वाचण्या अगोदर आमच्या भावांची टोपण नाव सांगतो म्हणजे वाचताना कपाळावर प्रश्न चिन्न उभ राहणार नाही,
२) जगतगुरू : श्री. विशाल सावंत
३) उंच बोका / बोका : श्री.अभिजित पासलकर
४) हास्यसम्राट : श्री. रोहन भोसले.
२०-२१ चा जून, शनिवार-रविवार होता, शनिवार पहाटेचे साढे तीन वाजले, मोबाईल ने ओरडाओरड सुरु केली (घड्याळाचा गजर) , नेहमीप्रमाणे गजर होण्याआगोदरच जाग आली होती आणि गजर होण्याची वाट बगत होतो …खिड़कीतून बाहेर पाहिले, ढगांनी भांडायला सुरवात केली होती, वाटल हेर कसा येणार एवढ्या लांबन, फोन केला तर लागना, म्हणल आता जरा पावसात भिजनार गडी. व्हाट्स ऍप वर बोक्यान संदेश टाकला होता “On the way” म्हणुन… जगतगुरुनी फोन केला…. मेमरी कार्ड तेवढ नक्की घ्या म्हणुन. त्याची वाट लागली होती …. लग्नाचे शूट करून आला होता, आणि मेमरी कार्ड करप्ट झाले होते.
ब्याग रात्रीच भरून ठेवली होती, उचलून अल्टोत कोंबायची होती … पटापट आंघोळ केली, तयार झालो तोवर उंच बोक्याने बेल वाजवली … गडी ट्रेक सुरु होण्या आगोदरच भिजला होता … वल्ली कापड बदलली. आमच्या बाईसाहेब जरा आजारी होत्या तरीपण सकाळी सकाळी त्यांनी चहा करून दिला. मी आणि बोका चहा आणि बिस्कीट खात होतो …आणि हेराची वाट बघत बसलो होतो.
शेवटी सह्याद्रीचे हेर 5 च्या सुमारास आले, ढगांच्या भांडनात यांचे लयच हाल झाले होते, ट्रेक सुरु होण्याआधीच हे पण पूर्ण भिजले होते, म्हणल …. “कापड बदला, गरम च्या प्या, ८-१० बिस्कीट खावा, मग निघू”.
चहा-पान करुण जगतगुरुंच्या घरी गेलो, आमच्या जवळच राहतात … तेथे हास्यसम्राट पण आले होते, गाडीत ब्यागा काय बसिनात, तरीबी आपल कोम्बाकोम्बी केली म्हणल पुढ़ जावून सेटिंग करु.
यावेळी एक गडी जास्त झाला होता आणि तोही आडदांड शरीराचा आणि ६ फुट उंचीचा, उंच बोका, त्यामुळे जरा जागेचा प्रश्न थोड्या वेळासाठी पडला होता, पण शेवटी उगाचच “७ सीटर” म्हणत नाहीत आपल्या अल्टोला. ब्यागा डिक्कीत कोंबून सगळे बसले, आणि स्टारटर मारला
…. अश्या पद्धतीने ट्रेक चा श्रीगणेशा झाला. _______________________________________________________________________________
पाऊस कमी-जास्त होत होता, वातावरणात बर्यापैकी गारवा होता, पवार साहेबांनी रात्रभर जागून 90 च्या दशकातील, म्हणजे आमच्या शालेय जीवनाच्या काळातील दिलखुश करणारी गाणी डाऊनलोड केली होती, त्यामुळे प्रवासाच्या सुरवातीपासून DJ च काम त्यांनीच घेतले होते.
जगतगुरूंचे किस्से चालू झाले होते, आणि त्यावर हास्यसम्राटांचे हास्य म्हणजे काय विचारू नका, चाकणचा टोल नाका आला, पैसे द्यायचे नाहीत असे जगतगुरू म्हणाले, म्हणून तसेच गेलो, पैसे काही दिले नाहीत. प्रवास चालू होता, नाशिकचा रस्ता म्हणजे तुमच्या संयमाची परीक्ष्याच.
थोड्या अंतरावर गेलो तर एक मस्त कॉमेडी सीन दिसला, एक ट्रक चालला होता आणि त्याच्या टपावर एक औलादी अगदी हिरो सारख उभ होते, असे वाटत होते “फुल और कांटे” च शुटींगच. ओवरटेक केले, नंतर म्हणल त्याचा फोटो मस्त येईल, म्हणून जोरात गाडी पळवली आणि पुढे जावून थांबलो, मी उतरून फोटो घेतच होतो, तोपर्यंत तो खाली बसला आणि त्याने ट्रकच आमच्याजवळ थांबवला,
म्हणला काय झाले साहेब ?
म्हणल भावा का बसला खाली, फोटो काढायचा होता ना राव …..
तो म्हणला, “आहो आमाला भ्या वाटली म्हणून थांबलो” … लय जबराट भेल होत, त्याला काय वाटल काय माहित …
तोवर आमचे हेर म्हणाले हे सगळे मिलिट्री स्टाईल च्या कपड्यांमुळे होते, आणि त्यात आपण असे आडदांड…. माणूस भिणारच की पाटील !!
त्याला म्हणल … “ठीक आहे भाऊ” जावा तुमी, आमी बी जातो .. आता गाडी थांबवलीच होती तर म्हणल धार मारून घ्यावी, तो ट्रकवाला पण गेला.
हेर आणि बोक्याची कापड सकाळी आमच्या घरापर्यंत येऊ पर्यंत भिजली होती, आणि ती वाळवायची होती, मग डोक्यात एक “आयडियाची कल्पना” आली, म्हणल सगळी वल्ली कापड गाडीच्या बाहेर काचेमध्ये अडकवून लटकवू आणि काचा बंद करू म्हणजे जोराच्या वाऱ्याने सगळी लगेचच वाळतील…. मग काय !! लटकावली सगळी कापड गाडीला …… सेल्फी बी काढला …
गाडीच्या आजूबाजूला कापड लटकावली होती, गाडी एकदम जोरकात पळवत होतो, कापड दणादण गाडीवर आपटत होती, हेर सारखा इचारायचा .. “पाटील, कापड उडून जाणार नायत नव्ह” …. आजूबाजूचे लोक बघत होते, म्हणत असतील कुठ आल्याती ही औलादी …….
गाडीत बऱ्याच विषयांवर चर्चा चालू होती (प्रत्येक ट्रेक मधला फेवरेट विषय जास्त होता … ख्या .. ख्या ..ख्या ) , अधुन मधून जगतगुरु इंग्लीश भाषेतून जोरदार जोक्स मारत होते, गाड़ी निबार पळत होती, ढगांनी डोंगराना कवटाळले होते त्यांचे सौंदर्य पाहून फ़ोटो काढण्याचा मोह आवरत नव्हता, सेल्फ़ी आणि फोटोंचा धुमाकूळ चालु होता, गाडी हरएक 15-20 मिनिटांनी थांबत होती, ते डोंगरांचे आणि ढगांचे मिलन म्हणजे बघत बसावे असे. अतिशय सुंदर असा प्रवास सुरु होता, वेगळी व्यक्तिमहत्व पण समविचारी माणस एकत्र होती, अतिशय सुंदर विषयांवर गप्पा चालू होत्या, माझी नजर पेट्रोल पंपावर होती, गाडीचे पोट भरवायचे होते. थोड्याच् अंतरावर HP चा पेट्रोल पंप दिसला, अल्टोचा टम्मी फूल केला. कापड पण जरा वाईस वाळली होती, म्हणल जावू दे … मिसळ खायला थांबल्यावर काढू, तोवर एकदम कडक वाळतील.
सिन्नर मध्ये पोहचलो, सिन्नर चे बस स्टॅण्ड म्हणजे एक विषयच अगदी विमानतळच राव, एखाद्या छोट्याश्या गावाच बस स्टॅण्ड जे एखाद्या मोठ्या शहराला ही लाजवेल असे होते.
थोड़ पुढे गेलो, सर्वांना पोटाची आठवण झाली, नाष्टा हा महत्वाचा विषय बनला होता पण रस्त्यावर सगळे ढाबेच होते कुठेही काही मिळत नव्हते नाशिबाने एका फाट्यावर एक चांगले छोटे हॉटेल दिसले, ५ मिसळ आणि २-४ वडापाव मागवले … सगळ्यांनी आपल २-२ पाव खावून विषय मिटवला .. पण आमचा विशल्या ४ पाव खाल्ला …
“हाय एवढ-एवढ पण खाताय पैलवानाएवढ” …
बिगीबिगी खान उरकवल … गाडीला लटकवलेली कापड एकदम कडक वाळली होती, काढून ब्यागेत घातली … आता नाशकाशिवाय थांबायचं नाय असा डायलॉग मारून गाडी सुरु केली. _______________________________________________________________________________
चहा, नाष्टा, पेट्रोल सगळे काही आवरून आता सरळ नाशिक …. तासाभरात आम्ही नाशिकला पोहचलो. नेमका रस्ता कोणता धरायचा यावर जरा चर्चा चालू होती, गाडी बाजूला घेवून एका पोलिस मामाला विचारले …..
