लहानपणापासून चुकीचा इतिहास आपल्याला ऐकवण्यात आला तो म्हणजे तानाजी मालुसरे यांनी यशवंती या घोरपडीच्या मदतीने सिहगड हा किल्ला सर केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तानाजी मालुसरे यांच्या निधनानंतर कोंढाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी नाव बदलून “सिहगड” असे ठेवले. १६७० च्या आगोदर काही पत्रांमध्ये सिहगड असे नाव आले आहे.
असो …
तानाजीने “जैसे वानर चालोन जातात” तसे चपळ मावळे चढवून गड जिंकला अस सभासदांच्या बखरीमध्ये लिहिले आहे. घोरपडीचा उल्लेख हा कोणत्याही समकालीन कागदपत्रांमध्ये नाही, ती निव्वळ दंतकथा आहे. परंतु घोरपडीच्या साह्याने गड जिंकण्याचा प्रकार १५व्या शतकात घडला आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक दत्तोपंत आपटे लिखित ‘मुधोळ संस्थानाचा इतिहास’ या ग्रंथात ही घटना मांडली आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
थोडक्यात ही घटना खालीलप्रमाणे,
महमदशहा बहामनी याने खेळणा (विशाळगड) हा किल्ला पाडाव करण्याची आज्ञा त्याचा कारभारी महमूद गावान याला दिली होती. संगमेश्वरचा राजा शिर्के याला किल्ल्याचा पाडाव करून बहामनी मलिकउत्तुजार हसन बसरी त्याला ताब्यात घेतले आणि मुसलमान व्हायला फर्मावल. तेव्हा शिर्के म्हणाले “माझ्याबरोबर खेळण्याचा शंकरराव मोरे यालासुद्धा मुसलमान करा नाहीतर मला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. कारण त्याच आणि माझ जून वैर आहे”. मलिकउत्तुजारला ते पटलं आणि तो सैन्य घेऊन खेळण्याकडे निघाला आणि वाट दाखवायला शिर्के होते.
शिरक्यांनी जाणून भुजून सैन्य जंगलातून कठीण वाटेने नेले आणि तिसऱ्या दिवशी गुपचूप शिर्के निघून गेले व मोरे यांना निरोप पाठवला की तुम्ही सैन्य घेऊन या मी इथे यांना अडकवले आहे, दोघे मिळून यांना संपवून टाकू आणि झाले तसेच. याचा सूड म्हणून महमूद गावानने किल्याला वेढा दिला. अनेक महिने गेले, अनेक प्रयत्न झाले परंतु किल्ला काय सर होईना. अशा वेळी कर्णसिह नावाचा एक पराक्रमी सरदार होता त्याला एक अनोखी कल्पना सुचली परंतु ती कोणालाही न सांगता गावानची परवानगी घेऊन निवडक सैन्याची एक टोळी घेऊन किल्याला वळसा घालून किल्ल्याच्या मागील बाजूस आला. त्याच्याबरोबर त्याचा मुलगा भीमसिह सुद्धा होता. या सर्वांनी आपल्याबरोबर बऱ्याचशा घोरपडी आणल्या होत्या. त्या घोरपडीच्या कंबरेला लांब दोरखंड बांधला होता. त्यापैकी एका घोरपडीला भालकाठीच्या टोकावर ठेवून किल्ल्याच्या भिंतीला लावण्यात आले व आधार मिळताच ती सरसरत वर गेली आणि एका खबदाडीत दडून राहिली. तिच्या कंबरेच्या दोराला धरून एक सैनिक वर गेला की मग पिशवीतून दुसरी घोरपड काढून त्याने पूर्वीच्याच पद्धतीने भालकाठीच्या साह्याने अजून वर चढवली. अशा तर्हेने पाच सहा घोरपडी वर चढवत चढवत काही सैनिक माथ्यापर्यंत पोहचले. नंतर मग हाणामारी आणि कापाकापी होऊन किल्ल्याचा दरवाजा उघडण्यात आला मग बहामनी सैन्य आत घुसून जोरात युद्ध झाले आणि यश मिळाले.
अशा तऱ्हेने कर्णसिह आणि भीमसिह या पिता पुत्रांनी हे शक्य करून दाखवले. या युद्धात कर्णसिह धारातीर्थी पडले. यामुळे विजयामुळे बादशहा खुश झाला व भीमसीहाला बोलवून त्याच्यावर बक्षिसांची खैरात केली.
बादशहाने भीमसीहाला दिलेल्या फर्माणात असा स्पष्ट उल्लेख आहे की, काही ‘सोसमार’ ज्याला अरब लोक ‘सनब’ म्हणतात व दक्षिणेत ‘घोरपड’ म्हणतात, त्या हस्तगत करून रात्रीच्या वेळेस कंबरेस दोर बांधून आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या त्या खिलना किल्ल्याच्या कंगोऱ्यावर त्यांना पाठवले व हे महापराक्रमी पिता-पुत्र दोघेगी त्या साधनांनी त्या किल्ल्यावर आपल्या शूर सैनिकांसह पोहोचून किल्ल्याचा दरवाजा उघडला. या कामगिरीबद्दल चौऱ्यांशी खेड्यांसह मुधोळ, रायबाग व वाईकडचा सर्व प्रदेश त्यांना देण्यात आला. तसेच त्यांना ‘राणा’ या पदवीच्या ठिकाणी ‘राजा घोरपडेबहाद्दर’ ही उच्च पदवी व घोरपडचीच्या चिन्हाचा झेंडा प्रदान करण्यात आला.
ही घटना सन १४७०-७१ मध्ये घडली. तेव्हापासून भीमसिह हा घोरपडे बनला, तर देवगिरीकडे असलेला त्याचा भाऊ शुभ कृष्ण मात्र भोसलेच राहिला.
====================================
संदर्भ : मंतरलेला इतिहास.
लेखक : Harshad Sarpotdar
0 comments on “तानाजी मालुसरे, गड आणि घोरपड” Add yours →