मुलभूत माहिती:
- प्रकार – सोपा
- ट्रेकचे अंतर : ७-8 किलोमीटर
- पुण्यापासून ८० किलोमीटर
- ट्रेकचा दिवस : ९ ऑगस्ट २०१४
- मार्ग : पुणे-कोल्हापूर हायवे – पहिला टोलनाका – भोर फाटा – कोर्ले गावं
किल्ले रायरेश्वर … कोणी याला किल्ला म्हणेल … कोणी पर्वत… कोणी डोंगर … पण काय कोणास ठाऊक , बऱ्याच दिवसापासून हे ठिकाण हुलकावणी देत होते … याच्या आजू बाजूला कित्ती फिरलो असेल माहित नाही पण एकदाही जायचा योग नाही आला…
किल्ले रायरेश्वर.. म्हणलं की खुपच भावनिक होतो माणूस … लगेच ३-४ शतके पाठीमागे जातो… कितीतरी विचार डोक्यामध्ये किलबिल करू लागतात .. कितीतरी विचारांनी डोके हैराण होऊन जाते …
एक १६ वर्ष्याचा मुलगा ६-७ सवंगड्यांना बरोबर घेतो काय … रायरेश्वराच्या महादेवाच्या मंदिरात जातो काय … स्वताच्या हिंदवी स्वराज्याची शपथ घेतो काय … त्याकाळी बऱ्याच लोकांना वाटले असेल काय ही पोरं … काय खेळ मांडला आहे … कदाचित लोकं हसलीही असतील… पण तो बाळ “शिवबा” .. काय त्या शिवबाच्या डोक्यात आले असेल … पण तो खेळ नव्हता … तो एक अट्टहास होता मराठी तितुका मिळवण्याचा .. तो एक नव्याने मांडलेला स्वराज्याचा डाव होता … कोणालाही वाटले नसेल की हे १६ वर्ष्याचे पोर जो या रायरेश्व्राच्या डोंगरावर शपथ घेण्यासाठी आलं आहे … ते उड्या जाऊन या हिन्दुस्थानचा “छत्रपती” बनेल…. आज “शिवबा” म्हणून हाक मारणारे उड्या “छत्रपती शिवाजी महाराज” म्हणून मुजरा करतील !!!!
भावना उफाळून आणणारा … छाती अभिमानाने फुगवणारा .. त्याच बरोबर डोळ्यात आनंदाचे अश्रू आणणारा इतिहासाचा साक्षीदार म्हणजे “किल्ले रायरेश्वर” !!!
रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर प्राचीन व पांडवकालीन असून मराठा रियासतेच्या इतिहासात याला खूप पवित्र स्थान आहे. याचे कारण म्हणजे हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक राजा शिव छत्रपती यांनी वयाच्या १६ व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती.
रायरेश्वर गड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून गडाचा विस्तार १६ किलोमीटर लंबित पसरला आहे. रायरेश्वर मंदिराजवळ सर्वोच्च माथ्याची टेकडी आहे. माथ्यावरून चौफेर दृश्य दिसते. उत्तरेला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर डोंगर दिसतात. तसेच प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगड दिसतात. येथे ५-७ विविध रंगाची माती आढळते. पश्चिमेकडे नाखिंदा टोक म्हणजेच नाकेखिंडाचे रोमांच उभे करणारे विहंगम दृश्य पहावयास मिळते.
शेवटी तो दिवस उजेडला … माझा जीवाभावाचा सहकारी “राकेश सरदेसाई” याला हाक दिली आणी माझा हा भाऊ आजारी असताना सुद्धा माझ्याबरोबर येण्यास तयार झाला ….
सकाळी ७ ला आम्ही पुणे सोडले … आणी पुणे-कोल्हापूर हायवे धरला … पहिला टोलनाका गेला की ८-१० किलोमीटर वर भोर फाटा लागतो .. तिथून उजवीकडे ३५ किलोमीटर वर कोर्ले गावं लागते जिथून रायरेश्वर ची मोहीम सुरु होते.
वाटेत जाताना अतिशय सुंदर वातावर … असे वाटत होते जसे माझा हा रांगडा सह्याद्री धुक्याची चादर ओढून बसला आहे आणी हसत हसत आमचे स्वागत करीत आहे … फोटो काढण्याचा मोह आवरला नाही…..
आजपर्यंत मला सह्यादी फिरण्यास साथ दिलेले दोनच ..
१) राकेश सरदेसाई (राक्या)
२) आणि माझी ७ सिटर अल्टो… इतक फिरलो पण कधी पंचरसुद्धा झाली नाही
रस्ता विचारत-विचारत आम्ही कोर्ले गावाच्या जवळ पोहचलो …. एक आजोबा भेटले त्यांना विचारलं…
“आज्जा … रायरेश्वर कुठ हो ???”…
आज्जा म्हणाले … “त्यो बघा त्यो … रायरेश्वरचा किल्ला….!!!
शेवटी आम्ही गावात पोचलो आणी एका ठिकाणी गाडी लावली .. १० वाजता आम्ही किल्ला चढण्यास सुरवात केली … यावेळी आम्ही दोघेच होतो …
एकंदरीत कच्चा रस्ता होता … डोंगरातून… जंगलातून चढाई नव्हती… कच्चा रस्ता तुडवत जायचा होता … वाटेवर नं कोणता ट्रेकर होता ना कोणता गुराखी होता … आम्ही दोघंच !!!
३-४ वेळा तर वाटले बरोबर चाललोय ना??? कारण आज्जांनी तर हात करून दाखवलेला किल्ला तर मागे राहिला आणी आपण वेगळ्याच मार्गाने चाललोय… पण विचारायला वाटेवर कोणीच नव्हते .. म्हणलं चल, चालत रहा .. कुठेतरी कोण तर भेटलंच ..
जात असताना डाव्या बाजूला “केंजळगड” सारखा दिसायचा … नागासारखी फनी काढून गडी उभा होता बघा .. म्हणले या शानदार गड्याचा एक शानदार फोटो काढूच !!!
राकेशचा आणी माझा एक अनुभव आहे आजपर्यंत कोणत्याही ट्रेक ला चूक नाही झाली … महाराजांची नजर आहे आपल्यावर …. कोणतरी भेटेल… बस चालत राहणे ..
शेवटी कच्ची वाट संपली आणी चांगला रस्ता लागला … मग तर लयच टेन्शन आल… म्हणलं राक्या भावा.. कुठ चाललोय आपण ?? राक्या म्हणला चल भावा आता माग भी जाता नाय येत
थोड पुढ गेलो तर झोपडी सारख काहीतर दिसलं… म्हणलं असेल कोणीतरी .. त्यांना आपण विचारू… मग आपलं बिगी-बिगी चालाय लागलो… जरा पुढे गेलो तर बोर्ड दिसला….
आपल्या माहितीसाठी … रायरेश्वर ला जाताना नेहमी लोकं कोर्ले गावातून चालत जातात … ट्रेकिंग ला म्हणून ठीक आहे… जर तुम्ही कुटुंबियांना घेऊन जाणार असाल … तर रायरेश्वर घाटात आता चांगला रस्ता झाला आहे तुम्ही ४ चाकी गाडी घेऊन जाऊ शकता .. तुम्ही या घाटातून गेला तर तुम्ही अगदी गडाच्या जवळ जाता… फोटो मध्ये जर पहिले तर बोर्ड नंतर उजवीकड वळण दिसतय तिथे तुम्ही गाडी लाऊ शकता तिथून उजवीकडे चालत गेला (३० मिनिट) तर रायरेश्वर किल्ला आणी डावीकडे (१ तास चालन) गेला तर केंजळगड…
या घाटात जाण्याचे दोन मार्ग …
१) कोर्ले गावं — वेळी गावं — रायरेश्वर घाट
२) वाई — धोम — आसरे — रेणावळे — खावूली मंदीर — रायरेश्वर घाट
काय सांगता राव … बोर्ड बगून “लय भारी” वाटलं… वरील फोटो मध्ये जर पहिले तर उजवीकड वळण दिसतय… तितन बघा लगेच वळण घेऊन किल्ल्याकड वाट होती…. आणी जस मी म्हणालो … महाराजांची नजर आहे आपल्याकड … लेकरांना महाराज भटकू देणार नाहीत याची १००% खात्री होती…
आणी आम्हाला दगडू जंगम भेटला… अस वाटले महाराजांनीच त्याला पाठवलं बघा … दगडू आला …
मी दगदडूशी बोलत होतो तर माझा भाऊ दरीच्या नाजुला जाऊन काय माहित काय विचार करत होता .. वाटले नेहमी प्रमाण आपलं बोलत असल सह्याद्रीसंग …
मलाच वाटले कदाचीत हा सह्याद्रीला विचारत नसेल ना की…
कसा आहेस रे तू हे सह्याद्री… कधी समजणार मी तुला … कधी कळणार तू मला…
सह्याद्री म्हणाला असेल… … “तुझ्या विचारांच्या पल्याडला आहे मी “सह्याद्री””
मी फोटो काढे पर्यंत दगडूनफोन करून चटणी भाकरीची जुळणी लावली .. मग जरा कड्यावर बसून शेंगदाण्याच्या पोळ्या खाल्ल्या ..
