जर आपण भाग- ४ वाचला नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर आपणास तो वाचायला मिळेल.
भाग- ५ वाचण्या आगोदर भाग- ४ नक्की वाचून घ्यावा. भाग- ४ ची लिंक खाली दिलेली आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मागील भागात आपण गझनीच्या सबुक्तगीनच्या वंशाचा शेवट कसा झाला आणि गझनीवर घोरींची सत्ता कशी आली ते थोडक्यात पहिले. घोरी मंडळींनी ११५७ च्या आसपास गझनी जिंकून घोरी सुलतानांचे राज्य स्थापन केले. यांनी भारतावर जवळ-जवळ ५ ते प्रमुख स्वाऱ्या केल्या. “महंमद घोरी” उर्फ “शहाबुद्दीन घोरी” हा म्हणजे या भारताला पडलेले एक अत्यंत भयंकर स्वप्न. याने भारतावर ज्या स्वाऱ्या केल्या त्या भयानक होत्या. अरब व तुर्क सुलतानांच्या पूर्वीच्या आक्रमणाप्रमाणेच याचीही आक्रमणे होती. ज्यामध्ये हिंदूंच्या कत्तली, मंदिरांची जाळपोळ, मंदिरातील मूर्ती फोडणे, स्त्रियांवर अत्याचार असे प्रकार होते. इथे नावामध्ये घोळ निर्माण होऊ शकतो. गझनीचा ‘महमूद’ आणि त्याच्यानंतर ‘महंमद घोरी’ ज्याचे मूळ नाव ‘शहाबुद्दीन’ असे आहे. मागच्या भागात आपण गझनीच्या महमुदबद्दल पहिले जो सबुक्तगीनच्या वंशाचा होता. या भागात आपण शहाबुद्दीन म्हणजे महंमद घोरीबद्दल बोलत आहोत. या लेखामध्ये आपण त्याचे नाव शहाबुद्दीन घोरी असे घेऊ.
गझनीच्या महमूदाने ज्याप्रमाणे भारतावर ३० वर्षात १७ स्वाऱ्या केल्या आणि भारताची कंबर मोडून काढली त्याचप्रमाणे शहाबुद्दीन घोरीने सुद्धा भारतामध्ये धुमाकूळ घातला. काळ पहिला तर ११७६ ते १२०६ असा तो काळ होता. ज्यामध्ये संपूर्ण गझनीच्या सुलतान म्हणून तो १२०२ ते १२०६ जगला. आता त्याने ज्या स्वाऱ्या केल्या त्यापैकी आपणास दोनच स्वाऱ्या माहित आहेत ज्या मध्ये शहाबुद्दीन घोरी महाराजा पृथ्वीराज चौहान यांच्याशी लढला. आपण इथे आता त्याच्या सर्व स्वाऱ्यांचा तपशील थोडक्यात पाहू.
■ पहिली स्वारी ‘मुलतान’ (इ. स. ११७६):
हा पहिला हल्ला मुलतानवर होता. मुलतानवर हल्ला करून मुलतान ताब्यात घेतले आणि तिथून जवळच ‘ऊच’ नावाचा एक मजबूत किल्ला होता तो त्याने जिंकला. इथला जो राजा होता त्याचे नाव सापडत नाही परंतु त्याच्या बायकोने त्याला ठार मारले व महंमदाबरोबर तह केला असे म्हंटले जाते. परत जाताना शहाबुद्दीन घोरीने त्या राजाच्या मुलीशी लग्न करून तिला सोबत घेऊन गेला. हा राजा मुस्लिम होता असे सांगितले जाते.
■ दुसरी स्वारी ‘गुजरात व पंजाब भाग’ (इ. स. ११७८):
हा शहाबुद्दीन घोरीचा दुसरा हल्ला होता. इथे शहाबुद्दीनचा सामना सुलतान खुश्रू मलिकशी होता. काही इतिहासकार म्हणतात कि इथे शहाबुद्दीन घोरीचा पराभव झाला. आणि रियासतकार सरदेसाई म्हणतात की युद्ध झाले आणू शहाबुद्दीनने मलिकचा पाडाव करून त्याच्या मुलास बळजबरीने ओलीस धरून गझनीला परत गेला.
■ तिसरी स्वारी ‘सिंध’ ( इ. स. ११७९):
दुसऱ्या स्वारीनंतर लगेच पुढच्याच वर्षी शहाबुद्दीन घोरीने सिंध प्रांतावर हल्ला केला. या हल्ल्यात त्याने सिंध प्रांताची समुद्रकिनारपट्टी लुटली. या हल्ल्यामध्ये शहाबुद्दीन घोरी हा किती कपटी होता हे दिसून येते. झाले असे, सिंधची समुद्रकिनारपट्टी लुटून झाल्यावर तो गझनीला परत जात होता. परत जात असताना त्याने खुश्रू मलिकवर पुन्हा हल्ला करण्याचे ठरवले. पण यावेळी मलिक तयारीत होता. यावेळी मलिकने पंजाब प्रांताच्या पलीकडे गकर जमातीतील लोक राहत होते त्यांच्याशी सलोखा केला होता त्यामुळे मलिकची ताकद वाढली होती. यामुळे मलिकने शहाबुद्दीन घोरीला एकही किल्ला जिंकून दिला नव्हता वा राज्यात घुसायला संधी दिली नव्हती. ज्यावेळी घोरीला कळून चुकले की लढून मलिकला हरवणे कठीण आहे त्यावेळी त्याने एक डाव खेळला. “…. पश्चिमेकडून आपल्यावर शत्रू चालून येत आहे आणि त्याचा पाडाव करण्यासाठी तो मलिकशी तह करू इच्छितो….”. असा प्रस्ताव त्याने मालिकला पाठवला. इथे मलिक फसला. त्याने घोरीचा हा प्रस्ताव मान्य केला आणि या बदल्यात घोरीने त्याच्याकडे ओलीस असलेल्या मलिकच्या मुलाला सोडून देण्याचे मान्य केले होते. आपला मुलगा परत येणार म्हणून मलिक खुश होऊन अगदी बेसावधपणे घोरीला भेटायला गेला. तो भेटीसाठी जात असताना मलिकच्या एका मुक्कामी घोरीने त्याच्या छावणीवर हल्ला केला आणि मलिकला त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत अटक केले व गझनीला आपल्या भावाकडे म्हणजे ‘ग्यास-उद्दीन’कडे पाठवून दिले.
■ चौथी आणि पाचवी स्वारी: (अनुक्रमे इ. स . ११९१ आणि ११९२):
या स्वारीमध्ये शहाबुद्दीनचा सामना महाराजा पृथ्वीराज चौहान यांच्याशी झाला. या दोन्ही स्वारींबद्दल आपण पुढे बोलणार आहोत.
■ सहावी स्वारी ‘कनोज’ ( इ. स. ११९४)
पृथ्वीराज चौहान यांचा पराभव करून परत गझनीला जाताना शहाबुद्दीनने त्याचा एक गुलाम सरदार ‘कुतुबुद्दीन ऐबक’ याला भारताचा कारभारी म्हणून नियुक्त केले होते आणि त्याला भारतातच ठेवले होते. कनोजचा राजा ‘जयचंद राठोड’ ज्याने पृथ्वीराजांचा पाडाव करण्यासाठी शहाबुद्दीन घोरीला मदत केली होती. त्याला वाटत होते की शहाबुद्दीन घोरी त्याचा मित्र आहे. परंतु तसे नव्हते पृथ्वीराजांचा पराभव केल्यानंतर दोनच वर्षात शहाबुद्दीनने कनोजवर आक्रमण करून संपूर्ण कनोज लुटून काढले आणि राजा जयचंदचा पाडाव केला. कनोज हे शहर अतिशय धनाढ्य व सुंदर होते. कनोज शहर अक्षरशः त्याने जाळून टाकले. पुढे तो तसाच काशीला गेला आणि तेथे अगणित हिंदूंच्या कत्तली केल्या आणि मंदिरातून मुर्त्या नाहीशा करून टाकल्या, अनेक मंदिरे फोडली. ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी कनोज मधले अनेक राजपूत मंडळी कनोज सोडून मारवाडात पळून गेली. जोधपूरमध्ये नवीन राज्य स्थापन केले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ तत्कालीन राजपुतांची परिस्थिती:
एकंदरीत परिस्थिती व इतिहास पाहता असे दिसून येते की ज्यावेळी अरब व तुर्क वायव्य सरहद्दीवरून भारतात घुसले त्यावेळी उत्तरेत बऱ्यापैकी राजपूत राजे होते. ही यावनी आक्रमणे शक्यतो उत्तर भारतातच खूप झाली. यावनांना दक्षिण भारतात येण्यासाठी बराच काळ लागला. माझ्या अभ्यासानुसार अलाउद्दीन खल्जी (खिलजी) हा पहिला सुलतान जो दक्षिणेत आला. शहाबुद्दीन घोरीच्या वेळी भारतावर ज्या स्वाऱ्या झाल्या त्यावेळी उत्तर भारतात बरीच राजपूत राजे मंडळी होती. त्यापैकी काही मंडळी सलोख्याने राहत होती आणि काहींमध्ये कायमचे वैर होते. उत्तरेतील आणि मध्य भारतातील बहुतांशी भाग हा राजपुरतांकडे होता. यामध्ये, अजमीर येथे राजा सोमेश्वर (पृथ्वीराजांचे वडील), दिल्ली येथे अनंगपाळ (पृथ्वीराजांचे आजोबा), कनोज येथे जयचंद राठोड (पृथ्वीराजांचा मावस भाऊ) , मेवाड म्हणजे चित्तोडगडावर सामंतसिह, जेसलमीर (जसलमेर) येथे राजा भोजदेव, परमार, गुजरात भागात राजा भीमदेव असे काही महान राजे त्यावेळी होते जे आपापल्या प्रदेशावर राज्य करत होती. ‘मेवाड’ याचा मूळअर्थ ‘मध्यवाड’ म्हणजे ‘राजपुताण्याचा मध्यभाग’ असा होतो. ज्याची राजधानी चित्तोडगड होती आणि हल्लीची राजधानी उदयपूर आहे.
ही सर्व राज्ये अतिशय संपन्न व श्रीमंत होती. पराक्रमी होते. परंतु भोळेपणा, उन्मत्तपणा, अविचारीपणा, विलासमय जीवन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यावनांविषयी ते बेफिकीर राहिले. यावनांचे पराक्रम, महत्वकांक्षीपणा, त्यांचे विजय पाहून हे सर्व राजपूत राजे आश्चर्यचकित होत असत. यावनांवर ईश्वरी कृपा असल्याने त्यांना असे मोठे विजय अगदी सहजपणे मिळतात असे राजपुतांना वाटत असे. असे वाटणे साहिजकच आहे म्हणा, कारण हाती सापडलेल्या शत्रूवर दया दाखवून त्याला सोडून देणे, शरण आलेल्या शत्रूला जीवनदान देणे, शक्ती अपुरी पडत असेल तर मुत्सद्दीपणाने शत्रूस शिकस्त देणे, कपटीपणा या सर्व राजपुतांच्या डोक्याबाहेरील कप्ल्पना होत्या. आणि अगदी उलट म्हणजे हे सर्व यावनांकडे अगदी भरभरून होते. पुढे जाऊन, राजपुतांमध्ये आपापसातील भांडणे एवढी होती की एकवेळ शत्रू परवडला पण आपलीच माणसं नको असे यांचे विचार होते. एक परकीय आक्रमण येत आहे आणि ते नुसता लष्करी नसून धार्मिक सुद्धा आहे आणि याचा किती मोठा परिणाम या देशावर होणार आहे याची कल्पना त्यांना नव्हती आणि हे आक्रमन थांबविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे एवढी साधी बात एकाही राजपूत राजाला समजली नसावी याबद्दल आश्चर्य वाटते. यावर रियासतकार म्हणतात “भोळेपणा व अज्ञान हेच राजपुतांच्या नाशाला कारणीभूत पडले”.
इकडे संपूर्ण देश यावनांच्या हाती जातोय असे चिन्ह दिसत असताना राजपुतांमधील तिढा काय सुटत नव्हता. गुजरातचा जो राजा भीमदेव होता तो तसा पराक्रमी राजा होता. यानेच पृथ्वीराज यांच्या वडिलांना म्हणजे ‘सोमेश्वर’ यांना एका लढाईत पकडून ठार मारले होते. हे पृथ्वीराज चांगलेच जाणून होते आणि योग्य वेळेची प्रतीक्षा करत होते. भीमदेवाच्या समकालीन ‘जैत परमार’ राजा अबू येथे राज्य करत होता. जैत परमारला ‘इच्छनीकुमारी’ नावाची एक अतिशय रूपवान अशी मुलगी होती. राजा भीमदेवाने परमारला एक निरोप पाठवला, “आपली मुलगी आम्हास द्या अन्यथा युद्धास तयार रहा”. परमारने त्याचा हा प्रस्ताव धुडकावून लावला. यावेळी परमारने भीमदेवाचा पाडाव करण्यासाठी पृथ्वीराजाची मदत घेतली. इकडे पृथ्वीराज सुद्धा आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठीची संधी शोधत होते. या युद्धामध्ये भीमदेवाचा सपाटून पराभव झाला. हे युद्ध साबरमतीच्या काठी झाले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ राजा अनंगपाळ, राजा जयचंद आणि पृथ्वीराज:
दिल्लीच्या गादीवर राजा अनंगपाळ राज्य करीत होते (तुवर वंशीय विक्रमादित्याचा १९व वंशज). अनंगपाळला दोन मुली होत्या. पहिली ‘कमलादेवी’ जी अजमेरच्या सोमेश्वरला दिली होती. आणि ‘सोमेश्वर-कमलादेवी’ यांचा मुलगा म्हणजे पृथ्वीराज. म्हणजे अनंगपाळ हे पृथ्वीराजचे आजोबा. ज्यांचा पाडाव करून पृथ्वीराज यांनी दिल्लीचे राज्य जिंकले. आणि दुसरी मुलगी कनोजच्या राजा विजयपाळ याला दिली होती आणि त्यांचा मुलगा म्हणजे ‘जयचंद’. म्हणजे ‘पृथ्वीराज’ आणि ‘जयचंद’ हे दोघे मावस भाऊ होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ पृथ्वीराज चौहान आणि राणी संयुक्ता (संयोगिता):
पृथ्वीराज आणि संयोगिता यांची प्रेम कहाणी खूप रंगवून सांगितली जाते. अनेक इतिहासकारांनी आपापली मते मांडली आहेत. हे प्रेमप्रकरण दोन प्रकारे सांगितले जाते.
