timthumb

यावनी आक्रमण: भाग – ३

यावनी आक्रमण: भाग ३
___________________

हा भाग वाचण्या आगोदर यापूर्वीचे दोन्ही भाग वाचावेत ही विनंती.

भाग-३ वाचण्या आगोदर भाग-२ नक्की वाचून घ्यावा. भाग-२ ची लिंक खाली दिलेली आहे.

यावनी आक्रमण: भाग २

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आपण मागील दोन्ही भागांमध्ये पाहिले के भारताच्या वायव्य सरहद्दीवर असलेल्या काबुल, झाबुल आणि सिंध या हिंदू राष्ट्रांचा नाश कसा झाला. जसे मागील भागात सांगितले आहे की हिंदू लढले नाहीत असे बिलकुल नाही उलट अरबांना जगात कोणी जोरदार टक्कर दिली असेल तर ती या तीन हिंदू राष्ट्रांनी. मग नक्की गणित कुठं फसल? अरबांपेक्षा ताकदवान राष्ट्रे असताना सुद्धा ही तिन्ही राष्ट्रे का हरली? एक इतिहासाचा विध्यार्थी म्हणून मला इतिहासाला नेहमी “का?” असा प्रश्न विचारायला जास्त आवडते त्याशिवाय पुढच्या घटनाक्रमांची जुळवाजुळव करता येत नाही. आणि या ‘का’ चे उत्तर शोधत असताना मला सर यदु यदुनाथ सरकार यांचे एक वाक्य आठवते, ते म्हणतात “राष्ट्राचा सर्वात मोठा शत्रू हा राष्ट्रच असतो”. या वाक्याला केंद्रस्थानी ठेवून ज्यावेळी मी या प्रकरणाचे विश्लेषण केले त्यावेळी या तिन्ही बलाढ्य राष्ट्रांच्या पराभवाची कारणे इथे मांडावीशी वाटतात.

१) राष्ट्रीयत्व ही संकल्पना पूर्ण दुर्लक्षित: ज्यावेळी काबुल अरबांशी झुंजत होते त्यावेळी राष्ट्रीयत्व या संकल्पनेचा गंधही झाबुल आणि सिंधला नसावा आणि म्हणून या राज्यांचे साहाय्य काबूलला मिळाले नाही.

२) शत्रूचा अभ्यास नाही: शत्रू कोण आहे? त्याची युद्धकला काय आहे? युद्धतंत्राची आधुनिकता नेमकी कशी असावी? शत्रूकडे कोणती शस्त्रे आहेत? अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा गंधही या तीनपैकी कोणत्याही राज्याच्या शासकाला नव्हता ना जाणून घेण्याची बुद्धी सुचली.

३) नेहमी बचावात्मक पावित्रा: जसे अरब आपल्या राज्याच्या सरहद्दी वाढवण्यासाठी आपल्या राज्याची नीट बांधणी करून परकीय राज्यावर आक्रमण करून, ते काबीज करून आपल्या अधिपत्याखाली आणण्याच्या हेतूने नेहमी आक्रमक राहून छोटी-मोठी राज्ये जिंकत राहिले. तसे या तीनपैकी एकालाही वाटले नाही की अरब आपल्यावर चालून येण्याआधी आपण त्यांच्यावर चालून जावे.