“मामा हरिहरगडला कस जायचं ?”
मामा : असा कुटला गड नाय हीत …. (तिकडे हरहर गड म्हणतात)
म्हणल … काय? आहो त्र्यंबकेश्वर तालुक्यातला हरिहर गड मामा …. अस काय करताय ?
मामा म्हणाले पुढ जो मोठा ब्रिज लागतो तिथून डाव्या हाताला जावा … तो त्र्यंबक रोड आहे आणि मग पुढे विचारा … म्हणल ओके !!!
जरा एक वेळात त्र्यंबक रोडला लागलो .. नाशिक मधून अंदाजे ४० किलोमीटर हरिहर गड असावा.त्र्यंबक रोडला अंदाजे २०-२५ किलोमीटर गेल्यावर एक “पेगलवाडी फाटा” लागतो जिथून डावीकडे जावे लागते. त्याच्या आगोदर आम्ही एका हॉटेल मध्ये थांबलो जिथून काही खाद्य पदार्थ घ्यायचे होते पण काही मिळाले नाहीत, २ नंबरची सोय पण तिथे चांगली होती. तिथून पुढे “अंजनेरी किल्ला” एकदम खास दिसत होता, जबरदस्त मोठा आणि उंच असा किल्ला.
थोड्याच वेळात आम्हाला पेगलवाडी फाटा लागला, डावीकडे वळून गाडी बाजूला लावली आणि पूर्ण माहिती विचारून घेतली … तोपर्यंत काही छोट्या-मोठ्या गोष्टी, बिस्कीट, ब्रेड, मेणबत्ती … अश्या गोष्टी घेतल्या. १-२ टाईमपास फोटो काढले.
________________________________________________________________________________
इथून पुढचा प्रवास म्हणजे मस्तच आहे, कारण चारी बाजूला डोंगर आणि त्यांना धुक्यांनी कवटाळले होते, अतिशय आल्हाददायक असे वातावरण, पुण्यात गाड्यांचे होर्न आणि सिमेटची जंगल पाहून रोज जगात असतो पण असे वातावरण जिथे हे काहीच नाही …. थंड वार, दाटलेले ढग, गच्च धुके, बरोबर मातब्बर मंडळी, इशय एंडच.
इथून हरिहर गडाकडे जाताना पहिने –> भिलमाळ –> कोजुली –> सामुडी –> पुलाचीवाडी –> असवली –> निरगुडपाडा .
पहिने हे Climbing साठी प्रसिद्ध ठिकाण आहे, येथे नवरा-नवरी सुळ्खे आहेत जिथे Climbing आणि Rappelling केले जाते, धुक्यांमध्ये खूपच सुंदर दिसत होते हे दोन सुळ्खे.बारीक पावसामुळे ३ DSLR असूनही बाहेर काढता येत नव्हते, त्यामुळे या ट्रेकची सगळी फोटोग्राफी हि मोबाईलनेच झाली.
आम्हाला निरगुडपाडा येथे जायचे होते, जिथून हरिहरचा ट्रेक सुरु होणार होता, बोलण्याच्या नादात एका ठिकाणी उजवीकडे जायचे होते पण आम्ही सरळ गेलो …. पुन्हा एका काकांना विचारले तर त्यांनी सांगितले पुढे आलात म्हणून, परत गाडी वळवून मागे गेलो. १५-२० मिनिटात निरगुडपाडा गाव आले, एका घराच्या मागे गाडी लावली, ब्यागा काढल्या, सर्व सामान घेतले आणि पायपीट सुरु केली.
गमती-जमती करत डोंगर चढत होतो, खडा चढ होता, मळलेली वात होती, आजूबाजूला झाडी, अधून-मधून पाऊस येत होता, तरीपण मोबाईल फोटोग्राफी चालूच होती. वाटेत नागफणी फुल भरपूर होती, विवेक काळे सरांचा अनुभव ऐकल्यापासून जंगलातल्या फुलांकडे आणि वनस्पतीकडे बघण्याचा नजरिया बदलला होता. आमचे हेर अधून मधून महत्वाची माहिती देत होते किल्ले, इतिहास, जंगल, जंगली प्राणी याबाबत खूप काही माहिती ते देत होते. पावला-पावलावर ज्ञानात भर पडत होती.