१) पृथ्वीराज चौहान यांनी दिल्ली जिंकून घेतली होती आणि आजूबाजूचा बराच प्रदेश जिंकला होता. त्यांच्या पराक्रमाचा डंका अगदी काबुल पर्यंत होता. जयचंद राठोडची मुलगी ‘संयोगिता’ जिने पृथ्वीराजांना कधी पहिलेही नव्हते पण त्यांच्या पराक्रमाचे गोडवे ऐकून ती त्यांच्या प्रेमात पडली होती. हे जयचंदला ज्यावेळी समजले त्यावेळी त्याने संयोगिताला बंदी बनवले. जयचंद हा पृथ्वीराजांवर नाराज असण्याचे कारण म्हणजे पृथ्वीराजांनी ‘राजसूय यज्ञास’ केलेला नकार. अनंगपाळ पडला आणि काही दिवसांनी जयचंदाने ‘राजसूय यज्ञ’. करण्याचे मनात आणले होते त्यासाठी त्याने सर्व राजपूत राजांना आमंत्रित केले होते ज्यामध्ये पृथ्वीराज सुद्धा होते. परंतु पृथ्वीराजांनी यास नकार दिला होता. जो जयचंदला अपमान वाटला. संयोगिता आपल्यावर प्रेम करते आणि ती कैदेत आहे हे कळताच पृथ्वीराज वेषांतर करून कनोजला गेले आणि त्यांनी तिला कैदेतून सोडवून आणले. फक्त या प्रकरणामुळे जयचंद आणि पृथ्वीराज यांच्यात युद्ध झाले ज्यामध्ये जयचंदाचा पराभव झाला आणि नाईलाजाने जयचंदाने आपल्या मुलीचे पृथ्वीराजाशी लग्न लावून दिले.
२) जयचंदाने आपली मुलगी संयोगिता हिच्या लग्नासाठी स्वयंवर आयोजित केला होता. यासाठी त्याने ‘अश्वमेधयज्ञ’ घेण्याचे ठरवले होते आणि या यज्ञातून तो स्वतःला भारताचा महाराजा घोषित करणार होता. (आता इथे “अश्वमेधयज्ञ” आणि “राजसूय यज्ञ” यामध्ये गफलत आहे) आणि या यज्ञाला पृथ्वीराजांचा विरोध होता. ठरल्याप्रमाणे स्वयंवर जो अश्वमेधयज्ञाच्या समाप्तीच्या मुहूर्तावर होता तो दिवस उजेडला. पृथ्वीराजाचा अपमान करायचे म्हणून पृथ्वीराजाचा पुतळा बनवून तो द्वारपालाच्या ठिकाणी ठेवला. दुसऱ्या बाजूला संयोगिताने हा सर्व प्रकार गुप्तपणे पृथ्वीराजांना पत्राद्वारे कळविला होता. ज्यावेळी संयोगिता हातामध्ये हार घेऊन पुढे सरकली त्यावेळी तिने पृथ्वीराजांचा पुतळा पहिला आणि तिने त्या पुतळ्याला हार घातला. त्याचवेळी पृथ्वीराज तिथे पोहचले आणि संयोगितेला घेऊन ‘इंद्रप्रस्ताकडे’ रवाना झाले. (इंद्रप्रस्थ हा आज एक दिल्लीचा भाग आहे).
मला दुसरी कहाणी म्हणजे काव्यरूपी दंतकथा वाटते. हे माझे वैयक्तिक मत आहे. कारण इतिहासाचे उदात्तीकरण करण्याचा हा एक प्रकार इथे दिसतो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ पृथ्वीराज चौहान आणि शहाबुद्दीन घोरी:
इतिहासातील हा एक वादाचा विषय. पृथ्वीराज चौहान आणि शहाबुद्दीन घोरी यांच्यामध्ये नेमक्या लढाया किती झाल्या हे आजही ठामपणे कोणी सांगत नाही. शहाबुद्दीन घोरीच्या दरबारी नियमितपणे इतिहास लिहिणारा कोणीही नव्हता आणि जे काही लिहिले आहे ते काव्य स्वरूपात आहे. पृथ्वीराजांचा इतिहास सुद्धा काव्यरुपात आहे. वेगवेगळ्या काव्यात वेगवेगळी माहिती मिळते. पण ११९१ आणि ११९२ सालची दोन युद्धे इतिहासात प्रसिद्ध झाली. वेगवेगळ्या काव्यांच्या आधारे खालील माहिती मिळते.
१) ‘पृथ्वीराजरासो’ काव्यामध्ये पृथ्वीराजांनी घोरीला तीन (३) वेळा हरवले व दंड देऊन सोडून दिले होते असे म्हंटले आहे.
२) ‘हम्मीर’ या महाकाव्यात पृथ्वीराजांनी घोरीला सात (७) वेळा कैद केले होते असे म्हंटले आहे.
३) ‘प्रबन्धकोश’ मध्ये पृथ्वीराजांनी घोरीला वीस (२०) वेळा कैद केले होते असे म्हंटले आहे
४) ‘सुर्जनचरित’ या महाकाव्यानुसार पृथ्वीराजांनी घोरीला एकवीस (२१) वेळा पकडून दंड दिला होता.
५) ‘प्रबन्धचिन्तामणि’ या ग्रंथानुसार पृथ्वीराजांनी घोरीला तेवीस (२३) वेळा पकडून दंड दिला होता.
वरील माहिती पहिली आणि एकंदरीत इतिहासाकडे आणि पृथ्वीराज चौहान यांच्याकडे पहिले तर घोरीला २३ वेळा पृथ्वीराज पकडून दंड घेऊन सोडून देतील असे मलातरी वाटत नाही. दुसरी गोष्ट जरी २३ लढाया झाल्या असतील तर पृथ्वीराज आणि घोरी आमने सामने सर्वच लढाईत असतील असे वाटत नाही. दोन्ही सैन्यांमध्ये वेगवेगळ्या सेनापतींच्या नेतृत्वाखाली अनेक युद्धे झाली असतील परंतु प्रत्येक लढाईत घोरी आणि पृथ्वीराज हे दोघेही उपस्थित असतील याची शक्यता कमी वाटते. ११८२-८३ च्या दरम्यान या दोन गटांमध्ये पहिले युद्ध सतलजच्या भागात झाले अशी नोंद हम्मीर या महाकाव्यात मिळते. पृथ्वीराजांनी घोरीला नेहमी हरवून त्याच्याकडून कर वसूल करून घेतला असे उल्लेख काही ठिकाणी मिळत असताना एकाही फारसी काव्यातून याला आधार मिळत नाही. परंतु राजस्थान राज्यातील ‘फलवर्धिका’ या शिलालेखांतून याला आधार मिळतो. फलवर्द्धिका या ठिकाणी फलौदीदेवीच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासमयी या शिलालेखाचे स्थापना १५५५ (११/१/१५५५) साली झाली होती. दरवर्षी पृथ्वीराजांचा मुलगा गझनीला कर वसूल करण्यासाठी जात असे आणि एकवेळ त्याच्यावर घोरीच्या सैन्याने आक्रमण केले आणि त्यामध्ये त्याचा अंत झाला.
असो, एकंदरीत वर्णनातून नेमके काय सत्य मानावे हे वाचकांनी ठरवावे. काव्यस्वरूपात जे लेखन झाले आहे ज्यामध्ये संस्कृत काव्ये आहेत आणि काही फारसी काव्ये आहेत ज्यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे नेमके कोणते खरे मानायचे हे समजणे कठीण आहे. परंतु पृथ्वीराज चौहान यांच्यासारखा राजा घोरीसारख्या शत्रूला २३ वेळा सोडून देतील हे नक्कीच पटण्यासारखे नाही. आणि त्यांचा मुलगा कर वसूल करण्यासाठी गझनीला जायचा हे तर अजिबात पटण्यासारखे नाही. कारण कर म्हणजे ‘खंडणी’ ही पोचवली जाते ती आणली जात नाही. आणि ज्या शिलालेखाचा उल्लेख वरती दिला आहे तो १५५५ सालचा आहे म्हणजे पृथ्वीराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ ३५० वर्षानंतरचा त्यामुळे यावर किती विश्वास ठेवायचा हे वाचकांनी ठरवावे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ शहाबुद्दीन घोरी आणि पृथ्वीराज यांची शेवटची दोन युद्धे:
संस्कृत आणि फारसी काव्याच्या आधारे या दोन्ही युद्धात हे दोन्ही नेते (शहाबुद्दीन व पृथ्वीराज) हजर होते असे म्हणता येईल. पण या दोन्ही लढायांची वर्णने सुद्धा अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडली आहेत. इथे आपण ती पाहू. ही वर्णने वाचताना वरती मी जे काही मांडले आहे ते ध्यानात ठेवा म्हणजे तर्क लावण्यास सोपे जाईल.