असो, कारणे काहीही असोत. भारताच्या वायव्य सरहद्दीवर असणारी तीन बलाढ्य राज्ये अरबांनी कोलमडून टाकली आणि भारताच्या वायव्य सरहद्दीवर आपला जम बसवला हेच एकमात्र सत्य आहे. आता भारतामध्ये अरब रीतसर घुसले होते आणि भारताला या क्रूर अफगाणी शासकांनी तोंडओळख झाली होती. या अरबी आक्रमणानंतरही पुढे काही राजांनी अरबांचा प्रतिकार केला. जरी अरबांच्यापुढे हिंदू नमले असले तरी ही अरब लाट सरहद्दीवर पुढी अडीच-तीनशे वर्षे थोपवून धरली हे ही खरे आहे. या कालावधीत अरब आणि तुर्क यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला आणि अरबांचा इस्लाम आता तुर्क, मोंगल अशा क्रूर व रानटी लोकांच्या ताब्यात गेला आणि पुढे यांचीच आक्रमणे भारतावर झाली आणि यांनी इथे अधिराज्य स्थापन केले. ज्यामध्ये अनेक घराण्यांनी भारतावर राज्य केले. सुमारे अडीच-तीनशे वर्षांच्या काळानंतर भारतावर चालून आला तो गझनीचा (गझनवी) सुलतान “महमूद”. महंमद-बिन-कासीमला भारतात पाय रोवता आला नाही परंतु ज्या सुलतानामुळे या देशाचा रंग बदलण्यास सुरवात झाली त्याचा इतिहास आपण या भागात पाहुया.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

■ गझनीचा (गझनवी) सुलतान “महमूद”

यादवी युद्धे, अंतर्गत कलह ही कीड अरबांना सुद्धा लागली होतीच. इराणमध्ये अनेक राजवंश होऊन गेले. ‘सामान’ नावाच्या एका पराक्रमी व शूर सरदाराने राज्य स्थापन केले ज्याला सामानी वंशांचे राज्य असे म्हणतात. याची राजधानी बुखारा ही होती. हा काळ म्हणजे नववे शतक. या राज्यात तुर्क गुलाम खूप होते आणि हळूहळू यांची संख्या वाढत गेली परिणामी ‘अलप्तगीन’ नावाच्या एका शूर आणि पराक्रमी सरदाराने गझनी येथे एक वेगळे राज्य स्थापन केले. इ. स. ९९४ च्या सुमारास त्याने सामानी राज्य सुद्धा आपल्या राज्यात समाविष्ट करून घेतले.

आता गणित बघा कस फिरलं? गझनीचा संस्थापक अलप्तगीन इ. स. ९९६ ला मरून गेला आणि त्याचा मुलगा सबक्तगीन हा गादीवर आला. याचा फायदा घेत काबुलचा राजा जयपाल याने कनोजच्या (दिल्लीच्या वरती एक राज्य होते) व इतर हिंदू राजाच्या मदतीने गझणीवर हल्ला केला. दोघांमध्ये जोरदार युद्ध झाले परंतु जोरदार वादळ सुटल्यामुळे जयपालला त्याचा फटका बसला व खंडणी देण्याचे मान्य करून त्याने माघार घेतली. परंतु माघारी फिरताच त्याने अलप्तगीनला खंडणी देण्याचे नाकारले व त्याचे अधिकरी जे खंडणी घेण्यासाठी जयपालकडे आले होते त्यांनाही जयपालने कैद केले. परिणामी अलप्तगीनने आता जयपालवर हल्ला केला ज्यामध्ये जयपालचा पराभव झाला. इ. स. ९९७ ला अलप्तगीन मेला आणि त्याचा एक मुलगा “अब्दुल-कासीम-महमूद” गादीवर आला जो पुढे जाऊन भारतावर १७ स्वाऱ्या करणारा “गझनीचा महमूद” म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाला.

हा माणूस जितका पराक्रमी होता त्याहून अधिक महत्वकांक्षी होता. त्याहून अधिक म्हणजे भयानक क्रूर व धर्मांध होता. मुस्लिम सोडून इतर धर्मांचा तो भयानक द्वेष करत असे. ज्यावेळी त्याने सोरटीच्या सोमनाथावर हल्ला केला त्यावेळी तिथल्या काही पुजाऱ्यांनी व ब्राह्मणांनी त्याला विनंती केली की, “तू मूर्तीला हात नको लावू त्या बदल्यात आम्ही तुला सोन्याच्या राशी देतो” त्यावर महमूद उत्तरला “मला बुद्-फरोश (मूर्ती- विक्रेता) पेक्षा बुद् -शिकन (मूर्ती फोडणारा) ही कीर्ती जास्त आवडेल”. यावरून त्याचा हिंदू द्वेष दिसून येतो. त्याने केलेल्या १७ स्वाऱ्यांमध्ये प्रत्येक स्वारीत हिंदूंच्या कत्तली, धार्मिक भावनांवर आघात, मंदिरे उध्वस्त करणे, स्त्रियांवर अत्याचारा व गुलाम म्हणून गझनीला घेऊन जाऊन त्यांची विक्री करणे. असे म्हंटले जाते की महमूदने एवढ्या हिंदू स्त्रिया गझनीच्या बाजारात विकायला ठेवल्या होत्या की त्यामुळे गुलामांचा भाव कोसळला होता. बाजारात एखादी स्त्री जोवर विकली जात नाही तोवर तिच्यावर अगणित अत्याचार केले जात असत.

अलबेरुनी नावाचा त्याचा समकालीन लेखक होता ज्याने अनेक घटना लिहून ठेवल्या आहेत. तो म्हणतो, “महमूद गझनीने भारताचे वैभव पूर्णपणे नष्ट केले. त्याच्यापुढे हिंदू लोक अगदी मातीच्या कणाप्रमाणे उधळले गेले. हिंदू जाती केवळ इतिहासजमा राहिली. महमुदाच्या मते हिंदू काफर होते म्हणून त्यांना नरकाच्या भट्टीत जाळणे आवश्यक होते. त्याच्या भीतीने अनेक हिंदू काश्मीर-बनारसकडे पळून गेले.”

महमूद गझनीने भारतावर ज्या १७ स्वाऱ्या केल्या त्या सर्व सोरटीच्या सोमनाथावर केल्या असे अनेकवेळा सांगितले जाते. गझनीने १७ वेळा सोरटीचे सोमनाथ लुटले असे अनेकवेळा आपण अनेकांच्या व्याख्यानात ऐकले असेल. पण हे खरे नसून त्याने सोरटीवर फक्त एकदाच आक्रमण केले होते. ती त्याची १६वी स्वारी होती.

■ गझनीच्या स्वाऱ्या

१) पंजाब सीमा (इ. स. १०००):
यावेळी या प्रदेशाचा राजा जयपाल होता.
२) पेशावर (इ. स. १००१):
यावेळी या प्रदेशाचा राजा जयपाल होता.
३) भाटिया (भटिंडा) (इ. स. १००४):
यावेळी या प्रदेशाचा राजा विजयराय होता.
४) मुलतान (इ. स. १००५):
यावेळी या प्रदेशाचा राजा दाऊद करमाक्षी होता.
५) मुलतान (इ. स. १००६)
यावेळी या प्रदेशाचा राजा सुखपाल होता.
६) वैहिद (पेशावर) (इ. स. १००८-०९):
यावेळी या प्रदेशाचा राजा आनंदपाल होता.
७) नारायणपूर (अलवर) (इ. स. १००९):
यावेळी या प्रदेशाचा नेमका शासक कोण होता याचे नाव सापडत नाही.
८) मुलतान (इ. स. १०१०):
यावेळी या प्रदेशाचा राजा सुखपाल होता.
९) स्थानेश्वर (थानेश्वर)(इ. स. १०१२-१३):
यावेळी या प्रदेशाचा राजा राजाराम होता.
१०) नंदन (इ. स. १०१४)
यावेळी या प्रदेशाचा राजा त्रिलोचनपाल होता.
११) काश्मीर (इ. स. १०१५)
यावेळी या प्रदेशाचा राजा संग्राम लोहार होता.
१२) कनोज-मथुरा (इ. स. १०१८-१९)
यावेळी या प्रदेशाचा राजा प्रतिहार राज्यपाल होता.
१३) कलिंजर-कलचुरी व परमार (इ. स. १०१९-२०)
यावेळी या प्रदेशाचे राजे गंड चंदेल, त्रिलोचनपाल होते.
१४) काश्मीर (इ. स. १०२१)
यावेळी या प्रदेशाचा नेमका शासक कोण होता हे सापडत नाही परंतु एक स्त्री शासक होती अशी माहिती मिळते.
१५) ग्वालेर व कलिंजर (इ. स. १०२२)
यावेळी या प्रदेशाचा राजा गंड चंदेल होता.
१६) सोमनाथ (इ. स. १०२५)
यावेळी या प्रदेशाचा राजा भीमदेव होता.
१७) सिंधमधील जाट लोकांवर हल्ला (इ. स. १०२६)
यावेळी या प्रदेशाचा शासक कोण होता याची माहिती मिळत नाही.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