वाटेत आमच्याबरोबर नाशिकची काही औलादी होती, टिपिकल कलंकित भटके होते, उगाचच बोंबलायचे .. फालतू जोकेस … सिगरेटवाढत चालले होते, आमि ते बरोबर आले की थांबायचो, मग ते पुढे गेलो की परत चालायचो, पहिला टप्पा आम्ही जवळ- जवळ पार केला होता, एक मोठा चढ संपला होता.
शेवटचा टप्पा राहिला होता, पण हरिहरगड काही धुक्यांमुळ दिसत नव्हता, खूप वाट पहिली धुके कमी होण्याची पण काही कमी होत नव्हते…. पाऊस कमी झाला होता पण धुके दाट होते, त्यामुळे जेवण करायचे ठरवले, बोक्यान मस्त चटणी आणि चपाती आणली होती, थंड वातावरणात ती तिखट चटणी लयच भारी लागत होती .
५-१० मिनिटातच ती चटणी होत्याची नव्हती झाली. पाटदिशी जेवण आटपल आणि गडाकडे पळू लागलो, बारीक पाऊस सुरु झाला … जोरदार वारा चालू होता .. आणि त्यात दाट धुके … पुढच्या २० मिनिटात आम्ही जिथून हरिहरगडाच्या त्या प्रसिद्ध आणि जबरदस्त पायऱ्या चालू होतात तिथे पोहचलो … ९८ पायर्या आहेत पण लयच वंगाळ, पायऱ्या आहेत, एक काम चांगले आहे कोणीतरी हरएक पायरीवर खच मारून ठेवली आहे जेणे करून हाताने घट्ट धरता येते आणि आरामात वरती जाता येते.
वरून काही लोक येत होती त्यामुळे आम्ही खालीच थांबलो होतो, जगतगुरू आणि आमचे हेर फोटो घेत होते, मी पण काही फोटो काढले एक video घेतला, बोका सगळ्यात आगोदर वरती गेला त्याच्या मागे मी होतो, जगतगुरू आमचे फोटो घेत होते, जगतगुरूच्या पाठीमागे हेर होते आणि शेवटी हास्यसम्राट…. हे लोक येता-येता पायर्यांवर ज्या खाचा आहेत त्यामधला गाळ काढत होते, जेणेकरून बाकीच्यांना सोपे पडेल, मी video शूट केला पण तो fast motion मध्ये शूट झाला, सगळे माझ्याकडे असे बागात होते जसे मला टाक्त्यात खाली ….. आम्ही सगळे १०-१५ मिनिटातच महादरवाज्या जवळ पोहचलो जिथे मनसोक्त फोटोग्राफी केली .. सेल्फी काढले ….
इथ जरा वेळ काढून आम्ही पुढे सरलो … आम्हाला काय हो …. मुक्कामच होता त्यामुळ निवांत आपल हालत-डुलत किल्ल्याची हरेक गोष्ट नीट बघत … फोटो काढत आम्ही चालत होतो … पुढे गेलो तर आम्हाला थोड्या पायऱ्या चढायच्या होत्या … आणि आमचे जगतगुरू लीड करत होते …. पुढे ते … आणि आम्ही माघे …. अचानक आमचे नेते थांबले … कारण त्यांचा रस्ता एका माकडाने आढवला होता … नेते थोडे भिले होते पण आजिबात भिलोय असे दाखवत नव्हते ….. आमचे नेते खालच्या पायरीवर आणि ते माकड वरच्या पायरीवर …. आता काय कराव ….
माकडाबरोबरचा खेळ संपवून आम्ही पुढे गेलो …. मस्त दगडांच्या खाचेतून वरती जायचं होते … अतिशय डेंजर आणि भारी वाटणारी वात होती … मी आणि जगतगुरू मोबाईल फोटोग्राफी करत चालायचो ….
पुढचे वर्णन , दुसऱ्या भागात ….
सेवेचे ठायीतत्पर,
लवटे-पाटील – सांगलीकर
0 comments on “हरिहरगड – अंजनेरीगड : भाग १” Add yours →