DSC_0210

कोकनाची वारी : भाग – 3

शिवबाची झोप झाली, आमच्याही गप्पा झाल्या, सगळ्यांच्या डोळ्यावर चांगलीच  झोप दिसत होती, कोकणातला उन्हाळा आणि सह्याद्रीत्ला उन्हाळा यात जमीन आसमानाचा फरक, सह्याद्रीतले सुळके आणि कडा जीव काढतात तर कोकणात उन्हाळा जीव काढतो, पण पुढे जायचच होत त्यामुळे आळस झटकून सर्जेकोट किल्ल्याकडे निघालो.

दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सर यांचे पुस्तक संदीप भौंकडे होतेच … मालवणचे रस्ते म्हणजे भूलभुलैयाच, हर एक रस्ता सारखाच दिसतो, इकडे तिकडे विचारात आम्ही पोहचलो एकदाचे सर्जेकोटला.

सर्जेकोट हा किल्ला शिवाजी महाराजांनी इ.स. 1668 मध्ये बांधला, किल्ल्याची बुरूज व तटबंदी चांगल्या स्थितीत आहे. गडावर बरीच झाडी असल्याने फारसे फिरता येत नाही. 20 मिनीटांत संपूर्ण गड फिरून होतो.

किल्ल्यात प्रवेश करताना हा दरवाजा दिसतो, लहानगा दरवाजा आहे, बर्यापैकी चांगल्या स्थितीत आहे. पूर्वीसारखा नक्कीच नाही, तटबंदीही वरून ढासळलेली आहे.

गडामध्ये कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत, फ़क़्त झाडी आणि चौथरे शिल्लक आहेत, पाहता क्षणी फ़क़्त कल्पना करू शकतो की, इथे सदर असावी, इथे राहण्याची जागा असावी वगैरे वगैरे …

उजव्या बाजूलाच एक तुळस आहे, कशीबसी उभी आहे, काही दिवसांनी तीही कोणीतरी उचलून घेवून जाईल.

आमचा शिवबा शाब्या काकाच्या खांद्यावर बसून किल्ला बघत होता, प्रत्येक किल्ल्यावर शिवबाचा एकच प्रश्न “शिवाजी महाराज कुठे राहत होते?”.

किल्ल्याचे बुरुज मात्र चांगल्या स्थितीत आहेत, पुढेच समुद्र आणि समुद्रात दिसणारा सिंधुदुर्ग, पाहताच बसावे असे काही …..

अतिशय लहान पण सुंदर किल्ला, लगेच पाहून झाला इथून पुढे आम्ही राजकोट पहिला, राजकोट किल्ला सिंधुदर्गाबरोबरच बांधला गेला आह. सध्या गडावर फक्त एक बुरुज शिल्लक आहे. अन्य कोणत्याही इतिहासाच्या खाणाखुणा उरलेल्या नाहीत गडावरील सपाट जागेचा वापर कोळी लोक मासे वाळविण्यासाठी करतात.

रात्रभर प्रवास आणि लगेच सकाळी लवकर उठून सिंधुदुर्ग, पद्मगड, सर्जेकोट आणि राजकोट पाहून अतिशय कंटाळ आला होता, डोक दुखत होते, झोप पूर्ण झाली नाही याची जाणीव डोकेदुखी सदैव करून देत होती, तांदुळवाडी जिथे आम्ही सकाळी फ्रेश होण्यासाठी थांबलो होतो तिथे मुक्कामाला जायचे ठरवले होते त्यानुसार आम्ही पुन्हा  तांदुळवाडीकडे निघालो. ७-८ किलोमीटर अंतर होते लगेच पोहचलो.

रात्री जेवणासाठी मासे खायचे ठरवले होते पण वेळ लागणार होता, हे पाहून धाकले पाटील आणि शाब्या एकदम खुश झाले कारण मासे त्यांचा न आवडता प्रकार, तरीही काकांनी काहीतरी जुगाड करून मासे आणले आणि चिकन आणि मासे असा डाव राच्या जेवणाला मांडला, जेवण तयार होवू पर्यंत खुर्च्या टाकून सगळे गप्पा मारत होते, डोक जाम दुखत होत, संदीप भौनी एक गोळी दिली, गोळी खाऊन मी आपला झोपलो होतो, शिवबा खेळत होता…. काही वेळाने जेवण तयार झाले, शाब्या भाऊ ने मला जेवण रूम मध्ये आणून दिले, मी आणि शिवबा मस्त रूममध्ये बसून जेवलो, बाकीचे हॉटेल मध्ये बसून जेवले. दिवसभराच्या आठवणीना उजाळा देत आम्ही सर्वजन झोपी गेलो.