महमूद हा संपत्तीचा आणि पैशाचा भयानक लोभी होता. कर्तृत्ववान आणि पराक्रमी तर तो होताच आणि त्यामुळेच त्याने इस्लामचा चांद संपूर्ण उत्तर हिंदुस्थानावर अगदी इतमामाने मिरवला. याचबरोबर तो स्वतः गुणी होता व त्याच्याकडे दरबारात अत्यंत हुशार व विविध क्षेत्रातील पंडित व विद्वान मंडळी होती. अलबेरुनी हा त्यामधला एक. महमूदला अरबी, तुर्की व पर्शियन या तीन भाषा अगदी चांगल्या प्रकारे अवगत होत्या. गझनी शहर त्याने अत्यंत प्रभावशाली व वैभवशाली असे बनवले होते. पाठशाळा, ग्रंथालये, टोलेजंग इनर्ति4 त्याने तिथे बांधल्या होत्या.

मुसलमान रियासताकर त्याचे “न्यायी, उदार, विद्ववतभोक्ता आणि शिपाई” असे वर्णन करतात.

पण अशा शासकाला राज्याचे प्रशासन चोखपणे लावण्यात अपयश आले आणि त्याने उभे केलेले वैभव जास्तकाळ टिकवता आले नाही. मारताना त्याला त्याने जमा केलेली सर्व संपत्ती व वैभव बघण्याचा हट्ट धरला व ते सर्व पाहिल्यानंतर हे सर्व सोडून जावे लागणार या विचाराने तो मोठमोठ्याने रडू लागला असे म्हंटले जाते. महमूदचा अंत का व कसा झाला आणि त्यानंतर गझनीचा कारभार कोणी हातात घेतला हे आपण पुढच्या भागात पाहू.

भारतावर राज्य करणे किंवा भारताचा भाग जिंकून तो आपल्या राज्याला जोडणे असा मनसुबा याचा बिलकुल नव्हता. महमूदला फक्त जेवढी होईल तेवढी लूट करणे आणि इथून हिंदूंना गुलाम म्हणून घेऊन जाऊन गझनीच्या बाजारात विकणे हा मुख्य हेतू होता. शेवटच्या स्वारीनंतर तो भारतात पुन्हा कधीही आला नाही. सोमनाथावर हल्ला हा त्याचा कदाचित शेवटचा हल्ला ठरला असता परंतु सोमनाथ लुटून गझनीला परत जात असताना अचानकपणे जाटांनी त्याच्यावर हल्ला केला. तो तिथून पुढे गझनीला गेला खरे परंतु जाटांवरचा राग त्याचा कमी झाला नव्हता म्हणून पुन्हा इ. स. १०२६ ला तो जाटांवर चालून आला. पुढे चारच वर्षात त्याचा आजारपणामुळे मृत्यू झाला.

या जगाच्या इतिहासात ही एकमात्र घटना असू शकते की एकच माणूस एकाच प्रदेशावर सलग १७ स्वाऱ्या करतो आणि ते ही एकाच भागातल्या वेगवेगळ्या राज्यांवर आणि तो १७ वेळा जिवंत माघारी जातो. पुन्हा एकदा मला इथे सांगावेसे वाटते की या सर्व घटनांमधून शिवाजी महाराजांचे महत्व आणि हिंदुस्तानच्या इतिहासाला मिळेल एक वेगळी कलाटणी किती निर्णायक आणि महत्वाची होते हे समजू शकेल.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

#यावनी_आक्रमण
#अरब_तुर्क_आक्रमक
#जागर_इतिहासाचा
#प्रबल

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

0 comments on “यावनी आक्रमण: भाग – ३Add yours →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *