गुलाम घराण्याची वंशावळ

यावनी आक्रमण: भाग – ६

जर आपण भाग- ५ वाचला नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर आपणास तो वाचायला मिळेल.

भाग- ६ वाचण्या आगोदर भाग- ५ नक्की वाचून घ्यावा. भाग- ५ ची लिंक खाली दिलेली आहे.

यावनी आक्रमण: भाग – ५

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मागील भागात आपण पहिले की, शहाबुद्दीन उर्फ महंमद घोरी याने केलेली आक्रमणे कशी होती, आणि विविध काव्यस्वरूपातील त्याच्या आक्रमणाबद्दल केलेल्या नोंदी आणि यामुळे होणार गोंधळ कसा होता हे पाहिले. शहाबुद्दीन घोरी आपल्या लक्षात राहिला तो म्हणजे पृथ्वीराज चौहान यांच्यामुळे. कारण या दोघांचा झालेला संघर्ष म्हणजे दिल्लीवर कायमस्वरूपी यावनांच्या सत्तेला झालेली सुरवात. पृथ्वीराज चौहान यांचा पराभव करून गझनीला परत जाताना शहाबुद्दीनने त्याचा एक गुलाम सरदार ‘कुतुबुद्दीन ऐबक’ याला भारताचा कारभारी म्हणून नियुक्त केले होते आणि त्याला भारतातच ठेवले होते ज्याने दिल्लीमध्ये आपली सत्ता स्थापन केली.

‘ऐबकांचा’ काळ ज्याला इतिहासामध्ये गुलाम वंशीयांचा काळ असे म्हंटले जाते. यांचा काळ हा इ. स. १२०६ पासून ते इ. स. १२८८ पर्यंतचा आहे. या ८२ वर्षांच्या काळात अनेक सत्ताधारी होऊन गेले ज्यामध्ये अल्तमश, नासिरुद्दीन महंमूद, बल्बन (हा घोरी घराण्यातला नसून नासिरुद्दीनचा वजीर होता) यांनी जास्त काळ म्हणजे २०-२५ वर्षे राज्य केले. ज्याने दिल्लीवर सत्ता स्थापन केली तो मात्र चारच वर्षे सत्ता भोगू शकला, तो म्हणजे ‘कुतुबुद्दीन ऐबक’. १२०६ ते १२१० कुतुबद्दीनने दिल्लीचा सुलतान म्हणून राज्यकारभार पहिला.

■ कुतुबुद्दीन ऐबक (इ.स. १२०६ ते १२१०):

कुतुबुद्दीन हा एक गुलाम होता. लहान असताना त्याला कोणीतरी पळवून आणले होते. खुरासानची राजधानी निशापूर येथील एका माणसाने त्याला विकत घेतले व त्याचा सांभाळ केला आणि त्याला शिक्षण दिले. विकत घेतलेल्या माणसाचे निधन झाल्यावर त्याला एका व्यापाऱ्याने विकत घेतले आणि नंतर शहाबुद्दीन घोरीच्या स्वाधीन केले. बराच काळ कुतुबुद्दीन हा शहाबुद्दीन सोबतच राहिला. कालांतराने त्यांच्यामध्ये अगदी मैत्रीपूर्व संबंध निर्माण झाले. शहाबुद्दीनने त्याला सरदार बनवले व अनेक मोहिमांचे नेतृत्व त्याच्याकडे दिले. कर्तृत्वाच्या जोरावर त्याने खूप नाव कमवले. शहाबुद्दीनने त्याला भारताचा प्रतिनिधि म्हणून नेमले होते. त्यावेळी त्याने दिल्ली हे आपले मुख्य ठाणे बनवले होते. शहाबुद्दीनच्या मृत्यूनंतर कुतुबुद्दीनने स्वतःला हिंदुस्थानचा स्वतंत्र सुलतान म्हणून घोषित केले. यामुळे हिंदुस्थान म्हणजे फक्त लुटीचे केंद्र ही संकल्पना संपली आणि, आता इथे एक स्वतंत्र सुलतान राज्य करू लागला होता ज्यामुळे लुटीच्या हेतूने जी भारतावर सारखी आक्रमण होत होती त्याला आळा बसला कारण आता कुतुबुद्दीनला स्वतःचे राज्य राखणे गरजेचे होते. त्याने शहाबुद्दीनच्या बाकीच्या अनेक सरदारांशी नाते जोडले. स्वतःच्या मुलींची लग्ने त्याने त्यांच्याशी लावून दिली. त्याच्याच बरोबरीचा गझनीचा सरदार ‘एल्डोझ’ याच्या मुलीशी कुतुबुद्दीनने लग्न केले. अशा प्रकारे त्याने चारी बाजूने ताकद कमावली आणि हळू-हळू मीरत, बनारस, काल्पी, बिना, ग्वालेर अशी ठिकाणे त्याने जिंकून घेतली. दिल्ली जिंकून घेण्यासाठी ‘एल्डोझ’ने कुतुबुद्दीनवर आक्रमण केले होते परंतु त्याचा त्यामध्ये पराभव झाला व कुतुबुद्दीनने गझनीपर्यंतचा भाग जिंकून घेतला. कालांतराने ‘एल्डोझ’ने पुन्हा तो भाग जिंकून घेतला व कुतुबुद्दीनला दिल्लीला परत यावे लागले.

१२१० सालापर्यंत कुतुबुद्दीनने दिल्लीवर सुलतान म्हणून राज्य केले. ‘चौगन’ हा खेळ खेळताना (ज्याला आपण आज ‘पोलो’ म्हणतो) घोड्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला. ‘हसन निजामी’ हा त्याच्या दरबारी असणारा एक माणूस ज्याने कुतुबुद्दीन हा खूप दानशूर आणि न्यायी होता असे नमूद करून ठेवले आहे. त्याच्या या स्वभावामुळे त्याला ‘लखवक्ष’ म्हणजे ‘लक्ष दान देणारा’ असे नाव पडले होते. दिल्लीची ‘जुम्मामशीद’ प्रथम त्यानेच बांधली. त्यानंतर राज्यात त्याने अनेक मशिदी बांधल्या (मशिदीसाठी लागणारे दगड हे मंदिरे पाडून आणली होती). दिल्लीमध्ये एक उंच असा दगडी विजयस्तंभ त्याने बांधायला सुरु केला होता जो त्याच्या काळात बांधून पूर्ण झाला नाही. त्या विजयस्तंभाला आपण आज ‘कुतुबमिनार’ म्हणून ओळखतो. याचे बांधकाम पुढे जाऊन त्याचा जावई ‘अल्तमश’ याच्या कारकिर्दीत पूर्ण झाले. या विजयस्तंभाचे नाव ‘कुतुबमिनार’ ठेवायचे हे कुतुबुद्दीन ऐबकने स्वतःच्या नावावरून नाही तर एक मुस्लिम संत ‘कुतुबुद्दीन बख्तियार’ यांच्या नावावरून ठरवले होते, ज्यांना कुतुबुद्दीन ऐबक गुरु मनात होता. म्हणून पुढे जाऊन अल्तमशने याचे बांधकाम जरी पूर्ण केले असले तरी त्याचे नाव बदलले नाही.

कुतुबुद्दीनला एक मुलगाही होता. त्याचे नाव ‘आरम’ होते. कुतुबुद्दीनच्या मृत्यूनंतर पुढे दोन वर्ष सत्तेसाठी ‘आरम’ आणि ‘अल्तमश’ मध्ये संघर्ष चालला ज्यामध्ये आरमचा पराभव झाला व १२१२ साली अल्तमश रितसर दिल्लीचा सुलतान झाला.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

■ अल्तमश (इल्तमश) (इ.स. १२१२ ते १२३५):

आरमला बाजूला करून अल्तमश गादीवर आला होता. अल्तमशने १२१२ ते १२३५ असा मोठा काळ दिल्लीचा सुलतान बनून कारभार केला. या काळात त्याने अनेक प्रदेश जिंकला. १२२४ ला त्याने सिंध प्रांतावर हल्ला करून नसिरुद्दीनचा पराभव केला. १२२६ साली अल्तमशने माळवा प्रांत जिंकला व मांडव (मांडू) किल्ला जिंकला. १२३१ साली त्याने ग्वालेरचा किल्लाही जिंकला.

अल्तमशच्या काळात भारताचा आणि चंगेज खानाचा संबंध आला. तो कसा हे आपण पाहू.

१२२१ साली खारिजम (ख्वारिझम, म्हणजे आजच्या उझबेकिस्थान, तुर्कमसीस्थान आणि अफगाणिस्तानचा काही भाग) चंगेजने जिंकला. तिथला सुलतान महंमद याचा अतिशय क्रूरपणे पराभव केला. महमंद हा कॅस्पियन समुद्राच्या कोणत्यातरी बेटावर अतिशय हालअपेष्टा सोसून मरण पावला असे रियासतकार म्हणतात. त्याचा मुलगा जलालूद्दीन याने चंगेजचा सामना करण्याचा प्रयत्न केला परंतु चंगेजला रोखणे त्याला शक्य झाले नाही. चंगेज पाठलाग करत असताना त्याने आपल्या घोड्यासकट पोहून सिंध नदी पार करून भारतात प्रवेश केला. त्याने अल्तमशला आसरा मागितला पण जलालूद्दीनला आसरा देणे म्हणजे चंगेजला भारतात बोलावणे असेच आहे हे अल्तमश जाणून होता म्हणून त्याने त्याला आश्रय दिले नाही आणि काही प्रमाणात चंगेजला खुष ठेवण्याचा प्रयत्न केला.

अल्तमश आश्रय देत नाही हे पाहून जलालूद्दीन सिंधमध्ये नसिरुद्दीनकडे गेला व तिथे आश्रय घेतला ज्याचा पराभव अल्तमशने १२२४ साली केला. यामुळे चंगेजखानाने या भागात अनेक आक्रमणे केली आणि तो त्या भागात अडकून राहिला आणि भारत चंगेजखानाच्या आक्रमणापासून दूर राहिला. सिंध नदी ओलांडणे अवघड जात आहे हे दिसताच चंगेज खारिजममध्ये इतर भागात आक्रमणे करत राहिला आणि सिंध प्रांत त्याने पूर्ण चाळून काढला. याचा परिणाम म्हणजे सिंध नदीच्या पलीकडे भारताची सीमा संपली. हा भाग जिंकून भारतात प्रवेश करायचा असा विचार चंगेजचा होता परंतु १२२६ साली चंगेजखानाचा मृत्यू झाला आणि बलाढ्य मंगोल साम्राज्य त्याच्या दोन मुलांमुळे विभागले गेले.

पुढे जाऊन अल्तमशने गुजराथ वगैरे भागात स्वाऱ्या केल्या पण त्याला जास्त यश मिळाले नाही. इवाज नावाच्या एका मुस्लिम माणसाने ‘सुलतान गियासुद्दीन’ हे बिरुद लावून बंगाल व बिहार भागात आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले होते. १२२६-२७ साली अल्तमशच्या मुलाचा आणि इवाजचा लखनौजवळ संघर्ष झाला आणी इवाजचा पराभव केला. यात तो मारला गेला.

अल्तमश कट्टर मुस्लिम होता आणि खूप धार्मिक होता. आपण इस्लामचा अंश असल्याचे दाखवण्यात खूप धन्यता मानत होता. १२२९ साली त्याने बगदादाच्या खलिफाकडून स्वतःसाठी बादशाही पोशाख मागवले. आणि खलिफाच्या आदेशाने त्याने स्वतःला हिंदुस्थानचा बादशहा म्हणून घोषित केले. १२३५ साली अल्तमशचा मृत्यू झाला.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

■ ‘रझिया सुलतान’ / ‘सुलताना रझिया’ (इ.स. १२३६ ते १२३९):

