31934790_10156272949320295_3778369651839336448_n

यावनी आक्रमण: भाग – ४

जर आपण भाग-३ वाचला नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर आपणास तो वाचायला मिळेल.

भाग-४ वाचण्या आगोदर भाग-३ नक्की वाचून घ्यावा. भाग-३ ची लिंक खाली दिलेली आहे.

यावनी आक्रमण: भाग – ३

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मागील भागात आपण पाहिले की गझनीच्या (गझनवी) महमुदाचा उदय कसा झाला आणि त्याने भारतावर किती आणि कशा स्वाऱ्या केल्या. लगातार २५ वर्षे भारतावर सतत आक्रमण करणारा हा पहिला यावनी माणूस ज्याने भारताला अक्षरशः हादरवून ठेवले. त्याला इथे राज्य नक्कीच करायचे नव्हते परंतु भारत म्हणजे त्याच्या तिजोरीची चावी होता. जरी भारतावर त्याने सत्ता प्रस्थापित केली नसली तरी त्याच्या स्वारींचे परिणाम भारताला भोगावे लागलेच. त्याच्यामुळे अरबी/तुर्कांना भारतात येण्याचे मार्ग तोंडपाठ झाले. पंजाब प्रांत त्यांच्या ताब्यात असल्याने भारताच्या डोक्यावर पाय देऊन घरात घुसायचा एक वेगळाच आत्मविश्वास त्यांना मिळाला आणि यामुळे हिंदु खचले आणि अरब किंवा तुर्कांविषयी एक जबरदस्त भीती भारतीयांच्या मनात बसली ज्याचा फायदा पुढच्या यावनी शासकांनी घेतला.

■ गझनींचा अंत व घोरींचा उदय

यावनांच्या प्रत्येक घराण्याला लागलेला एक शाप म्हणजे बापानंतर मुलांची सत्तेसाठी भांडणे आणि त्यातून एकमेकांची मुंडकी कापणे, सत्तेसाठी बापालाच कैद करणे किंवा ठार मारणे, किंवा एखाद्या सरदाराने संधीचा फायदा घेत स्वतःच्या हातात सत्ता घेणे. यातुन पराक्रमी गझनीचा महमूदसुद्धा सुटला नाही. महमूदाला दोन मुलं होती. “मसूद (मस्ऊद)” आणि “महंमद”. हे दोघेही एकाच दिवशी जन्माला आलेले होते परंतु वेगळ्या मातेंच्या पोटी असे म्हंटले जाते. यापैकी, मसूद हा अतिशय क्रूर व बलशाली होता. त्याची वृत्ती ही खूप राक्षसी होती. महंमद मात्र खूप हुशार, संयमी व शांत वृत्तीचा होता, म्हणून महमूदाने महंमदला गादीवर बसवले. पण महमुदाच्या मृत्यूनंतर चित्र बदलले व मसूदने महंमदचे डोळे काढून त्याला कैद केले व स्वतः गादीवर बसला. पुढे त्याने १४ वर्षे राज्य केले. मसूद होता आडदांड पण पराक्रमीसुद्धा होता. अतिशय जिद्दी व रागीट स्वभावाचा असल्याने सेना नेहमी त्याला दचकून असायची. १०३३ साली त्याने काश्मीरमधील ‘सरस्वती’ नामक किल्ला जिंकला व त्यानंतर गझनीमध्ये त्यांने अतिशय सुंदर वाडा बांधून एक रत्नजडीत सिंहासन तयार करून घेतले. पुढे १०३९ त्याने भारतावर दुसरी स्वारी केली व कर्नाळ जिल्यातील ‘हांसी’ हा किल्ला त्याने जिंकला. आता राजकीय चित्र बदलत चालले होते. गझनीवर हल्ला करून त्यावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न तुर्कांनी सुरू केला होता. हे मध्य आशियातील तुर्क. अमुदर्या नदीच्या काठी हे तुर्क मेंढ्या राखण्याचे काम करत होते ते सोडून आता ते राज्यकारभारात शिरले व १०३८ साली ‘खुरासान’ प्रांतात त्यांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले. यावेळी त्यांचा सरदार होता ‘तुघ्रल बेग’. हे तुर्कांचे बंड मोडून काढण्यासाठी मसूदने खुरासन प्रांतावर हल्ला केला. तुघ्रल व मसूदमध्ये जबरदस्त लढाई झाली व यात मसूदचा पराभव झाला. इकडे गझनीमध्ये सुद्धा बंड सुरू झाला होता. भारतात असलेली मसूदची फौजसुद्धा त्याच्यावर उलटली होती (दुसऱ्या स्वारीच्या वेळी म्हणजे १०३९ साली त्याने त्याचा मुलगा मौदुद यास लाहोरमध्ये ठेवले होते). हे सर्व पाहून लोकांनी पुन्हा आंधळ्या महंमदला गादीवर बसवले आणि त्याचा मुलगा अहंमद राज्य कारभार पाहू लागला. याच अहंमदाने आपल्या बापावर झालेल्या अन्यायाचा बदला घेत मसूदला ठार केले. (सन १०४०). अशाप्रकारे मसूदने १०३० ते १०४०, म्हणजे १० वर्षे गझनीवर राज्य केले. पुढे जाऊन सुलतान मौदुद याने इ. स. १०४१ ते १०४९ राज्य केले. मग पुढे त्याचा मुलगा मसूद आला त्यालाही त्याच्या भावाने बाजूला केला आणि त्याचा भाऊ म्हणजे अबुल हसन गादीवर आला. मग अबुल हसनचा मुलगा अबुल रशीद गादीवर आला पण याला एकच वर्षे राज्य करता आले. मसूदचा मुलगा फारूकजाद याने त्याचा पाडाव केला व पुढे त्याने ६ वर्षे गझनीवर राज्य केले. १०५८ ला तो मेला व त्यानंतर त्याचा भाऊ इब्राहीम गादीवर आला व त्याने १०९८ पर्यंत गझनीवर शांतपणे राज्य केले. या वाघाला ४० मुलगे व ३६ मुली होत्या. यालापन एक आडदांड मुलगा होता तो म्हणजे मस-ऊद त्याने पुढे सत्ता हातात घेतली परंतु तो हिंदुस्तानात कधी आला नाही. पुढे मस-उदाच्या मुलाने म्हणजे असलॉर्न त्याच्या भावांना बाजूला करून गादीवर आला. याचवेळी तुर्क सुद्धा पुढे उभे होते आणि त्यांच्यापुढे हा टिकला नाही. आता याचेही त्याच्या भावांशी वाकडे होते आणि याला बाजूला करण्यासाठी त्याच्या भावांनी आपला मामा सुलतान संजर याची मदत घेतली परिणामी असलॉर्नला गझनी सोडून पळून जावे लागले. संजरने मग असलॉर्नचा भाऊ बहराम यास गादीवर बसवले.

बहरामने पुष्कळ वर्षे राज्य केले (इ. स. १११८ ते इ. स. ११५२). मग त्याचा मुलगा खुश्रू गादीवर आला.७ वर्षे राज्य करून हा ही ११६० ला मरण पावला. महमूदापासून म्हणजे इ. स. ९९७ पासून ते अगदी खुश्रू मलिक म्हणजे इ. स. ११८२ पर्यंत गादीसाठी फार मोठी गुंतागुंत आहे. स्वतःच्या बापाला, एकमेकांच्या भावांना मारणे आणि सत्ता काबीज करणे.

एकंदरीत गझनीच्या सुलतानांनी महंमुदाच्या नंतर जवळपास दीडशे वर्षे राज्य केले. यामध्ये बहुतेकजन धार्मिक होते. इब्राहिम व बहराम यांनी अनुक्रमे चाळीस व पस्तीस वर्षे राज्य केले. पुढे जी मुस्लिम राज्ये भारतामध्ये स्थापन झाली त्यातल्या बऱ्याच जणांनी यांची नक्कल केली. महमूदाच्या पुढच्या पिढीची वंशावळ मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पोस्टसोबतच्या फोटोमध्ये आपण पाहू शकता.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

घोरी ….

गझनीच्या वायव्येला ‘घुर’ नावाचा एक डोंगरी मुलुख होता. या डोंगरी भागात फक्त अफगाण नावाचे लोक राहत होते जे मूळचे हिंदू होते. या सर्वांना गझनीच्या महमुदाने मुस्लिम केले होते. हा डोंगरी प्रदेश बराच काळ गझनीच्या सुलतानांकडे होता. महामुदाच्या मृत्यूनंतरचे बहुतांश सुलतान हे दुबळे निघाले. शेवटी-शेवटी हीच संधी साधून घोरी सरदार पुढे आले आणि त्यांनी गझनीचा पूर्ण पाडाव करून स्वतःची सत्ता स्थापन केली.

खर तर यांनी इ. स. ११५७ पासूनच गझनीविरुद्ध बंड पुकारला होता. इ. स. ११८२ ला शेवटचा गझनीचा सुलतान ‘खुश्रू मलिक’ मेला. त्याच्या आगोदर सुलतान खुश्रू जो गझनी सोडून लाहोरला आला होता आणि तिथे त्याने छोटेसे राज्य वसवले होते. सात वर्षे राज्य करून ११६० ला तो मेला. म्हणजे, ‘खुश्रू मलिक’ हा गझनीच्या सबुक्तगीनच्या वंशाचा शेवटचा सुलतान होय (वंशावळ पहावी). घोरी मंडळींनी ११५७ च्या आसपास गझनी जिंकून घोरी सुलतानांचे राज्य स्थापन केले. यांनी भारतावर अनेक (५ ते ६) स्वाऱ्या केल्या.

■ “महंमद घोरी” उर्फ “शहाबुद्दीन घोरी”

अला-उद्दीन ज्याने गझनी जिंकले, गझनी जिंकल्यावर तो परत गेला व गाफील राहिल्याने सुलतान संजर याच्या हातून तो कैद झाला. पण पुढे त्याची सुटका झाली व त्याचे राज्य त्याला परत मिळाले.

याला “सैफ-उद्दीन” म्हणून एक मुलगा होता व “ग्यास-उद्दीन” आणि “शहाबुद्दीन” असे दोन पुतणे होते. आपल्या मुलाला राज्य मिळावे म्हणून अला-उद्दीनने आपल्या दोन्ही पुतन्यांना कैद केले व मुलाला सुलतान बनवले. आता सैफ-उद्दीन सुलतान झाला होता. याने एक भयानक चूक केली ती म्हणजे आपल्या चुलत भावांना सोडवले. “ग्यास-उद्दीन” आणि “शहाबुद्दीन” यांनी सुटका होताच या दोघांनी “सैफ-उद्दीन”चा खून केला व राज्य स्वतःच्या हाती घेतले. विशेष म्हणजे या दोघांनी राज्याची वाटणी करून एकमताने राज्य केले. असे उदाहरण मुस्लिम राजवटीत एकमेव आहे. “ग्यास-उद्दीन” पश्चिमेकडील प्रांताचा कारभार पाहत होता तर “शहाबुद्दीन” पूर्वेकडील प्रांताचा भाग पाहत होता. “शहाबुद्दीन” पूर्वेकडे असल्याने त्याला भारतात यायचे होते. “ग्यास-उद्दीन” मात्र पश्चिम प्रांतात राहिला त्याने पूर्वेकडे कधीही लक्ष घातले नाही. पुढे इ. स. १२०२ साली “ग्यास-उद्दीन” मरण पावला आणि संपूर्ण राज्य “शहाबुद्दीन” कडे आले. शहाबुद्दीनने पुढे “महंमद” असे नाव धारण केले. आणि हाच तो “महंमद घोरी” उर्फ “शहाबुद्दीन घोरी” ज्याने इ. स. ११९२ च्या स्वारीत दिल्लीचा शेवटचा हिंदू राजा पृथ्वीराज चौहान यांचा अंत केला.

घोरींचा भारतावरच्या स्वाऱ्या नेमक्या कशा झाल्या आणि पृथ्वीराजांचा अंत कसा झाला हे आपण पुढच्या भागात पाहू.

#जागर_इतिहासाचा
#यावनी_आक्रमण
#अरब_तुर्क_आक्रमण
#प्रबल

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

0 comments on “यावनी आक्रमण: भाग – ४Add yours →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *