तैलबैला आणि कोरीगड …
दिवस पाहिला:
घाई-गडबडीत आखलेली योजना, कारण ही तसे होते लाडका (राहुल बुलबुले) काश्मीर खोर्यात जाणार होता , निवांत कुठेतरी २ दिवस सह्याद्रीच्या कुशीत १-२ दिवस राहून यावे, असे नियोजन होते पण जागा ठरत नव्हती, शेवटी लाडका म्हणाला आपण तैलबैलाला जावू, तंबू ठोकू , जेवण बनवू (म्यागी हे आमचे मुख्य जेवण होते). आणि रात्री आपल पळत्या ताऱ्यांची फोटोग्राफी करू आणि सकाळी उठून बाजूलाच असलेल्या लेण्या पाहू आणि परत येवू.
किती साधा आणि सरळ प्लान वाटतो …
ठरल्या प्रमाणे मी आणि आमचे मित्र बाबासो ७ सीटर अल्टो घेऊन लाडक्याच्या घरी गेलो, लाडका आपला उनात बोंबलत फिरत होत, हे घॆ … ते घे….
लाडक्याच्या मावूलीने लाडक्याला खाऊ घातले, आम्ही जेवण करून आलो होतो म्हणून आम्ही काही जेवण केले नाही पण सहज आपल ७-८ पापड खाल्ली. शेवटी घर सोडले आणि वातानुकुलीत रथामध्ये मस्त गाणी ऐकत लोणावळ्याचा रस्ता धरला, नेहमीप्रमाणे लोणावळा शहर कबुतरांनी तुडुंब भरला होता, घाई-गडबडीत अर्धवट कपडे घालून चिमण्या फिरत होत्या आणि त्यांच्या पिशव्या घेवून त्यांचे चिमणे मागे मागे फिरत होते.
लोणावळ्यातून नागड्या-उघड्या माणसांचे जंगल ओलांडून आम्ही मावळात शिरलो, अधून मधून चांगले देखावे दिसत होते ज्याला इंग्लिश मध्ये “Tourist Point” म्हणतात. प्रेमी-युगल सुंदर निसर्गाचा आनंद घेत होते त्याच बरोबर गरम भजी आणि चहा त्यांच्या आनंदात अजून थोडा गोडवा आणत होता, आम्हाला पण जरा गोडवा घेण्याची इच्छा झाली, म्हणून चहाच्या घोटासाठी आम्हीपण जरा वेळ थांबलो, चहा घेतला छायाचित्रे काढली, आम्हा तिघांनाच माहित कोणती कोणती छायाचित्रे काढली.
दिवस मावळ्याच्या आत मावळात मुक्कामी जायचं होत, तैलबैलाचा सूर्यास्त चुकवायचा नव्हता, लाडका लयच गडबड करत होत, इच्छा नसताना तिथून काढता पाय घेतला, कारण तिथून हलायची इच्छा होत नव्हती, पण पर्याय हि नव्हता.
थोडे पुढे जाताच झाडांच्या दाट गर्दीत गुळगुळीत असा रस्ता आणि तोही अगदी मोकळा, फोटो काढायचा मोह कसा आवरणार, गाडी बाजूला घेवून सुरु झाले आमचे शटर चे आवाज, अतिशय सुंदर असे फोटो मिळाले, दोन्ही बाजूला जंगल आणि मधून सुंदर असा रस्ता. बाबा आणि आमच्यामध्ये स्पर्धा सुरु होती मोबाईल मस्त फोटो काढतो का DSLR.
मस्त दंगा मस्ती करत फोटो काढत आम्ही तैलाबैलाला पोहचलो, गावाच्या थोडे आधीच आम्हाला रस्त्याच्या बाजूला सपाट जागा सापडली, तिथेच मुक्काम ठोकायचा ठरवला. डाव्या हाताला भक्कम डोंगररांग आणि पुढे तैलाबैलच्या भक्कम भिंती, अतिशय अधभूत असा देखावा, उन्हाळा असल्याने जाम गरम होत होते, विचार येत होता टेंट मध्ये कशी रात्र काढायची, एकतर गर्मी आणि अधूनमधून मच्छर पण आमच्या रक्ताचा स्वाद घेण्यासाठी येत होते.
गाडीतला संसार बाहेर काढला, बाबाने मस्त चूल मांडली तिघे मिळून चुलीसाठी लाकड गोळा करू लागलो तो पर्यंत सह्याद्री हळू हळू रंग बदलत होता, नकळत थंड हवा सुरु झाली, ढगांनीही काळी चादर पसरायला सुरु केली होती, तरीपण बाबा आणि लाडका टेंट लावण्यात मग्न होते.