● पहिले वर्णन:
वरती <<पृथ्वीराज चौहान आणि राणी संयुक्ता (संयोगिता)>> या भागामध्ये पहिला मुद्दा, ज्यामध्ये पृथ्वीराज संयोगितेला पळवून घेऊन जातात आणि पुढे पृथ्वीराज आणि जयचंद यांच्यात युद्ध होते व जयचंद हरतो आणि नाईलाजाने तो आपल्या मुलीचा विवाह पृथ्वीराजांशी लावून देतो …” हे सांगितले आहे. जयचंदाचा पाडाव करून पुढे लगेच घोरीशी युद्ध झाले असे सांगितले गेले आणि यामध्ये घोरीचाही पराभव करून त्याला कैद करून इंद्रप्रस्थला घेऊन गेले. हे युद्ध झाले ११९१ साली. इथे जर तर्कच लावायचा झाला तर, संयोगितेचा स्वयंवर ज्यावेळी होता त्यावेळी सगळे राजपूत राजे तिकडे असणार हे घोरीने ओळखले असणार आणि याचा फायदा म्हणून तो दिल्ली, कनोज किंवा अजमेर यापैकी कोणत्या तरी किंवा तिन्ही राज्यांवर हल्ला करण्यासाठी भारतात आला असणार. पण पृथ्वीराज चौहान यांनी ऐनवेळी घातलेला राडा आणि अचानक जयचंद आणि पृथ्वीराज यांच्यातले युद्ध यामुळे घोरीचा गोंधळ झाला असणार आणि अचानक त्याला पृथ्वीराजांचा सामना करावा लागला असेल. असो, हा एक तर्क आहे.
● दुसरे वर्णन:
जयचंद हा पृथ्वीराजांवर चिडून होताच त्यामुळे कनोज आणि त्याचबरोबर पट्टण हे दोन्ही राज्ये पृथ्वीराजांचा पाडाव करण्याच्या तयारीत होते. पृथ्वीराजांची ताकद पाहता त्यांच्याकडून ते शक्य नव्हते हे त्यांनाही माहित होते. यासाठी त्यांनी घोरीकडे वकील पाठवून घोरीची मदत मागितली. आपापसातील भांडणाचा सूड घेण्यासाठी आपण शत्रूला घरात बोलावत आहोत याचा जराही विचार येथे झाला नाही. चित्तोडचा राजा “समरसिह रावळ” हा पृथ्वीराजांचा मेहुणा होता. पृथ्वीराजांनी कनोज, पट्टण आणि घोरीचा पाडाव करण्यासाठी चित्तोडची मदत घेतली आणि त्यांनी या तिघांचा सपाटून पराभव केला. घोरीला कैद केले आणि त्याच्याकडून ८००० घोडे आणि खंडणी घेऊन सोडून दिले.
● तिसरे वर्णन:
वरती <<तत्कालीन राजपुतांची परिस्थिती>> या भागामध्ये भीमदेव आणि जैत परमार यांच्यातील युद्ध आणि पृथ्वीराजांनी परमारला मदत केली आणि भीमदेव हरला हे सांगितले आहे. भीमदेवला या अपमानाचा बदला घ्यायचा होता आणि पृथ्वीराजांना संपवण्यासाठी त्याने घोरीला आमंत्रण दिले. गंमत बघा, हे युद्ध परमार आणि भीमदेव यांच्यात होणे अपेक्षित होते, परंतु झाले शहाबुद्दीन घोरी आणि पृथ्वीराज यांच्यात. यामध्ये पृथ्वीराज जिंकले आणि शहाबुद्दीनला काही घोडे, हत्ती खंडणीच्या स्वरूपात पृथ्वीराजांना द्यावे लागले आणि हे देऊन त्याने स्वतःची सुटका करून घेतली.
वरती ११९१ च्या पहिल्या युद्धाची तीन विविध वर्णने मी सांगितली आहेत. नक्की कोणते खरे यावर इतिहासकारांचे एकमत नाही. परंतु ११९१ ला ही लढाई झाली ज्यामध्ये शहाबुद्दीन घोरीचा सपाटून पराभव झाला हे मात्र नक्की.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
११९२ ला दुसरे युद्ध झाले ज्यामध्ये पृथ्वीराज चौहान यांचा पराभव झाला. या लढाईची सुद्धा अनेक वर्णने आहेत. अर्थात, इतिहासकारांचे इथेही एकमत नाही. याबद्दल नक्की इतिहासकारांची काय मतं आहेत हे पाहू.
●पहिले वर्णन:
पहिले युद्ध (११९१ चे) हे तरायनच्या मैदानात झाले. जिथे घोरीचा पराभव झाला आणि खंडणी भरून तो गझनीच्या दिशेने परत फिरला. युद्ध नेमके ११९१ च्या कोणत्या महिन्यात झाले हे माहित नाही. हे युद्ध संपताच पृथ्वीराज आपल्या फौजेनिशी दिल्लीला पोहचलेही नव्हते तोवर पुन्हा घोरीने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यावेळी पृथ्वीराज कुरुक्षेत्र याठिकाणी पोहचले होते. आणि हे दुसरे युद्ध कुरुक्षेत्र येथे झाले. ज्यामध्ये पृथ्वीराजांचा पाडाव झाला आणि त्यांना कैद करून घोरी गझनीला घेऊन गेला आणि पुढे जाऊन त्यांचे डोळे फोडले आणि मग पृथ्वीराजांनी शेवटची इच्छा म्हणून धनुष्य बाण चालवण्याची इच्छा व्यक्त केली आणि आपण आवाजाच्या दिशेने बाण मारू शकतो हे घोरीला सांगितले. हे ऐकून घोरी चकित झाला आणि याला त्याने परवानगी दिली. आणि यातच एक बाण पृथ्वीराजांनी घोरीला मारून त्याचा वध केला व स्वतःलाही संपवले.
● दुसरे वर्णन:
पृथ्वीराजांनी संयोगितेला स्वयंवरातुन पळवून नेले होते आणि या अपमानाचा बदला घेण्यासाठी कनोजचा राजा जयचंद याने घोरीला भारतात बोलवले. पृथ्वीराजांची सर्व युद्धकौशल्ये आणि डावपेच त्याने घोरीला सांगितली. घोरी आणि पृथ्वीराज यांच्यात युद्ध झाले आणि यामध्ये पृथ्वीराजांना कैद केले गेले. यामध्ये जयचंद किंवा त्याची सेना नव्हती. या वर्णनाचा कोणताही निश्चित पुरावा उपलब्द नाही त्यामुळे अनेक अभ्यासकांचे हा एक तर्क आहे असे मतं आहे.
● तिसरे वर्णन:
११९१ च्या युद्धात प्रभाव झाल्यानंतर अतिशय नैराश्य अवस्थेत शहाबुद्दीन गझनीला पोहचला. पुढे कधीही भारतावर स्वारी करायची नाही असे ठरवून त्याने आपल्या प्रदेशावर लक्ष दिले. परंतु पृथ्वीराजासमोर झालेला अपमान तो विसरू शकला नाही. त्याने आपला विचार बदलून पराभवाचा बदला घेण्यासाठी तो पुन्हा भारतात आला. यावेळी त्याने कनोज आणि इतर काही राज्यांशी संधान बांधले होते. इकडे पृथ्वीराजांनी सुद्धा अनेक राजपूत राजे एकत्र केले होते आणि घोरीला पूर्णपणे संपवायचे असे ठरवले होते. यावेळी पृथ्वीराजांची फौज जास्त होती त्यामुळे घोरीने पृथ्वीराजांवर सरळ चालून जाण्याचा विचार केला नाही. युद्ध झाले आणि घोरीची पीछेहाट झाली. पृथ्वीराजांचे सैन्य आता घोरीच्या सैन्याचा पाठलाग करू लागले. यामुळे पृथ्वीराजांचे सैन्य विसकटले गेले. याचा फायदा घेत घोरीचे सैन्य पुन्हा उलटे फिरून आले आणि राजपुतांची दाणादाण उडाली. दिल्लीचा सेनापती चामुंडराय मारला गेला. अनेक इतर राजपूत राजे मारले गेले. पृथ्वीराज त्यांच्या हाती सापडले व त्यांना लगेच ठार मारण्यात आले. म्हणजे पृथ्वीराजांना कैद करून गझनीला नेण्यात आले नव्हते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अशाप्रकारे शहाबुद्दीन घोरीच्या प्रमुख सहा स्वाऱ्या मला इथे मांडाव्याशा वाटल्या. यापैकी चौथी आणि पाचवी स्वारी म्हणजे ११९१ आणि ११९२ ज्यामध्ये शहाबुद्दीन घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यात युद्ध झाले. शहाबुद्दीन घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यात नेमकी किती युद्धे झाली याबद्दल इतिहासात कसा वाद आहे हे मी वरती मांडलेच आहे. परंतु ११९१ आणि ११९२ ही दोन महत्वाची युद्धे आहेत जी इतिहासात प्रसिद्ध आहेत आणि त्यावरही इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत ती ही इथे मांडण्याचा प्रयत्न केला. पुराव्या अभावी नेमके मतं आपण मांडू शकत नाही पण एकंदरीत राजकीय व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून काही तर्क मांडता येतील जी वाचकांनी आपापल्या पद्धीतीने मांडायची आहेत. तर्क म्हणजे नक्कीच खरा इतिहास नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ शहाबुद्दीनचा शेवट:
