भानगड.. राजस्थानातील अलवार जिल्ह्यातील हा प्रसिद्ध किल्ला. गौरवशाली इतिहासापेक्षा भुताटकीच्या रहस्यमय घटनांमुळे हा किल्ला आज प्रसिद्ध आहे.नक्की यामध्ये किती तथ्य आहे हे सुद्धा एक रहस्यच आहे. कारण, या किल्ल्यामध्ये भुतं राहतात हे ज्यांनी ज्यांनी सांगितले त्यांनी ते फक्त ऐकीव गोष्टींवरून सांगितले आहे. ज्यांना या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही त्यांनी या किल्ल्यावर मध्यरात्री भटकंती केली व विडिओ शूट केले. त्यांना कुठेही भूत किंवा त्यासंदर्भातील वेगळे अनुभव आले नाहीत. असे अनेक विडिओ युट्युबवर उपलब्द आहेत. भुताटकीच्या गोष्टींमुळे हा किल्ला संध्याकाळी ६ नंतर बंद असतो. अगदी पुरातत्व विभागाचे कर्मचारी सुद्धा इथे थांबत नाहीत. आम्ही ज्यावेळी तिथल्या स्थानिक लोकांशी याबद्दल विचारपूस केली त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आम्ही इथे पिढ्यानपिढ्या राहतो पण आमच्यापैकी कोणालाच कसला अनुभव आला नाही”.
किल्ल्याचा थोडक्यात इतिहास:
________________________
राजा भारमल हा अलवारचा राजा. जिला एक मुलगी ‘जोधा’ जिचे लग्न मोगल बादशहा अकबर याच्याशी झाले होते. यांचा मुलगा भगवान दास. भगवान दासाला दोन मुलं, ‘माधोसिंग’ आणि ‘मानसिंग’. भगवान दासांनी माधोसिंग साठी भानगड हा किल्ला बांधला. माधोसिंगचा मुलगा ‘चित्रसिंग’. चित्रसिंगाला दोन मुलं ‘अजबसिह’ आणि ‘रत्नावती’.
अजबसिह जो माधोसिंगचा नातू तो मोगलांच्या चाकरीत होता ज्याने अजबगड नावाचा किल्ला बांधला.
मानसिंगचा नातू, राजा जयसिंग ज्याने ‘जयपूर’ शहराची स्थापना केली. म्हणजे अजबसिह आणि जयसिह हे आपल्या महाराजांच्या समकालीन. भानगडचा राजा जयसिहने अजबगडवर आक्रमण केले व किल्ला जिंकला.
हा झाला एकदम थोडक्यात इतिहास.आता भानगडच्या भुताटकीची नक्की काय भानगड आहे हे पाहू. खरतर यावर दोन कहाण्या आहेत. ज्याला काही मंडळी दंतकथा म्हणतात.
पहिली कहाणी अशी, गुरुबालकनाथ हा एक साधू होता जो भानगड मध्ये रहायचा. त्याची इच्छा होती की तो ज्या ठिकाणी राहतो त्या इमारतीपेक्षा गडावर दुसरी कोणतीही इमारत नसावी. कारण माझ्या घरावर कोणा दुसऱ्याच्या घराची सावली पडली नाही पाहिजे असे त्याचे म्हणणे होते. काही काळ त्याच्या ही इच्छापूर्ती झाली व गडावर एकही अशी इमारत उभी केली नाही जी त्याच्या राहत्या इमारतींपेक्षा मोठी असेल.अजबसिंहाने एक दिवस हि परंपरा मोडीत काढली व गडाच्या बालेकिल्ल्याची इमारत वाढवली. आज्जी इमारत आहे ती दोन-तीन माजली दिसते परंतु ती सात माजली होती असे सांगितले जाते. अजाबसिहांच्या या कृत्यानंतर साधूने शाप दिला की हे शहर ओसाड पडेल इथे मनुष्य राहणार नाहीत. म्हणून काही लोकांचे मानणे आहे की या शापामुळे हा किल्ला ओसाड पडला.
दुसरी कहाणी अशी, अजबसिहांची रत्नावती नावाची एक बहीण होती. ती दिसायला खूप सुंदर होती. तिच्या सुंदरतेची कीर्ती सर्वत्र पसरली होती. एक तांत्रिक बाबा होता जो काळ्या जादूसाठी फेमस होता. त्याचे नाव कुठे सापडत नाही. तो तिच्या सौंदर्यावर भाळला आणि प्रेमात पडला. पण रत्नावती त्याला मिळणार नाही याची जाणीव त्याला होती म्हणून त्याने काळ्या जादूच्या मदतीने एक अत्तर बनवले जे लावल्याने रत्नावती स्वतः त्याच्याकडे येणार होती. रत्नावतीच्या एका दासीला फितूर करून त्याने ते अत्तर दासीच्या मार्फत रत्नावतीपर्यंत पोचवले पण तंत्रिकाचा हा डाव रत्नावतीच्या लक्षात आला. तिने ती अत्त्तरची बाटली फेकून दिली. ही बाटली जिथे फुटली तिथे एक मोठा दगड तयार झाला आणि तो त्या तंत्रिकाचा अंगावर येऊन पडला ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. मरताना त्याने शाप दिला की हे शहर ओसाड पडेल इथे मनुष्य राहणार नाहीत आणि रत्नावती मला मिळाली नाही म्हणून माझी आत्मा नेहमी या किल्ल्यावर भटकत राहील. आणि आज भानगडावर असणारे भूत म्हणजे याच तांत्रिकाची आत्मा असे मानले जाते.
वास्तविक या घटनांना कोणताच ऐतिहासिक पुरावा किंवा आधार नाही त्यामुळे याला आपण दंतकथा म्हणू शकतो.
गडावर खूप वास्तू आहेत ज्या चांगल्या स्थितीमध्ये आहेत. गडाला लाहोरी दरवाजा, अजमेरा दरवाजा, हनुमान दरवाजा, फुलवारी दरवाजा आणि दिल्ली दरवाजा असे एकूण पाच दरवाजे आहेत. आज पर्यटक हनुमान दरवाज्यातून किल्ल्यामध्ये प्रवेश करतात. किल्ल्यामध्ये प्रवेश करताच जोहरी बाजार लागतो जिथे असंख्य प्रमाणात समकालीन दुकानांच्या बांधकामाची अवशेष आहेत. गडावर हनुमान मंदिर, मंगलादेवी मंदिर, केशवराय मंदिर, गणेश मंदिर, सोमेश्वर मंदिर इत्यादी मंदिरे आहेत. गडाच्या गाडी शेवटी उंचीवरती राजमहाल आहे ज्याला बालेकिल्ला असे म्हणतात. राजमहालाच्या डाव्या बाजूला डोंगरावर एक बांधकाम आहे जो त्याकाळी टेहाळणी बुरुज होता ज्याला आज काही मंडळी दंतकथेमधील साधूच्या राहण्याची जागा असे म्हणतात. बांधकाम पाहता क्षणी तो टेहाळणी बुरुज आहे हे लक्षात येते. गडाला भली मोठी तटबंदी आहे जी गडाचा पुढचा भाग सुरक्षित ठेवते व गडाच्या बाकी तिन्ही बाजूला मोठेमोठे डोंगर आहेत आणि या डोंगराच्या पुढे सर्वत्र जंगल पसरले आहे. इथेच आज सारिस्का व्याघ्र प्रकल्प आहे. गडावर अनेक अवशेष आहेत जी आजही बऱ्यापैकी चांगल्या स्थितीमध्ये आहेत.
एक गोष्ट या किल्ल्यावर आज लै आवडली. किल्ल्याच्या एकदम मध्ये म्हणजे मुख्य महालाकडे जाताना दरवाज्यात एक काकू माठामध्ये पाणी गजेऊन बसते आणि जाता येता लोकांना पिण्यासाठी पाणी देत असते. यासाठी ती एक रुपया घेत नाही. पर्यटक जे स्वतःहुन देतील ते ती घेते. पाणी पिण्यासाठी ना ग्लास असतो ना कसलं भांड. हाताची ओंजळ करून उभं रहायचं ज्यामध्ये ती पाणी ओतते आणि आपण प्यायचं. गडामध्ये कुठेही पाण्याची बाटली विकत मिळत नाही. गडावर प्लास्टिक नको परंतु पर्यटकांना पाणी मिळावे म्हणून या काकू इथे पाणी घेऊन बसतात.
अतिशय सुंदर आणि मोठा किल्ला आहे. एकदा तरी हा किल्ला नक्की बघावा. भव्यता काय असते हा किल्ला पाहिल्यावर लक्षात येते. सुंदर आणि रेखीव बांधकाम आहे किल्ल्याचे. हनुमान गेटमधून प्रवेश केल्यावर लगेच उजव्या हाताला हनुमान मंदिर आहे जिथे एक पुजारी आहेत. भूतांबद्दल ज्यावेळी त्यांना विचारले त्यावेळी त्यांनी हा सगळा प्रकार चुकीचा आहे, भूत वगैरे इति काही नाही. रात्री इथे थांबणे धोक्याचे आहे कारण आजूबाजूला घनदाट जंगल असल्याने रात्री जंगली प्राण्याची भीती खूप असते त्यामुळे इथे रात्री रहाणे धोक्याचे असते.
भानगडला जायचा मार्ग जयपूरपासून जवळ आहे. जयपुरवरून भानगड अंदाजे ९० किलोमीटर आहे. भानगड गाव छोटे असून तिथे राहण्याची म्हणावी तेवढी उत्तम सोया नाही त्यामुळे भानगडच्या आगोदर ३० किलोमीटर दौसा नावाचे गाव आहे जिथे राहणायसाठी उत्तम हॉटेल्स भेटतात.
0 comments on “भानगड (भानगढ) आणि रहस्य” Add yours →