उंची ३१०० मी.
प्रकार : गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी : सोपी
रविवारचा दिवस … घरी बसवत तर नाहीच, गळ्यात मफलर अडकवून, हातात कॅमेरा घेऊन कुठेतरी गडावरती जायची लागलेली सवय .. नेहमीचे आमचे सवंगडी कामात व्यस्त असल्यामुळे कुठे जावे ही समजत नव्हते … मग शेवटी जवळचा किल्ला पाहायचे ठरवले … आमच्या बाई-साहेबाना म्हणले चल तुम्हीपण … मग आमचे मित्र बाबासाहेब ते हि तयार झाले त्यांची पत्नीही तयार ( ८ महिन्याची गरोदर , पण गडावर जायची इच्छा).
आम्ही हडपसर मार्गे सोनोरी गावाकडे निघालो … दिवे घाट संपल्यावर झेंडेवाडी गावाचा फाटा लागतो … यामार्गे हि गडावर जाता येते पण आम्ही अजून ४ किलोमीटर पुढे गेलो जिथे सोनोरी गावाचा फाटा आहे आणि तिथे मल्हारगडाची पाटी पण आहे … तिथून ४ किलोमीटर वर गड आहे .. सोनोरी गावातून समोरच मल्हारगड दिसतो. सोनोरी गावातून किल्ल्याच्या पायथ्याला जाऊन गाडी लावली आणि १५-२० मिनिटातच आम्ही गडावर पोचलो. डोंगराच्या सोंडेवरूनही गडामध्ये प्रवेश करता येत असला तरी मनोऱ्याच्या बाजूने गेल्यास आपल्याला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लागते.
मी , बाबा आणि आमचा शिवबा तिघेच गडावर गेलो … अश्विनीला जमेल तेवढे ती आली पण ८ महियाची गरोदर बाई , रिस्क नको म्हणून आम्ही अश्विनी आणि मनीषाला एका झाडाखाली बसून राहिला सांगितले … नंतर त्या हळू-हळू गाडीकडे गेल्या …
अश्विनीचा भरपूर प्रयत्न चालला होता गडावर जाण्याचा , बाबाही तिला मदत करत होता … वरील फोटोमध्ये नवरा-बायकोचा प्रयत्न दिसून येतो …
आम्ही गडाच्या मागील बाजूने गेलो … अतिशय चांगल्या अवस्थेत असलेले एक देखणा बुरुज पुढे दिसतो .. बुरुजाच्या बाजूने गडामध्ये प्रवेश करता येतो …
गडामध्ये प्रवेश करताच, पुढेच एक भगवा दिसतो … बाजूलाच एक विहीर आहे … जी जवळ जवळ मुजली आहे … गडाची तटबंदी बर्यापैकी जिवंत आहे … तटबंदीच्या बाजूला पिवळ्या फुलांची गर्द झाडी आहे .. तटबंदीच्या बाजूने फिरत फिरत तुम्ही पूर्ण गड पाहू शकता ..खालील फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता …
मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे. … तटबंदीच्या बाजूने फिरत तुम्ही गडाच्या दुसर्या बाजूला जाताच तुम्ही बालेकिल्यात जाऊ शकता … थोडे पुढे गेल्यावर तुम्हाला गडाचा महादरवाजा दिसेल जो अजून हि अतिशय चांगल्या स्थितीत आहे.
या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार पानसे यांनी केली. पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. सन १७७१ – ७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या पानसेंचा किल्ल्याखालच्या सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे.
या बुरुजाच्या खाली एक बुजलेला दरवाजा दिसतो. बुरुजाकडून उजवीकडे पुढे गेल्यावर आपल्याला आणखी एक अतिशय लहान दरवाजा दिसतो. झेंडेवाडीकडून आल्यास आपण या दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश करतो.
बालेकिल्ल्यात प्रवेश न करता तटाच्या बाजूने पुढे गेल्यावर समोरच एक तळे लागते. किल्ल्याच्या दक्षिणेला असणारे हे तळे तटाला लागूनच असून पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते. यातील पाणी वापरण्यास उपयुक्त असले तरी पिण्यायोग्य मात्र नाही.
किल्ल्यावरून कऱ्हा नदी, जेजुरीचा डोंगर, कडेपठार, वगैरे दिसतात.
गडाकडे जाण्याआधी सोनोरी गावात असणारा पानसे यांचा ६ बुरुजांचा वाडा पाहण्यासारखा आहे. एखाद्या गढीप्रमाणे असणाऱ्या या वाड्यात गजाननाचे व लक्ष्मी-नारायणाचे मंदिर आहे. सोनोरी गावात चुकवून चालणार नाही असे ठिकाण म्हणजे मुरलीधराचे सुबक मंदिर व मंदिरातील अत्यंत देखणी अशी काळ्या पाषाणात घडवलेली श्रीकृष्णाची मूर्ती.
0 comments on “मल्हारगड” Add yours →