बसल्या बसल्या दगडून आजू बाजूच्या परिसराची ओळख करून दिली….सरळ पुढे केंजळगड दिसत होता … उजव्या हाताला कमळगड डोके काढून उभा होता.. त्याच्या बाजूला नवरा-नवरी गड … डाव्या बाजुला मांढरदेवीचा डोंगर …. दाट धुके होते त्यामुळे फोटो नाही काढता आला … तरीपण प्रयत्न केला
फोटो काढून … खाऊन पिऊन आम्ही गडाकड जायला सुरवात केली …
दगडू म्हणाला … १५ मिनिट चालायचं … मग २५० पायऱ्या चढायच्या … मग थोड्या लोखंडी पायऱ्या चढायच्या … मग पोचलो बघा गडावर :)… पाऊस एकदम मजबूत सुरु झाला … जमल तस फोटो काढण् सुरु होत … म्हणलं प्रमुख प्रमुख गोष्टी तर टिपल्या पाहिजेत… पायऱ्या … लोखंडी पायऱ्या
पायऱ्या चढून शेवटी पोचलो बघा गडावर …. मस्त पठार वरती… पिवळी फुले होती… दगडू म्हणाला कास पठारावर जी फुल असतात ती सगळी फुल असतात बघा… गणपती नंतर या… मग बघा कसा स्वर्गच नांदत असतो इथ….
….
१०-१५ मिनिट चालत गेलो आणी एक मोठ्ठा पाझर तलाव दिसला …
थोड्याच अंतरावर एक छोटी पाण्याची टाकी दिसली…. ज्यामध्ये गोमुखातून पाणी पडत होते … असे म्हणतात की हे पांडव कालीन आहे … आणी महादेवाच्या मंदिराच्या खालून पाण्याचा जो उगम आहे ते पाणी येथे येते …. हेच पाणी गडावर जी ४० घरे आहेत ते लोकं पिण्यासाठी वापरतात …
इथून पुढे गेलो आणी ते मंदीर दिसले बघा….
इथेच झाला बघा “स्वराज्याचा” अठ्ठाहास सुरु…
इथेच घेतली माझ्या राजान स्वराज्याची शपथ !!
शपथ घेऊन महाराजांनी स्वराज्याचा डाव जर मंडला नसता,
तर आज आपला सगळा डाव विस्कळीत झाला असता !!!
मंदिरात गेलो … बराच वेळ बसलो … मंदिराचा कानाकोपरा पहिले… पुज्यार्याला बोलून पूजा केली… आणी ती पवित्र जागा जिथे महाराजांनी शपथ घेतली होती…. व्हा….. काय बोलावे …..
दर्शन घेऊन ,,, पूजा करून ,,, आम्ही दगडूच्या घरी निघालो .. दगडूच्या म्हातारीन मस्त नाचणीची भाकरी, पिटल आणी ठेचा केला होता… भूक पण ज्याम लागली होती …. रस्त्यात पोर पाण्यात साप मारत होती … त्या देखन्यांनचे फोटो काढले
दगडूच्या घरी पोचलो… हात धुतले … तोपर्यंत म्हातारीन जेवाय वाडलं … मस्त जेवण केले….
जेवण करून मग आम्ही दगडूला निरोप देऊन परतीचा प्रवास सुरु केला…. परत येताना मात्र वातावरण साफ होते… धुके नव्हते , पाऊस नव्हता…. १ तासाभरात आम्ही खाली पोचलो…. खाली येताना मात्र भरपूर फोटो काढले….
ज्यावेळी पुण्यासाठी निघालो तर मला एक घराचा दरवाजा दिसला ज्यावर एक मोठे महाराजांचे चित्र लावले होते … असे मी पहिल्यांदाच पहिले …. कोणी घरावर लक्ष्मीचा फोटो लावतो … कोणी गणपतीचे लावतो … पण त्या गड्याने छत्रपतींचे मोठा फोटो लावला होता … रस्त्यावरून चाललेल्या एका मुलीला म्हणले त्या घराचे दर पूर्ण बंद कर मला एक फोटो घायचा आहे … तिने घरातील एका बाईला बोलून दर बंद करून घेण्यास सांगितले आणि मी एक फोटो घेतला …
खुप छान, तुमच्या लेखा मुळे बरीच माहिती आम्हाला मिळाली. वाचतांना असं वाटायला लागलं की आम्ही स्वतः प्रवास व गड चलात आहेत.
खुप छान वाचून आनंद झाला.
जय शिवराय.