शहाबुद्दीनची शेवटची काही वर्षे ही अतिशय भयानक गेली. खारिजम म्हणजे खिवाच्या शहांशी त्याच्या तक्रारी वाढू लागल्या आणि त्याचे रूपांतर युद्धात झाले ज्यामध्ये शहाबुद्दीनचा पराभव झाला. दंड भरून तो कसाबसा त्यातून सुटला. इकडे काश्मीर-पंजाब हद्दीवर ‘गकर’ लोकांनी जे रानटी होते त्यांनी पंजाबवर हल्ला करून लाहोर, मांडिला अशी महत्वाची शहरे जिंकली. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शहाबुद्दीन इकडे आला व त्यांचा पाडाव करून त्यांना मुसलमान केले. नंतर शहाबुद्दीन पुढे जात असताना त्याची छावणी सिंधू नदीच्या काठी ‘रोहतक’ या गावी पडली होती. हवा येण्यासाठी त्याने सर्व तंबू उघडे केले. याचा फायदा घेत ‘गकर’ लोक नदीतून पोहत येत छावणीच्या ठिकाणी गुपचूप आले आणि त्यांनी पहिला सर्व पहारेकऱ्यांना मारले आणि नंतर शहाबुद्दीनचा खून केला. साल होते इ. स. १२०६.
शहाबुद्दीनला मूळ-बाळ नव्हते म्हणून ‘ग्यास-उद्दीन’चा मुलगा महंमूद हा गझनीच्या गादीवर बसला. पुढे शहाबुद्दीनचा पुतण्या महंमूद मरण पावल्यानंतर खारिजमच्या शहांनी गझनीचे राज्य घेतले. भारतातील मुस्लिमांचे राज्य ‘कुतुबुद्दीन ऐबक’ यांच्याकडे गेले. शहाबुद्दीन घोरी मरण पावल्यानंतरच कुतुबुद्दीन ऐबकने स्वतःला दिल्लीचा नवा सुलतान म्हणून जाहीर केले होते.
शहाबुद्दीन नक्कीच पराक्रमी होता परंतु प्रशासन व्यवस्थेत तो कमी पडला. त्याने भारतावर खूप आक्रमणे केली अनेक मुलुख जिंकला अगदी माळवा पर्यंत तो पोचला होता. भारताच्या कोणत्याही राजाला हे यावनी आपले राज्य हिसकावून घेतील अशी भीती फक्त शहाबुद्दीन घोरीच्या वेळेसच पडली. या आगोदर जी आक्रमणे झाली त्याचा मूळ हेतू लूट होता पण शहाबुद्दीन घोरीचा काळापासून हा हेतू बदलला गेला. स्वतःच्या राज्याची व राजधानीची प्रगती तो करू शकला नाही त्यामुळे त्याची कीर्ती त्याच्यानंतर फार दिवस राहिली नाही.
इकडे भारतात राजपूत राजांची अवस्था खूप दयनीय झाली होती. आपापसातील भांडणाचा सूड घेण्यासाठी जयचंद राठोड सारख्या अनेक राजपुतांनी देशाच्या शत्रूची मदत घेतली, कनोजच्या सेनेमध्ये अनेक मुसलमान भरती होते. पृथ्वीराजांच्या प्रत्येक हालचालींची बातमी घोरीपर्यंत पोहचत होती. पैशाच्या किंवा संपत्तीच्या लोभाने राष्ट्रद्रोह होऊ लागला. जातीवाद आणि शत्रूचा अभ्यास न करणे त्यामुळे शत्रूचा पराक्रम म्हणजे दैवी शक्ती अशा समजुती राजपुतांनामध्ये पसरू लागल्या. परिणामी, एवढी मोठी व जुनी राजघरान्यांचे राज्य अगदी पत्याच्या पानांच्या इमारतीसारखे ढासळून गेले आणि खऱ्या अर्थाने यावनी राजवट भारतावर सुरू झाली.
सोबत काही फोटो पोस्ट केले आहेत जी काल्पनिक आहेत. प्रत्येक फोटोची माहिती त्याच्या कप्शन मध्ये दिली आहे.
कुतुबुद्दीन ऐबक आणि त्याचा इतिहास आपण पुढच्या भागात पाहू.
0 comments on “यावनी आक्रमण: भाग – ५” Add yours →