DSC_0058

कोकनाची वारी : भाग – १

कोकणाची वारी एकूण ३-४ दिवसाची होती … म्हणून ४ भागामध्ये प्रवासवर्णन करीत आहे … हा पहिला भाग _________________________________________________________________________


३० एप्रिल २०१५ ….

लगतची सुट्टी लागून आली होती, सागरी किल्ल्यांची आस फार जुनी होती, वेळ म्हणावा तसा मिळत नव्हता आणि योग ही जुळून येत नव्हता, नुकत्याच झालेल्या दुर्गजागर सोहळ्यात भगवान चीले सरांनी सागरी किल्ल्यांचे वर्णन ऎसे केले जैसे याहून मोठी दौलत नाही, खरे ही आहे,  शिवराय हे जगातले एकमेव राजे ज्यांनी त्यांच्या छोट्याश्या कारकिर्दीत सात सागरी किल्ले बांधले, कारण शिवरायांनी ओळखले होते ज्याचे समुद्रावर वर्चस्व त्याचे जगावर वर्चस्व.

धाकल्या पाटलांना मनातली बात बोलून दाखवली आणि त्यांना संगे येण्याची विनंतीही केली, धाकल्यांनी लगेच उत्तर दिले ….. 

“चला मग कोकणात” 


लगेचच आमचा गारदी श्याब्या तयार झाला, सह्याद्रीपुत्र ओंकार नायगावकर दादा यांनी काही कारनात्सव नकार कळविला, सगळे काही नियोजन करत असताना संदीप भौनी कॉल केला आणि…

“१,२,३  तारखेला काय प्लॅन ?”  ऐसा सवाल केला, म्हणले, दादा कोकणात चाललोय !! 

दादा बोलले आमी पण हाय, सांगा काय नियोजन ? सगळे काही जमत गेले आणि मग ७ सीटर अल्टो रद्द करुण संदीप भौंची इनोवा ठरली … 

थोरले आणि धाकले पाटील, संदीप भौ आणि नितिन भौ आणि आमचे पुत्र शिवबा आणि श्याब्या ऎसे ६ जन कोकण तुड़वायला निघालो.

९ च्या सुमारास पुणे सोडले, आमचे मार्गदर्शक आणि आदर्श अजयदादा जाधवराव यानी साताऱ्यात जेवनाचे आमंत्रण दिले होते, 9 च्या सुमारास आम्ही साताऱ्यात पोहचलो, मस्त कोम्बडीचे तुकडे तोडून दादारावांचा आशीर्वाद घेवून गड़बडीने सातारा सोडले आणि सुसाट वेगाने कोल्हापुरकडे रवाना झालो.

बेत होता सरळ मालवण गाटायचा पण जबरदस्ती नव्हती, जिथे वाटेल तिथे मुक्काम करायचे ऎसे ठरले होते, कोल्हापूरच्या टोल नंतर धाकल्या पाटलांना चहाची तलप झाली, टोल नंतर लगेचच भरपूर टपर्या होत्या थांबून चहा घेतला पाटलांनी एक सेल्फ़ी काढून मुखपुस्तके वरती टाकून आम्ही कुठे आहोत याची माहिती लगेच प्रियजणांना दिली, 

 चहा घेवून आम्ही कोल्हापुर गाटले. कोल्हापुरात पोहचलो, महालक्ष्मी मंदिराला वळसा घालून, रंकाळ्याचे रात्रीचे सौंदर्य पाहत … एकदम सुसाट वेगाने प्रवास चालत होता .. सुंदर रस्ता, दर्जेदार वाहन आणि इतिहासवर गप्पाबघता बघता फोंडा घाट कधी संपला आणि कणकवली कधी आले हे समजलेच नाही.आमचा गारदी मागच्या सीट वर सातार्यातच शहीद झाला होता, मी आणि नितीन दादा अधून मधून डुलक्या मारत होतो, शिवबा मात्र झोपला होता….

कणकवली मध्ये संदीप भौ आणि धाकल्या पाटलानी चहा घेतला मी गोड शिरा घेतला .. हे चालू असताना टपरी वाल्याला विचारले …

“भौ मालवण किती ?”

तो म्हणला 55 किलोमीटर, रात्रीचे साढे तीन झाले होते, संदीप भौ म्हणले अगदी सकाळ सकाळी पोहचण्यापेक्ष्या इथेच मुक्काम करू आणि सकाळी लवकर निघू.

तसेच ठरले आणि टपरी वाल्याला दुसरा प्रश्न..

“भौ इथे मंदीर आहे का जवळ ?”

तो म्हणाला जवळच एक मठ आहे तिथे जावा..

आम्ही त्याने सांगितलेल्या रसत्याने गेलो आणि एक मठ दीसला त्याचे नाव ..

“श्री गजानन महाराज सेवाश्रम मठ”

गाडी बाजूला केली.. ब्यागेतुन हांथरून-पांगरुण काढले आणि सगळे झोपी गेले … मी जागाच होतो शिवबाच्या बाजूला बसुन इथेपर्यंतच्या प्रवासाचे अनुभव लिहीत होतो .. शिवबाची चोख व्यवस्था ही एक वाढीव जबाबदारी होती … आणि मला झोपपण येत नव्हती …

सगळे बिचारे झोपेतच मच्छरांच्या आक्रमनाला तोंड देत होते, श्याब्या अगदी साताऱ्यापासून गाडीत झोपला होता तरीही या मच्छरांच्या राज्यात अगदी घोरत पडला होता. धाकल्या पाटलानी पण श्याब्याच्या घोरण्याला जोरदार उत्तर देण्याचे ठरवले होते आणि एक अगळी वेगळी चुरस जुंपली होती. अधुन-मधून संदीप आणि नितिन भौ “आम्हीपन आहोत” याचा दाखला देत होते.

शेवटी संदीप भौ आणि मी दोघांनी ठरवले, गाडी सुरु ठेवून AC चालू करुण गाडीतच झोपायचे. मग मी, शिवबा, नितिन आणि संदीप भौ गाड़ीमध्ये झोपलो, श्याब्या आणि धाकले पाटील मात्र घोरत पडले होते. मी माझे लिखाण आवरून थोड़ावेळ मान टाकली.

_________________________________________________________________________


दीवस पहिला : 1 मे 2015: 
सकाळी साढ़े सहा ला श्याब्या ने येवून मला उठवले, विचार होता मठामध्येच सकाळची प्राथविधि आणि स्नान ऐसे अतिमहत्वाचे कार्यक्रम आटपोन घ्यावेत पण सोय काय आजुबाजुला दिसत नव्हती, म्हणुन सेकंदाचाही विलंब न करता तिथून निघायचे ठरवले, आमच्या नियोजनामध्ये पहिला पद्मगड़ करायचे होते पण वाटेतच “भरतगड” 17 किलोमीटर ऐसा बोर्ड दिसला विचार आला जाता-जाता पाहून जावे, सकाळची वेळ होती, किल्ला पण तसा लाहणगा.. संदीप भौनी गाड़ी वळवली … किल्ल्याची वाट विचारताना आलेले अनुभव म्हणजे सकाळचा विनोदी कार्यक्रमच होता, सविस्तर सांगायची इच्छा आहे…


1) नितिन भौ नी एका इसमाला विचारले,

  “भौ भरतगड़ कुठे हो ?”

भौ उत्तरले : विजयदुर्ग ?? त्यावर धाकले पाटील म्हणाले…

“ये.झ. व्या विचारतोय काय … सांगतोय काय”

2) एका मामांना विचाराव म्हणुन थांबलो तर मामा आसे पुढे आले जैसे वाटले आता नितिन भाऊ चा किसच घेतात …

हसून हसून मेलो आज …


10-15 मिनिटे हा खेळ-खंडोबा चालु होता …एका बहाद्दरान तर आम्हाला भरतगड हायस्कूल मध्ये पाठवल, एवढी आडाणी कुठ नाहीत हो … हा खेळ-खंडोबा संपल्यावर शेवटी एकदाच भरतगडावर पोहचलो, गाड़ी एका शाळेच्या पुढे लावली, मोजके सामान घेतले, आम्ही गड चढायला सुरवात केली, 

मोजून 10 मिनिटांत वरती पोहचलो, गडाची ततबंदी अगदी रुबाबदार आहे, तटबंदीच्या डागडुगीचे काम चालू आहे गडावर कोणत्या तरी बंगल्याचे कंपाउंड करावे तसे सुरु आहे, नेहमीप्रमाणे सरकारी बुद्धिमतेचे अतिउत्तम उदाहरण देणारे काम चालु आहे. 
सुरवातीलाच गडाचा प्रवेशद्वाराकडे जाणारी वाट आहे, खाली दिलेले फोटो मध्ये पहिले तर पायर्या चढून  गेले की उजव्या बाजूला गडाचा प्रेवश द्वार आहे.


पायर्या चढून उजवीकडे गेले की सुंदर अशी तटबंदी दिसते थोड्या अंतरावर मुख्य दरवाजा आहे.\

गड अतिशय देखना आहे, बुरुज उंचीला फार मोठे नाहीत पण अतिशय देखने आहेत, किल्ल्याचे विशेष म्हणजे “बालेकिल्ला”, मुख्य तटबंदीच्या आता आनखिन एक तटबंदी, देखने बुरुज आणि आतमध्ये बालेकिल्ला… किल्ल्याच्या आतमध्ये फक्त आंब्याची झाड़े आहेत, भरपूर आंबे होते, काही पिकलेली तर काही कच्चे, श्याब्या आणि संदीप भौनी मस्त आंबे खाल्ले.

जसे म्हणले गड तसा लहानगा, Watch Tower म्हणू शकतो, हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही, महाराजांनी येथे गड बांधण्याच्या दृष्टीने पहाणी केली होती. पण पाण्याची सोय न झाल्यामुळे त्यांनी हा प्रयत्न सोडून दिला. पुढे फोंड सावंतानी प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. गडावर पाणी मिळाल्यावर त्यांनी येथे किल्ला उभारला. पुढे १८१८ मधे इतर किल्ल्यांप्रमाणे हाही किल्ला इंग्रजांना मिळाला. तेव्हा गडावर अठरा तोफा असल्याची नोंद केलेली आढळते.
गडमाथ्यावर मध्यभागी बालेकिल्ला अथवा परकोट आहे. या परकोटात जाण्यासाठी दोन बाजूंना दोन दरवाजे आहेत. त्यापैकी एक दरवाजा बुरजाला लागूनच आहे. दरवाजाच्या आत पहारेकर्‍यांची देवडी आहे. 

डावीकडील तटबंदीजवळच एक लहानसे मंदिर आहे. चौथर्‍यावर हे मंदिर देवसिद्ध महापुरुषाचे आहे असे म्हणतात. मंदिरासमोरच तुळशी वृंदावन केलेले आहे.

भरतगडाचे मुख्य आकर्षण म्हणजे २०० फूट खोल विहीर असे म्हटले जाते की, या विहिरीच्या तळाशी एक गुप्त दरवाजा आहे. या दरवाजातून थेट सिंधुदुर्ग किल्ल्यात जाता येते. भरतगडावरील एका मंदिराच्या शेजारीच एक मशीद आहे. इथूनच पुढे भगवंतगड आहे. भगवंतगड पाहण्यासाठी होडीने खाडी ओलांडून जाता येते.डावीकडील तटबंदीमधे एक लहान दरवाजा आहे. याला चोर दरवाजा असेही म्हणतात. या दरवाजाच्या बाहेरील तटबंदीचा मोठा भाग सुटा होऊन ढासळला आहे.या बालेकिल्ल्यातून बाहेर पडून दक्षिण टोकावरील बुरजावर जाता येते. उत्तम बांधणीचा बुरूज पाहून पश्चिम टोकावर आल्यावर बालावल खाडीचे दृश्य दिसते. खाडीच्या पलीकडील तीरावर गर्द झाडीने झाकलेला भंगवतगड दिसतो.

गडाच्या बालेकिल्ल्यातून बाजूलाच एक छोटा दरवाजा आहे ज्यातून बाहेर जात येते … जाताच उजव्या बाजूला भयानक मोठ्ठा असा बुरुज आहे आणि अगदी चांगल्या स्थितीत आहे. बालेकील्याला तटबंदी आणि बुरुज आणि त्याच्या बाहेर अजून एक तटबंदी आणि मोठमोठे बुरुज, दुहेरी तटबंदी असलेले असा हा लहान पण अतिशय मजबूत आणि देखणा किल्ला.

बालेकिल्ला बघून बाहेरच्या तटबंदीवरून फिरत फिरत पूर्ण किल्ल्याचा परिसर पाहत आम्ही आता बाहेर पडायच्या मार्गावर होतो, जाता जात किल्ल्याचे फोटो घेत होतो, तटबंदीच्या डागडूगीचे काम चालू आहे गडावर, ते काम पाहून एक बात नक्की आहे की, एक दिवसी पूर्ण बांधकाम आजच्या पद्धतीने होईल, आणि १७ व्या शतकातले किल्ले स्थापत्य ही फ़क़्त इतिहासाच्या पुस्तकातला धडा राहील.

अश्या या देखण्या आणि सुंदर गडाला अखेरचा मुजरा करून आम्ही गड उतरायला सुरवात केली आणि मग वेध लागले ते “शिवलंका … किल्ले सिंधुदुर्ग” चे ….


क्रमश:

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

0 comments on “कोकनाची वारी : भाग – १Add yours →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *