बादशहा अकबर, म्हणजे मोगलांचा एक कर्तृत्ववान आणि सर्वधर्मसमभाव वृत्तीचा बादशहा असा उल्लेख केला जातो. अकबराच्या सर्वधर्मसमभाव वृत्तीवर अनेक इतिहास अभ्यासकांचे एकमत होत नाही. यावर, श्री. नरहर कुरुंदकर म्हणतात,
“जे मुसलमान आहेत, मुस्लिम धार्मिक विचारसरणीला मनाने बांधले आहेत त्यांना अकबराकडे पाहणे सोपे आहे. ते सरळ अकबराचा तिरस्कार करू शकतात. जे हिंदुत्ववादी राजकारणाचे पाईक आहेत, त्यांच्यासाठीही प्रश्न सोपा आहे. अकबर काय आणि औरंगजेब काय, शेवटी दोघेही मूलसमानच. हिंदू राज्यकर्ते खासच नाहीत. तेव्हा सारखेच द्वेष्टे असे मानणे त्यांना सोपे आहे. अकबराच्या मूल्यमापनाबद्दल जर अडचणी येत असतील तर त्या प्रामाणिकपणे विचार करणाऱ्या सेक्युलर हिंदूंना येतात”.
असो….
बादशहा अकबर दिल्लीच्या तख्तावर बसल्यावर १५६०-६१ साली दरबारातील एक घटना घडली जी खूप महत्त्वाची आहे. या घटनेतून अकबराचे वयक्तिक, राजकीय आणि भावनिक बाबतीतील अनेक गुणधर्म दिसून येतात आणि त्याच्या अनेक स्वभाववैशिष्ट्यांवर प्रकाश पडतो.
१५६०-६१ साली, आग्र्याच्या दरबारातून तीन महत्वाच्या मोहिमा आखल्या गेल्या,
१) काश्मीर स्वारी, जी पूर्णपणे अपयशी ठरली.
२) बिहारमधील अफगाणांविरुद्ध मोहीम, जी यशस्वी ठरली.
३) माळव्याच्या सुलतानाविरुद्ध केलेली स्वारी, जी यशस्वी ठरली.
इथे आपण आज जरा या तिसऱ्या मोहिमेबद्दल जरा बघू.
माळव्याचा सुलतान ‘बाज बहाद्दर’, पराक्रमी असा सुलतान होता परंतु आज बाज बहाद्दर अनेकांना माहीत आहे ते म्हणजे त्याच्या आणि राणी रुपमतीच्या प्रेमकथेमुळे. राजपुतांच्या इतिहासात अनेक ठिकाणी पराभव प्रेमकथमध्ये लपवला गेला आहे, हे काही नवीन नाही.
_____________________________
अधमखां आणि मुल्ला पीर महंमदखां यांच्या नेतृत्वाखाली मोगल सेनांनी माळव्यावर आक्रमण केले. काही इतिहासकार म्हणतात की, बाज बहाद्दर बेसावध होता. काही इतिहासकार म्हणतात की, मोगल सैन्य येत आहेत हे ऐकताच बाज बहाद्दर घाबरून गेला. कारण काही जरी असले तरी, सारंगपूरच्या झालेल्या युद्धात बाज बहाद्दरचा दारुण पराभव झाला. बाज बहाद्दर खानदेशाच्या दिशेने पळून गेला.
मोगल सैन्य शहरात शिरले. शहराची भयंकर लूट झाली. अधमखांने बाज बहाद्दरच्या जनानखान्यातील अनेक स्त्रिया पकडून आणल्या. मुल्ला पीर मात्र कत्तली करण्यात व्यस्त होता. इथे एका गोष्टीवर लक्ष देणे महत्वाचे आहे. मोगलांनी ज्या कत्तली केल्या त्या त्यांच्या नेहमीच्या क्रूरतेचाच भाग होता जो अकबराच्या आगोदर ही होता आणि अकबराने तीच क्रूर परंपरा चालू ठेवली, की मीर मुल्ला आणि अधमखां यांनी अकबराच्या आदेशाविरुद्ध जाऊन कार्य केले? इतिहासकारांचे यावर वेगवेगळी मतं आहेत. यावर बदायुनी लिहितो,
“विजयाच्या दिवशी दोन्ही सेनापती (अधमखां आणि मुल्ला पीर) रणांगणावरच उभे राहिले आणि युध्यकैद्यांच्या तुकड्यामागून तुकड्यांची क्रूरपणे कत्तल करण्यात आली. एका कैद्याची भरदार गर्दन पाहून, चेहऱ्यावर स्मितहास्य उमटवत मुल्ला पीर म्हणाला, “काय गर्दन आहे ! यातून रक्त उसळेल ते एखाद्या कारंज्यासारखे !!… कांदे, मुळे, काकड्या कापाव्यात तशी माणसे कापलेली मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे”
पुढे बदायुनी लिहितो,
“मुसलमान कैदी, मोठमोठे शेख, सय्यद आणि त्यांच्या बायका यांना खोक्यात भरून (पोत्यात घालून) उज्जैन व इतर ठिकाणी नेण्यात आले. ज्यावेळी यातील काही लोकं मुल्ला पिरला हातात कुराण घेऊन भेटायला आले तेव्हा त्या सगळ्यांना मुल्ला पीरने ठार मारले व जाळून टाकले.” हे मारलेले मूलसमान हे सुन्नी पंथाचे होते, कट्टर शिया असलेल्या मुल्लासाठी ते काफिरच होते. त्यांना मारणे हे बदायुनीला पसंद आले नाही कारण तो स्वतः सुन्नी पंथाचा होता. परंतु, मूर्तिपूजक हिंदूंना मारणे हे बदायुनीच्या धर्माप्रमाणे योग्य होते.
अधमखांला राणी रुपमती पाहिजे होती त्यामुळे तो तिला शोधत होता, परंतु राणी रुपमतीने विष पिऊन आत्महत्या केली. कदाचित खऱ्या प्रेमाची हीच शिक्षा तिला मिळाली असेल कारण, बाज बहाद्दर आणि रुपमतीच एकमेकांवर एवढे प्रेम होते की बाज रुपमतील सोडून पळून गेला. ती मात्र एकटी राहिली आणि निकराची वेळ येताच तिच्यापुढे स्वतःला संपविण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
विजयाची बातमी मिळताच अकबर बादशहा मात्र सगळं सोडून सारंगपूरला निघाला. त्याचा वेग एवढा होता की पाच-सहाशे किलोमीटरचे अंतर (आग्रा ते सारंगपूर) त्याने सोळा दिवसात पार केले. आता इथे अकबराला सगळं सोडून सारंगपूरला येण्याची गडबड का होती? हा महत्वाचा प्रश्न आहे. अकबर सारंगपूरला येईल याची कल्पनासुद्धा अधमला नव्हती. त्याच्यासाठी हे सरप्राईजच होते. अकबर सारंगपूरला येतोय ही बातमी अधमखांच्या आईने म्हणजे “महाम अनगा”ने पाठवलेल्या निरोपाच्या आधीच अकबर पोचला. (महाम अनगा ही अकबराची दाई होती, अकबराचे तिच्यावर खूप प्रेम होते, अधमखांला अकबर आपल्या भावासारखा मानत होता असे इतिहासकारांनी मांडले आहे).
सारंगपूरला पोचल्यावर अकबराने अधमखांच्या घराच्या गच्चीवर मुक्काम केला. हे अबू फजल याने नोंद केले आहे. पुढे जो अबू फजल लिहितो ते महत्वाचं आहे. तो लिहितो,
“अधमखांला, अकबर आपल्या जनानखान्यावर डोळा ठेवून आहे ही शंका आली होती, जर अकबराने काही गैरप्रकार केल्यास अधमखां त्याला (अकबराला) ठार मारणार होता”.
पुढे काय झालं? तर, अकबर चार दिवस तिथे राहिला, लुटीचा सर्व तपशील घेतला, जनानखान्यातील निवडक स्त्रिया बरोबर घेतल्या. तोपर्यंत अकबराच्या जनानखान्याबरोबर अधमखांची आई महाम अनगा सारंगपूरला पोचली.
आता गंमत बघा, लुटीचे सामान आणि जनानखान्यातील निवडक स्त्रिया घेऊन अकबर गडबडीने आग्र्याकडे निघाला. वाटेत अधमने त्यातील दोन सुंदर स्त्रिया पळवल्या. अकबराला ज्यावेळी हे कळले त्यावेळी त्याने त्या दोन स्त्रियांचा शोध घेण्याचा आदेश दिला. आपल्या मुलाचा हा पराक्रम जर अकबराला समजला तर तो आपल्या मुलाला ठार मारेल या भीतीने महाम अनगाने त्या दोन स्त्रियांचा खून घडवून आणला.
अकबराचा नेमका अधमखांवर किती विश्वास आणि प्रेम होते याचा आपण विचार करू शकतो.
_____________________________
या प्रकरणानंतर अकबराने दरबारात एक महत्वाचा निर्णय घेतला. त्याने, त्याचा विश्वासू “शम्सुद्दीनखां अटगा” याला दरबारात बोलवून राज्यकारभाराची जबाबदारी त्याच्यावर टाकण्यास सुरवात केली. आता हा शम्सुद्दीनखां कोण? अकबराची दूधआई ‘जिजी अनगा’ हिचा हा नवरा. अकबराच्या या निर्णयामुळे शम्सुद्दीनखां आणि अधमखां यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. अटगा आणि महाम कुटुंब आता पक्के वैरी झाले होते. महाम अनगाला अकबराच्या दरबारात आपल्या मुलाला म्हणजे अधमखांला उच्च पदावर बसवायचे होते पण अकबराच्या या निर्णयामुळे ही आशा आता अंधुक झाली होती. कारण, इतिहासकारांच्या मते, अकबर सारंगपूरला जाण्याचे कारण अधमखांच होता. त्याचा त्याच्यावर अजिबात विश्वास नव्हता परंतु महाम अनगाच्या प्रेमापोटी अकबराने अधमखांला सेनापती पदावर नियुक्त केले होते.
या निर्णयामुळे अधमखां एवढा नाराज झाला होता की,रागाच्या भरात त्याने शम्सुद्दीनखांचा दरबारात खून केला त्यावेळी अकबर दरबारात नव्हता. शम्सुद्दीनखांला मारून आता अधमखां अकबराच्या निवासस्थानाकडे निघाला. त्याच्या हातात तलवार होती. सगळीकडे गोंधळ माजला, या आवाजाने अकबर जागा झाला. अकबर त्यावेळी जनानखान्यात होता. त्याने एका नोकराला बोलावले, त्या नोकराने सगळी घडलेली घटना अकबराला सांगितली. बातमी खरी आहे की खोटी हे तपासण्यासाठी अकबर जनानखान्यातुन बाहेर पडला.
यावर अबू फजल लिहितो, “परमेश्वराची कृपाच की अधमखां ज्या दरवाज्यापाशी उभा होता, त्या दरवाज्यातुन शहेनशहा बाहेर पडले नाहीत”.
शम्सुद्दीनखांचं मृत शरीर पाहून, रागाने अकबर पुन्हा जनानखान्याकडे वळला. यावेळी त्याच्या एका अंगरक्षकाने त्याच्या हातात तलवार दिली. अकबर येताना पाहून अधमखांने आपली तलवार टाकली आणि म्हणाला “मी त्या बेइमानाला ठार मारले की नाही याची तुम्ही पूर्ण शहानिशा करून घ्या”.
संतापलेल्या अकबराने अधमखांला शिव्या दिल्या. “कुत्रीची औलाद”, “गांडू” अशा शब्दांची नोंद समकालीन इतिहासकारांनी केली आहे. यानंतर, अकबराने अधमखांला एवढ्या जोरात ठोसा लगावला की अधमखां जमिनीवर कोसळला. संतापलेल्या अकबराने अधमखांला महालाच्या तटावरून खाली फेकण्याची आज्ञा दिली, फेकल्यावर त्याचा जीव गेला नाही म्हणून पुन्हा वरती आणून खाली फेकण्याची आज्ञा दिली. दुसऱ्यांदा मात्र अधमखां मेला.
ही दुःखद बातमी सांगण्यासाठी अकबर स्वतः अधमच्या आईकडे म्हणजे महाम अनगाकडे गेला. तिला ज्या गोष्टीची भीती होते तेच झाले आणि तिचा मुलगा मारला गेला. मुलाच्या मृत्यूने ती पूर्णपणे खचून गेली आणि पुढच्या चाळीस दिवसांनी ती ही मरण पावली.
या घटनेनंतर पुढचे बेचाळीस वर्षे अकबराने राज्य केले परंतु कधीही दरबारात खून-मारामारीची घटना घडली नाही.
यानंतर अकबराने दिल्लीमध्ये अधमखां आणि त्याच्या आईची मोठी कबर बांधली. आज या वास्तूला “भुलभूलैया” नावाने ओळखतात.
सुंदर विचारपूर्वक इतिहासाची मांडणी…