त्याच दरम्यान बाबाच्या मोबाईल मधला एक लपून बदलेला गुण मला दिसला ज्याला आम्ही “झुईंग फोटोग्राफी” असे नाव दिले. फोटो पाहून बर्याच जणांनी मला विचारले photoshop मध्ये कोणते टूल वापरले, पण तो एक मोबाईल मध्ये लपलेला गुण होता जो आम्हाला माहित नव्हता. तिघांनी भरपूर “झुईंग फोटोग्राफी” केली.
हि गंमत चालू असताना अचानक सह्याद्रीने गर्जना दिली, डोंगरांच्या पाठीमागून असे काळे ढग पाठवले होते जसे काही १ लाख सेनाच हत्तीवर स्वार होवून येत आहे. आणि अचानक बारीक बारीक थेंब पडू लागले, आम्ही अगदी रजनीकांत स्पीड ने जेवढे समान बाहेर होते ते २ मिनिटात गाडीत ठेवला, टेंट जश्याच्या तसा उचलून गोळा करून गाडीत कोंबला, बाबाने गडबडीत थोडी फार लाकड गाडीच्या खाली ठेवली, पाऊस थांबेल आणि परत आम्ही चूल पेटवू, टेंट लावू हि एक आशा मनात होती.
पण हि आशा,आशाच राहिली, पाऊस थांबला पण जो काही चिखल झाला होता तो पाहून आम्ही मुक्काम देवळात हलवायचे ठरवले.
देवळात जायचा एकतर आम्हाला रस्ता सापडत नव्हता, देवूळ दिसत होते पण रस्ता सापडत नव्हता, एकंदरीत वैताग येत होता. एका घरात गेलो आणि विचारले कसे जाऊ देवळात म्हणून, तर ते म्हणाले जावू नका व्यवस्था नाही तिथे, तुम्हाला जर मुक्काम करायचा तर इथे करू शकता, हे सगळे चालू असताना मी घरामध्ये गेलो तर दोन काका लोक चिकन कट करत होते, मी ओरढून लाडक्याला सांगितले …”भावा आपण इथेच थांबायचं: ….
लाडका आत आला तर तो हि म्हणला ..”मुक्काम इथेच” … मग काय ब्यागा काढल्या, जागा काबीज केली आणि गप्पा रंगल्या … आत कोंबडी शिजत होती आणि बाहेर गप्पा शिजत होत्या …
थोड्या वेळाने आतून आवाज आला ” या जेवायला” ….
लगेच सगळे आत …. ताट भरून भात … चिकन …आणि रस्सा …. मजबूत जेवण झाले …. ५-६ वाट्या रस्सा पिला … आणि गप्पा हाणत हाणत सगळे शहीद झालो ….
——————————————————————————————————
दिवस दुसरा
सकाळचे ५ वाजले होते, नेहमीप्रमाणे मोबाईल ने गजर दिला, डोळे उघडले, अतिशय थंड आणि अल्ल्हाददायक असे वातावरण होते. सकाळचे कार्यक्रम आटपून मी लाडक्याला उठवावे म्हणले, लाडका म्हणला …
“पाटील … १० मिनिट झोपू दे ना राव” … म्हणल चिखल लय झालाय, काका म्हणतायत लेण्या बघायला नका जावू, काय करायचे ? कोरीगडला जावूया का ?
१ सेकन्दाचा विलंब न करता लाडका म्हणला “हो जावू …. मग ७ ला निघू … तुमीपनझोपा जरा वेळ” …..
तासाभराने सगळे उठले, ज्या घरात राहिलो होतो त्यांची आपापली कामे सुरु झाली , चूल पेटवली होती …. चहाचा सुगंध मस्त येत होता … आवरा-आवर सुरु झाली .. टेंट आवरून ठेवायचा होता … फोटो काढणे चालू होते … त्या घरातल्या लोकांबरोबर गप्पा गोष्टी चालू होत्या … जसे काही ते आमचेच घर आहे असे वाटत होते.
… सगळी आवराआवर करून आम्ही परतीचा रस्ता धरला … वाटेतच “किल्ले कोरीगड” होता … तसा लहान किल्ला पण अतिशय देखणा … थोड्या अंतरावर आम्हाला एक तरुण भेटला … त्याला लिफ्ट पाहिजे होती … त्याला गाडीत घेतले त्याने आम्हाला गाडी कुठे लावायची … कुठून गड चढायला सुरवात करायची … याची पूर्ण माहिती दिली. आणखीन एक मस्त माहिती त्याने दिली … ती म्हणजे …
किल्ल्याच्या पायथ्यालाच “आंबे व्हेली सिटी” आहे जी सहारा वाल्याची आहे … त्याने म्हणे गडाच्या डागडूगीचे काम सुरु केले होते … पायर्या दुसृस्त केल्या होत्या … गडाच्या भवती विजेचे खांब आणि त्यावर मोठमोठ्या लाईट, जेणे करून त्यांचा फोकस गडावर पडेल … एकंदरीत त्याने गडावर पूर्ण ताबा घेवून त्याचा वापर “आंबे व्हेली सिटी” चे आकर्षण बनवायचे होते .. हा डाव गाव वाल्यांनी आणि मिलिट्रीने धुडकावून लावला … त्यांच्या सर्व माणसांना गडावरून हाकलून लावले होते.
१० एक मिनिटात आम्ही “पेठ शहापूर” या गावी पोहचलो जिथे आम्हाला गाडी लावायची होती, एक दुकानाच्या मागे आम्ही गाडी लावली आणि गड चढायला सुरवात केली.
नेहमीप्रमाणे पायपीट सुरु केली, सुरवातीला अगदी टिपिकल सह्याद्री वाट आहे, आजूबाजूला भरपूर झाडी .. त्यामुळे सावली खूप मिळाली … उन फार होते … तिघेही मस्त घनदाट झाडी पाहत गड चढत होतो … चांगल्या फ्रेम मिळत होत्या त्यामुळे कॅमेरा काही बंद नव्हता … आजूबाजूला सहारा वाल्याने रवलेले विजेचे खांब दिसत होते, गड पण मस्त दिसत होता, मजबूत नैसर्गिक तटबंदी गडाला लाभली आहे. अतिशय देखणा असा गड आहे, झाडा-झुडपातून थोडा वेळ चालल्यावर पायर्या सुरु झाल्या, पायर्या एकदम चांगल्या स्थितीत होत्या, सहारा वाल्याने बर्यापैकी काम केले होते.
आमच्याबरोबर ३-४ कुत्र्यांची फौज पण होती आमच्या मागे-पुढे चालत होती, गडावर जावूपर्यंत त्यांनी काही आमची साथ सोडली नाही. २-३ चांगले फोटो मिळाले… पुढे जाताच पवार कालीन गुहा होती बाजूलाच गणपतीचे मंदिर … थोडावेळ थांबून फोटो काढले … उजव्या हातला मस्त नजारा दिसत होता …
गडाचा महादरवाजा अगदी बुलंद आणि जिवंत वाटत होता, सुबक अश्या पायर्या महादार्वाज्यातून जातात, अगदी दिमाखदार असा दरवाजा आहे, आजही वातावरणाशी आणि मनुष्यांच्या नालायक कृत्यांशी झुंजत ताठ मानेने उभा आहे. थोडा वेळ भावनिक करणारा आणि त्याच्या रुबाबाने मन हेलावून टाकणारा असा हा महादरवाजा. दरवाज्यातून आता जाताच गडाची परिस्थिती कळते, अतिशय बिकट अशी अवस्था आहे गडाचे अवशेष जवळ-जवळ शेवटचे श्वास घेत आहेत, त्यातून हि जर कल्पना केली तर त्यावेळचे सौंदर्य काय असेल याचा एक विचार मनाला समाधान देवून जातो,
तलावापासून डाव्या बाजूला गेला कि बाले किल्ल्याकडे जातो … बर्यापैकी अवशेष आहेत, तटबंदी हि चांगली आहे पूर्ण गड फिरून पहिला, विशेष म्हणजे तोफा एकदम चांगल्या स्तिथीत आहेत आणि ठेवल्या हि एकदम दिमाखात आहेत. एकदम कडेला एक मस्त बुरुज आहे तिथे जावून पहिले तर खाली पूर्ण आंबे व्हेली सिटी दिसते, अगदी घरांचे जाळे पसरवून ठेवले आहे उजव्या हाताला विमानाला धावण्यासाठी धावपट्टी आहे.
तलावापासून डाव्या बाजूला गेला कि बाले किल्ल्याकडे जातो … बर्यापैकी अवशेष आहेत, तटबंदी हि चांगली आहे पूर्ण गड फिरून पहिला, विशेष म्हणजे तोफा एकदम चांगल्या स्तिथीत आहेत आणि ठेवल्या हि एकदम दिमाखात आहेत. एकदम कडेला एक मस्त बुरुज आहे तिथे जावून पहिले तर खाली पूर्ण आंबे व्हेली सिटी दिसते, अगदी घरांचे जाळे पसरवून ठेवले आहे उजव्या हाताला विमानाला धावण्यासाठी धावपट्टी आहे.
तटबंदीवरून चालत आम्ही परत महादार्वाज्याकडे येत होतो, एक तोफ अतिशय बिकट अवस्थेत होती, अशी ठेवली होती जशी टाकून दिली आहे, आम्हा तिघांना उचलणारी नक्कीच नव्हती, नाहीतर तिला एकदम दिमाखात ठेवला असता, अगदी दरवाज्याजवळ अजून एक अशी तोफ होती आम्ही फार प्रयत्न केला पण जाग्यावरून हलली पण नाही.
अश्या या देखण्या गडाला एक मुजरा करून त्याचा निरोप घेतला.
0 comments on “तैलबैला आणि कोरीगड” Add yours →