सकाळी लवकर उठायचे होते कारण हा फिरतीचा दुसरा दिवस होता तारीख २ मे २०१५, एका दिवसात ४ किल्ले पहायचे होते, सुरवात करायची होती ती देवगड पासून नंतर विजयदुर्ग, यशवंतगड, आणि आंबोळगड मध्ये जाताना कुणकेश्वरचे मंदिर पण होते, त्यामुळे सकाळी लवकर उठणे आवश्यक होते.

सकाळी ६ ला उठून आवरा-आवर करून आम्ही तयार झालो, काकांनी नाष्टा तयार केला होता, दाबून नाष्टा केला आणि गाडीमध्ये ब्यागा भरून किल्ले देवगडाकडे प्रस्थान केले …

थोडेसे अंतर पार केले, छानसा देखावा होता, एका पुलावर गाडी थांबवून २-४ फोटो काढले, एक ग्रुप फोटो हि झाला …..

कुणकेश्वरचे मंदिर:

थोड्याच वेळात आम्ही कुणकेश्वरचे मंदिरात पोहचलो, शिवबा आणि शाब्या गाडीत झोपले होते आम्ही सगळे मंदिरात गेलो, दर्शन झाले .. कुणकेश्वरचे मंदिर म्हणजे ,ऐतिहासिक आणि कोकणचा अजोड इतिहास सांगणारे एक पवित्र ठिकाण , त्याच्या पायाशेजारी अखंड नाम जप करण्यात तल्लीन झालेला अरबी समुद्र, रुपेरी वाळू, भिरभिरणारे वारे हे सारे वातावरण हवेहवेसे वाटते. याला भौगोलिक आणि आध्यात्माची तेवढीच पार्श्वभूमी आहे. कुणकेश्वराचे महात्म्य कोकणच्या लोकांना माहितीच आहे

प्राचीन कुडाळ प्रांतातील हे महादेवाचे प्रसिद्ध पुरातन स्थान. कुणकेश्वर गावाच्या समुद्रकिनारी डोंगराच्या पायथ्याशी, पण उंच भागावर आहे. सध्या हे क्षेत्र देवगड तालुक्यात आहे. देवळाचा चौथरा पंधरा ते वीस फूट उंचीचा अन् अजस्त्र दगडांनी तयार झालेला आहे. बांधकामावरची कलाकुसर आणि समुद्राच्या लाटेपासून देवळाचे रक्षण व्हावे म्हणून पश्चिमेस

समुद्रालगत भक्कम दगडाचा दुहेरी तट आणि सागरकिना-यावरून देवळाच्या दिशेने दृष्टिक्षेप टाकला असता, असे वाटते सागर शंकराच्या पिंडीला कवटाळू पाहत आहे. कुणकेश्वराच्या खडकांवर शंभरहून अधिक शिवलिंगे आहेत. या शिवलिंगांवर लांटांचा शतकानुशतके अभिषेक होत आहे. मात्र शिवलिंगे आहेत तशी आहेत. ती कोणी कोरली, ती कशी कोरली गेली हे एक रहस्यच आहे.

दर्शन आवरून आम्ही पुढचा प्रवास सुरु केला, बरेच अंतर राहिले होते जेवणाचीही वेळ झाली होती, मध्येच गणपतीपुळे होते जाता जाता जायचं कि नाही यावर खूप चर्चा झाली, पण वेळेअभावी आम्ही गणपतीपुळे मध्ये न थांबण्याचा निर्णय घेतला, आणि वाटेवरूनच दर्शन घेवून प्रवास चालू ठेवला.

क्रमश ……

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

0 comments on “कोकनाची वारी : भाग – 3Add yours →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *