या इलेक्शनला उभा राहतो आणि निवडून येतो. प्रशासकीय कार्यात त्याची असलेली दूरदृष्टी आणि कामाचे योग्य नियोजन करून त्याची अचूक अंमलबजावणी यामुळे तो जिथे हात घालेल तिथून सोनं निघायला सुरु होतं. लोकांसाठी तर तो परमेश्वर बनून जातो कारण सामान्य नागरिकाला जी अडचण येईल त्या अडचणीपुढे तो स्वतः उभा राहत असतो.
याच दरम्यान त्याच्या या कामाला भाळून प्रशांत नावाचा एक तरुण त्याच्याशी मैत्री करतो. मैत्री घट्ट होते एकमेकांवर जबरदस्त विश्वास बसतो. वेळोवेळी प्रशांत आणि रवी यांच्या अनेक गोष्टींवर चर्चा होत असतात आणि त्यातून अनेक चांगल्या गोष्टी घडून जातात. अर्थात, कर्ता हा रवीच असतो. राजकारणातसुद्धा प्रगती होत जाते महानगरपालिकेतून रवी विधानसभेत जातो, विधानसभेतुन तो लोकसभेत जातो आणि एक दिवस तो देशाचा पंतप्रधान बनतो.
एका गावातून आलेला हा एक सर्वसाधारण तरुण एवढ्या मोठ्या देशाचा पंतप्रधान बनतो, ही साधी गोष्ट नाही. त्याचे अतुंग कर्तृत्व आणि निर्मळ चरित्र याच्या जोरावर तो कुठल्या कुठे जातो. आणि एक कधीही न विसरला जाणारा इतिहास घडतो.
त्याचा मित्र प्रशांत विचार करतो की रवीचे हरेक विचार, त्याची कार्यप्रणाली, त्याचा दृष्टीकोन, त्याच्या प्रशासनाची पद्धत हे सर्व येणाऱ्या पिढीला एक प्रेरणा देणारी ठरावी म्हणून हे सगळं एका ठिकाणी मांडून ठेवतो आणि त्याचा एक ग्रंथ प्रकाशित करतो आणि त्याला नाव देतो,
“रवी कथित आणि प्रशांत लिखित …. रवीनीती”.
दशका मागून दशके जातात, शतकेही जातात परंतु रवी काही लोकांच्या समरणातून जात नाही. रवीच्या आयुष्यावर अनेक पुस्तक लिहिली जातात. तो या देशाचा एक आयडॉल बनतो. प्रशांतने लिहिलेली “रवीनीती” तर प्रत्येकासाठी एक संविधानच होऊन बसते. पण पुढे जाऊन प्रशांत वर प्रेम करणारी लोकं सुद्धा जन्माला येतात कारण रवीला अगदी जवळून पाहिलेला आणि एक त्याचा सच्चा मित्र म्हणून प्रशांत सुद्धा इतिहासात अजरामर होतो.
पुढे जाऊन प्रशांतने लिहिलेल्या “रवीनीती” या ग्रंथावर आधारित अनेक पुस्तक येतात. एक दिवस येतो की त्या ग्रंथाच नाव ..
“प्रशांत लिखित रवीनीती” असे होते आणि लोकांचा समज होतो की प्रशांत एक असा विद्वान होऊन गेला ज्याने रवीसाठी एक ग्रंथ लिहिला ज्याच्या आधारे रवीने एका उज्जवल देशाची जडणघडण केली.
आणि हळू हळू रवी इतिहासात जमा झाला आणि प्रशांत इतिहासातील हिरो झाला.
काय अपेक्षा केली होती का हो रवीने? का त्या प्रशांतने?
रवी
रवी हा एक संगणक क्षेत्रातला पधवीधर, स्वभावाने मस्त मौला आणि मजेत जीवन जगण्याचा त्याचा ढंगच वेगळा, शिक्षण संपले आणि दोन-एक वर्ष्यांनी त्याला १०,००० ची नोकरी लागली, पुढे काही शिक्षण करण्याचा त्याचा निर्धार नव्हता म्हणून लवकर लग्न करून जीवनात स्थिर व्हावे आणि जीवनात योग्य वेळी आपला साथीदार यावा आणि दोघांनी मिळून संसाराचा गाडा चालवायचा आणि जीवनात रंगून जायचं असा त्याचा विचार होता.
पती-पत्नी म्हणजे संसाराच्या गाडीची दोन चाक दोघांनी मिळून गाडी शेवट पर्यंत घेवून जायची अश्या विचाराचा माणूस हा, जे काही आयुष्यात करायचे ते आपल्या साथीदाराशिवाय शक्य नाही, संसार हा दोघांनी मिळून कार्याचा असतो अश्या चांगल्या आणि अगदी स्थिर विचारांचा हा माणूस ….
रवीच्या पप्पांनी मुलगी पहायला सुरवात केली, त्यांच्या एका मित्राने पुण्यातील एका स्थळाचा पाठपुरावा केला, फोन नंबर दिला, पप्पांनी मुलीच्या वडलांना फोन केला त्याचं बोलन झाले, मग मुलीचे आणि मुलाचे बोलणे घालून देवू असे ठरले …
ठरल्याप्रमाणे एक दिवस मुलीच्या वडलांनी मुलाला फोन केला, त्यांचे बोलणे झाले … मग त्यांनी फोन मुलीकडे दिला, मुलगीही संगणक क्षेत्रातली … ४०००० पगार घेणारी, रवी आपला गरीब १०००० वाला …
दोघांचे बोलणे सुरु झाले, रवीची भाषा रांगडी … हसत खेळत राहणार आणि दिलखुलास बोलणारा …
ती म्हणाली …. तुम्ही कोणत्या कंपनीत आहात? याने सांगितले नाव … ती एक खूप छोटी कंपनी होती … नाव ऐकून तिने विचारले छोटी कंपनी आहे का ? रवी म्हणाला हो … २० लोक काम करतात … तिचा आवाज जरा बारीक झाला … हे रवीला लक्ष्यात आले, त्याने विचारले तुम्हाला तुमच्या होणाऱ्या नवऱ्याकडून काय अपेक्षा आहेत ?
तीने उत्तर दिले , मुलगा वेल सेटल्ड हवा …
यावर रवी म्हणाला वेल सेटल्ड म्हणजे नक्की काय ?
ती म्हणाली पुण्यात चांगला २-३ BHK फ्ल्याट असावा …
एक चांगली कार असावी …
साधारण ६०-७० हजार पगार असावा …
पुण्यात शक्यतो एकटाच असावा (म्हणजे त्याचे आई-वडील गावाकड) …
हे ऐकत असताना रवी मात्र शांतच होता, एका बाजूने त्याला स्वताची लायकी खूप कमी असल्यासारखे वाटत होते आणि दुसरीकडे “अपेक्षा” या शब्दाचा अर्थ त्याला सतावत होता.
समजूत
परवा दादारावांनी (Ajay Veersen Jadhavrao)चार लाइनी टाकल्या होत्या, “काही फेसबुक फ्रेंड हे फेसबुक फ्रेंड राहिलेलेच बरे”.
याविषयावर मी चार एक वळी टाकनार होतो पण जरा कामातनं वेळ मिळाला नाही, असो.
गणित बघा कस असतय, स्वताच्या समजूतीवरुन किंवा कुणाच्यातरी सांगन्यावरून आपण मनाला काही सुचना देतो आणि त्यातून निर्माण झालेले विचार याचा परिणाम भयानक असतो. कोणी एक माणूस ज्याच्या त्याच्या आयुष्यात झगडत असतो, कोणी स्वप्नपूर्तीसाठी तर कोणी ध्येयासाठी. अशावेळी त्याला एक असा मनुष्य हवा असतो जो त्याला योग्य मार्गदर्शन देईल. आणि तो मिळाल्यास त्याच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल होऊ शकतो. आता आजच्या जगात अशी योग्य माणस कशी भेटनार? पोकेमोनची किडं शोधतील पण चांगली माणस कोण शोधनार नाही हे ही एक सत्य आहे. एक छोटीशी अपेक्षा असते की कुणीतरी मला असा मनुष्य भेटावा ज्याच्याकडून मी प्रेरणा घेऊ शकतो. आता आजही एक अशी व्यक्ती आहे जी हजारो तरुणांची प्रेरणा आहे त्यातला मी पण एक. ती व्यक्ती म्हणजे आपले महाराज.
महाराज म्हणलं की किल्ले आले. मग महाराजांमुळे काहीजण ३५० वर्षे मागे जातात आणि त्यातच सुख मानतात. नाहीतर आज २०१६ मध्ये सुख पैसा देऊन पण नाही मिळत हो. मग कुणाला गड़किल्ले संवर्धनाचं वेड लागतं तर कुणाला स्वछतेचं तर कुणाला त्यांच्या इतिहासाचं. मग ही लोक एवढी खोलवर जातात की त्याला खरच सीमा नसते. ही लोकं खरच खुप निस्वार्थी असतात बरं का. मलासुद्धा हे कधी जमल नाही. नीट संसाराचा गाड़ा जरी मी ओढू शकलो तरी लय कमवलं. चार खोल्यांच घर बांधायच होत नाही मग गड़ काय संवर्धन करणार ओ आमी. मग एकजण असाच फेसबुक मित्र, त्याने मला विचारले (त्याने लगेच मला लिस्टमधून काढून टाकलय) की तुम्ही एवढे महाराज महाराज म्हणता मग किल्ले संवर्धन का नाही करत. म्हणलं बाबा, माझी एवढी औकात नाही, पण तू जर मला मदत केलीस तर मला पण हे करता येईल. भाऊ म्हणले काय करू सांगा, मी म्हणलं माझा पुण्यात एक फ्लॅट आहे … कसल लोनपण नाही … तो मी विकतो … ६० एक लाख येतील. तू पण तुझ काय घर आसल तर ते इक मग दोघ मिळून काहीतरी करू…… यात माझ काय चुकल हे नाही समजल पण त्यान मला ब्लॉक केलय. समजल नाही की नेमकी त्याला माझ्याकडून काय अपेक्षा होती, असो.
मग होत कस, की ह्या लोकांना शिवाजी महाराज या मानसाच वेड लागत, माणूस पण तसाच आहे म्हणा, भल्या-भल्याना वेड लावल त्या माणसान. मग हे वेड हळू हळू दिसून यायला सुरु होत आणि आज फेसबुक हे माध्यम असं आहे जिथे प्रत्येकजन आपापली भावना मांडत असत , आता कोणी हे वेड ज्याच्या त्याच्या पद्धतीन दाखवतो … कोणी चांगल लिखाण करतं, कोणी कार्य करतं … मग कोणी आपल्या मुलाच नावच ठेवतं, आता मी माझ्या मुलाचं नाव शिवराज ठेवलय, ओंकार भाऊनी शिवराय ठेवलय … कोणी स्वताच्या नावापुढ शिवभक्त लावतं कोणी शिवरायांचा शिष्य लावतं. ह्या लोकांच्या भावना खुप सरळ असतात ओ (मी तसा सरळ नाही बर का). पण गाव भागातली पोर खुप साधी असतात हो, त्याना बाकीच काही दिसत नसत त्याना फक़्त महाराज दिसत असतात. पण त्यांच जे काही कार्य असत त्याला तोड़ नसते. मी अशा अनेक लोकांचा फॅन आहे. मग होत काय अशा लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट येतात … मलाही येतात …पण काहीजण त्याचा स्क्रीन शॉट घेवून फेसबुकवर त्यांचा बाजार करतात. त्यानं आपल बरेच लोक म्यूच्यूअल फ्रेंड मध्ये असतात म्हणुन आपल फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली असते, पण त्या बिचार्यांचा बाजार उठवला जातो, त्याचा अपमान केला जातो ( काही फेक सुद्धा असतात बरं का.).
आपण तो कोण आहे हे जर समजून घेण्यात १० मिनिटं जरी घालवली तर हा उगाच बाजार उठवण्याचा प्रकार थांबू शकतो. मी जर अशा लोकांना ओळखत नसलो तर जो कोणी म्यूच्यूअल मध्ये असतो त्याला विचारतो मग निर्णय घेतो. पण काही लोकांना स्क्रीन शॉट टाकण्याची कसली गड़बड़ असते देव जाने.
असे असेल तर “बोम्बल्या फकीर” हे काय विष्णुचे नाव आहे का? का विष्णुचा अवतार आहे…… त्या माणसाला तुम्ही भेटला तो कोण आहे …. त्याचे काम काय आहे… त्याचे विचार कसे आहेत हे जानले ना … मग हेच बकीच्यांच्या बाबतीत केल तर त्या व्यक्तीचा अपमान नाही होणार.
असो त्यामुळे नेमके विचार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अपेक्षा या नक्की काय व कशा असाव्यात हे जरा बघितल तर बिनकामाचे वाद निर्माण होणार नाहीत आणि यामुळे फेसबुक मित्र हे फक्त फेसबुक मित्र राहणार नाहीत. पण ज्यांना हे समजत नाही ते फेसबुक मित्रच बरे.