अल्तमशचा मृत्यू झाला आणि राजकीय वातावरण तसे पेटत गेले. याचे कारण म्हणजे अल्तमशच्या शेवटच्या काळात त्याला सतावत असलेली एक चिंता. त्याला माहित होते की आपल्यानंतर आपला एकही मुलगा राज्य सांभाळण्याच्या लायकीचा नाही परंतु आपली मुलगी रझिया ही खूप मुत्सद्दी व हुशार आहे व ती राज्यकारभार अगदी व्यवस्थितपणे सांभाळू शकेल याची खात्री अल्तमशला होती. परंतु एक स्त्री अंतर्गत राजकारण आणि बाहेरील शत्रू अशी दोन्ही आव्हाने कशी सांभाळेल याची काळजीही त्याला होती. परंतु त्यांने तिलाच गादीचा वारसदार म्हणून नेमले आणि इ.स. १२३६ साली रझिया दिल्लीच्या गादीवर आली जिला आज आपण ‘रझिया सुलतान’ किंवा ‘सुलताना रझिया’ म्हणून ओळखतो.

तिचा कार्यकाळ हा खूप कमी आहे म्हणजे तीन वर्षांचा आहे. रझिया सुलतान नक्कीच हुशार आणि दूरदृष्टी असणारी होती. दरबारात सुद्धा खूप अंतर्गत राजकारण होते. अल्तमशच्या काळात तुर्की सरदारांचा एक गट होता ज्यांना अल्तमशच्या मृत्यूनंतर आपल्या तालावर नाचणारा प्रशासक हवा होता. या गटाला ‘चालिसा’ किंवा ‘चहलगानी’ या नावाने ओळखले जात होते. रझिया गादीवर बसल्यावर त्यांचा हेतू सफल होईल असे त्यांना वाटत होते. पण रझिया जरी स्त्री असली तरी ती एका पराक्रमी पुरुषासारखी वागत असे. दरबारात ती पुरुषांचा पोशाख घालून पडदा न घेता बसत असे. तिचा सुलतान म्हणून ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांच्या बंडाविरुद्ध तिने शस्त्र उचलले व त्यांना पळवून लावले. यापैकी एक म्हणजे दिल्लीचा वजीर ‘निझाम-उल-मुल्क जुनैदी’.

रझियायचा इतिहास खूप रोमांचकारी आहे. तिनच वर्षांची कारकीर्द आहे परंतु अतिशय पराक्रमी व काबील-ए-तारीफ इतिहास आहे. पण रझियाच्या इतिहासात तिचा अंत तिच्या प्रेमप्रकरणामुळे झाला असे सांगितले जाते. याबद्दल इतिहासकारांची दोन मते आहेत.

१) एका हबशी गुलामावर तिचे मन बसले आणि तिने त्या गुलामाला कारभारात आणले व संपूर्ण राज्यकारभार त्याच्या हाती दिला. हे पाहून दरबारातील अनेक सरदारांनी तिच्या विरुद्ध बंड पुकारले. यामध्ये तिच्यात आणि बाकीच्या सरदारांमध्ये चकमक झाली आणि त्यामध्ये हबशी गुलाम मारला गेला व रझिया कैद झाली. अल्तुनिया (आल्टूनिया) सरदारांच्या नजरकैदेत ती होती. चालाकीने तिने त्यांच्यापैकी एकाशी लग्न केले.या नवरा-बायकोनी इतर सरदारांशी दोन निकराच्या लढाया केल्या पण त्यांचा पराभव झाला आणि यामध्ये दोघेही मारले गेले.

२) एक स्त्री शासक म्हणून रझियाला सुरवातीपासून अंतर्गत विरोध होताच. अशा परिस्थितीत एक निष्ठावंत सेनेची तुकडी तयार करणे हे कोणत्याही शासकाचा मनसुबा असतोच. रझियाने सुद्धा हेच केले. आपल्याशी एकनिष्ठ अशा सरदारांचा एक गट तयार करण्याचा प्रयत्न तिने केला ज्यामध्ये याकूतखान या हबशी सरदाराला तिने एका उच्चपदावर नेमण्याचा निर्णय घेतला. याकूतखान हा तुर्की नव्हता त्यामुळे अनेक तुर्की सरदारांनी यावेळी रझियाला विरोध केला. तिच्यावर हबशी सरदाराशी जास्त जवळीकता दाखविल्याचा आरोप केला आणि तिच्याविरुद्ध उठाव झाले. या उठावाची सुरवात ‘लाहोर’ आणि ‘सरहिंद’ येथून झाली. लाहोरचा उठाव रझियाने मोडून काढला परंतु सरहिंद येथे तिचा पराभव झाला. या पराभवाचे मुख्य कारण होते अंतर्गत वाद ज्यामध्ये याकूतखान मारला गेला व रझियाच्या सेनेचा पराभव झाला आणि तिला कैद करण्यात आले, तिला तबरहिंद (भटिंडा) येथे कैदेत ठेवण्यात आले. पुढे तिने अल्तुनियाच्या एका सरदाराला आपल्या बाजूने वळवून घेऊन त्याच्याशी लग्न केले व पुन्हा दिल्लीवर स्वारी केली. परंतु यामध्ये ती हरली व जीव वाचवण्यासाठी जंगलात पळून गेली व तिथे लुटारुंच्या टोळीने तिला मारून टाकले. इ.स. १२३९ साली तिचा अंत झाला.

एक पराक्रमी, व्यवहारी आणि मुत्सद्दी स्त्री एका गुलामांच्या प्रेमात पडून त्याच्याकडे सगळा राज्यकारभार देईल हे कोणत्याही अंगाने पटण्यासारखे नाही. कदाचित त्यावेळी तिची बदनामी करून तिच्याविरुद्ध लोकांना भडकवण्याचा प्रयत्न तुर्की सरदारांनी केला असेल ज्यांना ती सुलतान म्हणून अगदी सुरवातीपासून नको होती.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

■ मोइझ-उद्दीन बहराम (इ.स. १२३९ ते १२४१):

१२३९ ला रझियाचा मृत्यू झाला आणि तिचा भाऊ बहराम गादीवर आला. दोनवर्षे हा सुलतान म्हणून राहिला. ज्या लोकांनी याला गादीवर बसवले तेच त्याच्या जीवावर उठले होते. सुलतान झाल्यावर याने अनेकांची कपटाने कत्तल केली. शेवटी याला यखत्यारुद्दीन नावाच्या त्याच्याच दिवानाने कैद करून ठार मारले. तो १२४१ साली मेला.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

■ अला-उद्दीन मसूद (इ.स. १२४२ ते १२४६):

हा १२४२ साली गादीवर आला. हा बहुरामचा पुतण्या. फिरोजशहाचा मुलगा. हा बंड्या एकदम ऐषोआरामात राहणारा आणि क्रूर होता. राज्यकारभारात अजिबात लक्ष नव्हते. सरदारांच्या जीवावर राज्य टिकले होते. याच्या काळात मंगोलांनी दोनवेळा भारतावर आक्रमण केले पण तिथल्या सरदारांनी त्यांना परतवून लावले. याच्या या ढिसाळ कारभारामुळे लोकांनी त्याचा चुलता नासिरुद्दीन महंमूद यास गादीवर बसवले. मसूदने १२४२ ते १२४६ असे चारच वर्षे सुलतान म्हणून राज्य केले.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

■ नासिरुद्दीन महंमूद (इ.स. १२४६ ते १२६६):

हा अल्तमशचा मुलगा. अतिशय साधा आणि शांत स्वभावाचा हा माणूस होता. लहान असताना तो बंगालचा सुभेदार म्हणून काम करत होता, परंतु त्याच्या सावत्र आईने त्याला बंदी बनवले होते. पुढे मसूदने त्याची सुटका केली. बंदिवासात असताना कुराणाच्या नकला करून तो विकत असे आणि आपला उदरनिर्वाह करत असे. याला एकच पत्नी होती. स्वतःला तो राज्याचा मालक नाही तर रक्षक समजून राज्यकारभार करत असे. त्यामुळे राज्याच्या पैशातून विलासी जीवन जगणे त्याला मान्य नव्हते.

त्याने त्याच्या काळात सर्व बंडखोर सरदारांना बाजूला करून चांगल्या माणसांची नेमणूक केली. वायव्य दिशेकडून मंगोलांचा धोका पाहून त्याने तिथला बंदोबस्त चोख ठेवला. नर्मदा नदीच्या बाजूची छोटी-मोठी राज्ये जिंकून त्यांने स्वतःच्या राज्याला जोडली. माळवा, बुंदेलखंड अशी समृद्ध राज्ये त्याने दिल्लीला जोडून घेतली. ‘ग्यास-उद्दीन बल्बन’ नावाचा हुशार वजीर त्याच्या पदरी होता. अतिशय विश्वासाने त्याने बल्बन वर राज्यकारभार सोपविला होता. नासिरुद्दीनचा दयाळू स्वभाव पाहून मध्यआशियातले अनेक राजे मंगोलांना कंटाळून त्याच्या दरबारी येऊन राहिले होते. असा हा दयाळू आणि शांत स्वभावाचा सुलतान एका आजाराने १२६६ साली मरण पावला. याला मुलगा नव्हता त्यामुळे याच्या मृत्यूनंतर राज्य बल्बनच्या हाती गेले.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

■ बल्बन (इ.स. १२६६ ते १२८६):

नासिरुद्दीन महंमूद १२६६ साली मरण पावला आणि बल्बन म्हणजे त्याचा वजीर गादीवर आला. हा सुद्धा एक गुलाम होता. मंगोलांनी याला पळवून नेऊन एका व्यापाऱ्याला विकले होते. पुढे त्याची विक्री होत होत अल्तमशच्या पदरात पडला होता. अल्तमशला खुश ठेवण्यासाठी त्यांने अनेक हिंदू लोकांची बंड मोडण्यास पुढे आला. रझियाविरुद्धच्या कटात हा सामील असल्याने तो कैदेत पडला होता. पुढे बहुरामच्या कारकिर्दीत त्याने अनेक ठिकाणी कारभारी म्हणून काम केले. पुढे मग नासिरुद्दिनच्या काळात तो वजीर म्हणून काम पाहू लागला.

बल्बनने राजसत्तेची प्रतिष्ठा व सामर्थ्य वाढवण्यास नेहमीच प्रयत्न केले. त्याचबरोबर त्याने तो गुलामवंशी असल्याने स्वतःची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम सुद्धा चालू ठेवले. यासाठी त्याने तो एक इराणचा पौराणिक राजा आफ्रासियाब याचा वंशज असल्याचे घोषित केले. उच्च व प्रतिष्टित मंडळींना त्याने दरबारात नेहमी स्थान दिले आणि तुर्की सरदारांना जवळ धरले. स्वतः उच्चवर्णीय असल्याचे दाखवण्यासाठी तो खालच्या कुळातील लोकांचा अतिशय तिरस्कार करत असे. असे म्हंटले जाते की “ज्या ज्या वेळी तो खालच्या कुळातील माणसाला पाहत असे त्यावेळी क्रोधाने त्याचा हात आपोआप तलवारीकडे जात असे”. बल्बनने कधीही कोणाला सत्तेमध्ये भागीदार होऊ दिले नाही. एका बाजूला त्याने उच्चवर्गीयांना जवळ धरले आणि दुसरीकडे सामान्य जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे न्यायदान केले. कधीही सामान्य माणसाला न्यायदानाच्या बाबतीत नाराज केले नाही. मंगोलांची भीती त्यालाही होती त्यामुळे त्याने नव्या दमाची फौज नेहमी तयार ठेवली.

त्याकाळात लुटारूंचा खूप त्रास असे. त्यामुळे व्यापाऱ्यांना याचा खूप त्रास होत असे. बल्बनने अनेक जंगले तोडून, चांगले रस्ते बांधले. राजपूत बंडखोरांना पराभूत करून त्यांचे किल्ले पाडून टाकले. अनेक ठिकाणी अफगाणांच्या वस्त्या बसवल्या व तेथे सैनिकांना राहण्याचा सल्ला दिला जेणेकरून व्यापाऱ्यांना प्रवासात लुटारूंचा त्रास होऊ नये व त्यांचे रक्षण व्हावे.

इ.स. १२८६ ला बल्बनचे निधन झाले. नासिरुद्दीनच्या काळात वजीर म्हणून २० वर्षे कारकीर्द व स्वतः सुलतान म्हणून वीस वर्षे, असा ४० वर्षे त्याने राज्यकारभार त्याने पहिला. १२८३ मध्ये तैमूरशहाने बल्बनच्या मुलखावर हल्ले चढवले होते. स्वतः म्हातारा झाल्याने त्याने आपला लाडका मुलगा महंमूद यास त्याच्यावर पाठवले. १२८५ साली दीपलपूर येथे जबरदस्त लढाई झाली ज्यामध्ये महंमूदचा विजय झाला. तैमूरशहाचा पाठलाग करत असताना तो दूरवर गेला असे त्याला वाटले आणि महंमूद परत फिरला व मंगोलांनी अचानक परत वार केला आणि त्यामध्ये महंमूदचा मृत्यू झाला.

उच्चवर्णीयांना जवळ धरणे व बाकीच्यांचा तिरस्कार करणे यामुळे समाजातील अनेक मंडळी त्याच्यावर नाराज होते. यामुळे त्याच्या मृत्यूनंतर नाईक ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

■ कैकुबाद (इ.स. १२८६ ते १२८८):

कैकुबाद हा बल्बनचा नातू. बल्बनला दुसरा उलगडू होता ‘बोगराखान’ जो बंगालच्या कारभारावर होता. बापाच्या मृत्यूसमयी त्याने बापाजवळ येऊन राहण्याची पर्वा केली नाही म्हणून बल्बनने महंमदाच्या मुलास म्हणजे ‘कैखुस्त्रू’ यास गादीवर बसवण्याचे आपल्या मृत्युपत्रात लिहिले होते. परंतु उमरावांनी बोगराखानच्या मुलास म्हणजे ‘कैकुबाद’ला गादीवर बसवले. हा खूप विलासी होता. याच्या या वागण्याने सगळीकडे अंदाधुंदी माजली होती. दरबारात खल्जी (खिलजी) सरदारांनी बंड पुकारला होता. खल्जी सरदारांचा म्होरक्या ‘जलालुद्दीन खल्जी’ याने एक दिवस कैकुबाद नशेत असताना त्याचा खून केला व त्याचे तुकडे करून यमुना नदीत फेकून दिले, आणि त्याच्या मुलासही मारून दिल्लीचे राज्य बळकावले.

कैकुबादच्या मृत्यूने १२८८ साली गुलामवंशाचा शेवट झाला. १२०६ पासून ते १२८८ पर्यंतचा हा जवळजवळ ८२ वर्षांचा काळ आहे ज्याला मुस्लिम इतिहासकार ‘घोरच्या सुलतानाचे गुलाम’ असे म्हणतात जो इथे मी संक्षिप्त स्वरूपात मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला.

१२८८ साली खल्जी घराण्याने दिल्लीची सत्ता हाती घेतली. यामध्ये ‘अला-उद्दीन खल्जी’ इतिहासात जास्त प्रसिद्ध झाला.खल्जी घराण्याचा इतिहास आपण पुढच्या भागात पाहू.

सोबत काही फोटो दिले आहेत आणि त्यांच्या कप्शनमध्ये फोटोबद्दलची एका ओळीत माहिती.

गुलाम घराण्याची वंशावळ
गुलाम घराण्याची वंशावळ
गुलाम घराण्याने स्थापन केलेल्या व काबीज केलेल्या राज्याचा नकाशा
गुलाम घराण्याने स्थापन केलेल्या व काबीज केलेल्या राज्याचा नकाशा
खारिजमचा आजचा भाग
खारिजमचा आजचा भाग
कुतुबुद्दीन ऐबक याचे काल्पनिक चित्र
कुतुबुद्दीन ऐबक याचे काल्पनिक चित्र
रझिया सुलतान हिचे काल्पनिक चित्र
रझिया सुलतान हिचे काल्पनिक चित्र
अल्तमशचे काल्पनिक चित्र
अल्तमशचे काल्पनिक चित्र
बल्बनचे काल्पनिक चित्र
बल्बनचे काल्पनिक चित्र

#जागर_इतिहासाचा
#यावनी_आक्रमण
#अरब_तुर्क_आक्रमण
#प्रबल

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

0 comments on “यावनी आक्रमण: भाग – ६Add yours →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *