दिल्ली दरवाज्याच्या मुलुखात – भाग १
—————————————–
मराठी देश्यातील किल्ले म्हणजे एक जीवन जगण्याचा आणि अभ्यासाचा विषय जो आपणा सर्वांना माहितच आहे, पण या प्रदेश्यात विविध प्रकारचे किल्ले आहेत ज्यांचे सौंदर्य आणि इतिहास हा काळानुसार बदलत गेला, महाराष्ट्राचे प्राकृतिकदृष्ट्या कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट व डोंगराळ प्रदेश, आणि महाराष्ट्र पठार असे विभाग पडतात. पर्वतरांगांमध्ये सातपुडा,सह्याद्री अश्या पर्वतरांगा आहेत ज्यामध्ये विविध उपरांगाही आहेत.
आजवर मी माझ्या भटकंती मित्रांबरोबर सह्याद्रीची रांग बरीच पहिली, पण यावेळी आमचे हेर बोम्बल्या फकीर यांनी सातपुडा पर्वतरांगांमध्ये भटकंतीचा मनसुबा आखला होता, ज्यामध्ये दुर्दैवाने त्यांना स्वता सामील होता आले नाही… पण आमचे बाकीचे सहकारी बरोबर घेवून तुम्ही जावच असा हट्ट त्यांनी धरला आणि आम्हाला सातपुडा पर्वतरांगांमध्ये ४-५ महत्वाचे किल्ले पाहून येण्याचा सल्ला त्यांनी दिला. यावेळी आम्ही १० जन होतो त्यांचा परिचय मी तुम्हाला करून देतो …
१) मी स्वता
२) विशाल सावंत उर्फ “जगतगुरू“.
३) विशाल नाईकवडी उर्फ “सर एलियन”
४) साईराज उर्फ “कर्नाटक डेपो”
५) जयदीप दौंडकर उर्फ “लंडन रीटर्न“
६) मनोज भालेघरे उर्फ “बापू”
७) रवींद्र शेडगे उर्फ “जिद्दी”
८) जयवंत फाळके उर्फ “शांती सेना”
९) अनिल दुधाने उर्फ “ध्येयवादी”
१०) प्रशांत कदम उर्फ “पिके“
भटकंतीचा मार्ग आगोदरच आखून दिला होता, यावेळी आम्ही १० जन होतो, पल्ला लांबचा होता, लगतची सुट्टी आणि योगायोग म्हणजे स्वतंत्र दिवस किल्ल्यावर साजरा करण्याचा योग होता.५ किल्ले आणि एक लेणी असा मनसुबा होता. १४ तारखेची सकाळ उजेडली आणि ४ वाजता घरातून पाय बाहेर पडला…….
१० जन असल्याने आमच्याकडे २ चारचाकी होत्या, सकाळी ४ वाजता मी आणि जगतगुरूनी भोसरी गाव सोडले, नगररोडवरून सर एलियन, लंडन रीटर्न आणि कर्नाटक डेपो या तिघांना उचलायचे होते, कर्नाटक डेपो रात्रभर प्रवास करून सोलापुरातून पुण्यात पोचला होता आमचे मित्र राहुल कराळे यांनी त्याना हडपसरवरून नगररोडला सकाळी ५ वाजता पोहचवले होते.
सर्वांना उचलून ब्यागा गाडीच्यावर बांधल्या तोपर्यंत दुसरी गाडी घेवून बापू, जिद्दी, ध्येयवादी, पिके आणि शांती सेना यांनी आम्हाला गाठले.
मग दोन्ही गाड्या औरंगाबादकडे धावू लागल्या सकाळची वेळ होती वाहनांची गर्दी जरा कमीच होती त्यामुळे सुसाट वेगाने गाड्या धावत होत्या ….. दिवस उजडत होता, सूर्य हळू-हळू डोके वर काढत होता अंतरही कमी होत चालले होते, बर्यापैकी अंतर कापल्यावर एक थांबा घेतला, सर्वांना जाम भूक लागली होती आणि नेहमीप्रमाणे ट्रेकची सुरवात मिसळणे होणार यात काही शंका नव्हती ….
जगतगुरू आणि मिसळ यांचे एक वेगळेच नाते आहे, पोटाची वाट लागली तरी चालेल पण मिसळ गिळायला पाहिजेच असे असते यांचे … असो … “असते एखाद्याचे” …
गाडीतून उतरून टेबलाच्या आजूबाजूला सगळे गोळा झाले, जगतगुरूंनी १० मिसळ मागवल्या, मिसळ येवूपर्यंत जे कोणी पहिल्यांदाच भेटले होते त्यांनी एकमेकांची ओळख करून दिली, गप्पा-गोष्टी चालू होत्या, कुठून-कसे जायचे यावर विचारविनिमय चालू होता अनिलभाऊंनी दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांचे पुस्तक सोबतीला आणले होते, माझ्याकडे आमच्या हेरांनी जे नियोजन दिले होते त्याची प्रिंट होती. खाणे-पिणे झाले मग पुन्हा प्रवास सुरु झाला, तासाभरातच नगर आले, न थांबता आम्ही औरंगाबादकडे प्रवास सुरु ठेवला …..
औरंगाबाद …..
गावाचे नाव ऐकताच भला मोठा इतिहास डोळ्यापुढे तांडव करायला लागतो, डोळ्यापुढे बर्याच ऐतिहासिक घटना नाचू लागतात, कुठे चीड तर कुठे रागाराग होते, शहाजीराजांपासून ते थोरल्या शाहू महाराजांचा इतिहास डोळ्यापुढे येतो, कारण नावच आहे “औरंगाबाद”….
खुद्द बादशहा औरंगजेबाने वसवलेले शहर, शहाजीराजांपासून ते थोरल्या शाहू महाराजांना पाहिलेला असा हा बादशहा. आणि जबरदस्त ऐतिहासिक वारसा असलेले शहर आणि असंख्य ऐतिहासिक घडामोडींचा पुरावा असलेले शहर. शहर पार करत असताना असंख्य विचार मनामध्ये येत होते, अनेक विचारांनी चल-बिचल होत होती. गाडीमध्ये इतिहासाची चर्चा होत होती….
थोड्याच वेळात “दिल्ली दरवाजा” दिसला …. दुर्गस्थापत्य शैलीचा उत्तम नमुना असलेल्या या दरवाजात तत्कालीन इतिहासाच्या खाणाखुणा आढळतात.
लहुगड
गाडीतून शहर पाहत पाहत आम्ही औरंगाबाद सोडले आणि जळगाव हायवे धरला, साधारण ३० किलोमीटर अंतरावर फुलंबरी गाव लागते. फुलंबरी गावातून अंदाजे ५-६ किलोमीटर वर पालफाटा लागतो, या फाट्यावर एक मोठी कमान दिसेल ज्यावरती लिहिले आहे
“श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान लहू-अंकुश जन्मस्थान, लहुगड”, कमानीच्या बाजूलाच एक हनुमानाचे मंदिर आहे.
पालफाटा ओलांडला की जातेगाव आणि नांद्रा या मार्गे १० किलोमीटर अंतरावर लहुगड आहे.
औरंगाबाद ते लहुगड मार्ग:
औरंगाबाद –> जळगाव हायवे –> फुलंबरी –> पालफाटा –> राजूर रोड –> जातेगाव –> नांद्रा –> लहुगड
आम्ही २० मिनिटात गडाच्या पायथ्याला पोहचलो, गड फारच लहान, १० मिनिटात गडावर जाऊ शकता.
गडाचा इतिहास फारसा उपलब्द नाही पण गडावरच्या गुहा आणि पाण्याच्या टाक्या पहिल्या तर कदाचित हा किल्ला ७व्या किवा ८व्या शतकात बांधलेला असावा किंवा त्याच्याही आधी.
गडावरती गेला की एक अतिशय सुंदर आणि डोंगरात कोरलेले सुंदर असे महादेवाचे मंदिर आहे , कोरीव काम अगदी सुरेख आणि अनोखे आहे, या गडाचा ताबा आता एका साधू बाबाने घेतला आहे ज्याला फ़क़्त लहू-अंकुश यांचा जन्म या गडावर झाला आहे एवढाच इतिहास माहित आहे. गावकर्यांनी याला एक पारा बांधून दिला आहे जिथे दिवसभर हे साधूबाबा बसून असतात.
मंदिराच्या वरती एक कळसाचे बांधकाम केले आहे जे आजच्या काळातले आहे. या गुहेच्या बरोबर समोर एक गणपतीचे मंदिर आहे, मंदिरात गणपतीची नविन मुर्ती व दोन पुरातन मुर्त्या ठेवलेल्या आहेत.
मंदिराच्या उजव्या बाजूला वरती जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या चढून वरती गेला एक छोटस गडाचे द्वार लागते जे पूर्णपणे कातळात कोरलेले आहे पायऱ्या चढून वरती गेला की समोरच ८ टाक्यांचा समुह आहे.
पाण्याच्या टाक्या पाहून आम्ही उजव्या बाजूला गेलो, जी वाट गडाच्या पाठीमागच्या बाजूला जाते, ओळून गेले की डाव्या हाताला एक जमिनीत कोरलेली प्रशस्त गुहा दिसेल, यात उतरण्यास पायऱ्या आहेत आणि एक छोटेसे मंदिर पण आहे ज्यामध्ये २-३ जुन्या दगडात कोरलेल्या मुर्त्या आहेत. ही गुहा पूर्ण गोलाकार आहे जी चारी बाजूनी एकमेकास जोडलेली आहे सध्या त्यामध्ये पाणी आहे, ही गुहा एकूण ९ खांबांवर उभी आहे.
हा जो कधी प्रकार आहे तो खर्च जबरदस्त आहे बरेच तर्कवितर्क लावणारा प्रकार आहे हा … नक्की काय असेल यावर नक्की काही सांगू शकत नाही कारण पाण्याची सुविधा म्हणून हे कोरले गेले आहे की रहायची व्यवस्था म्हणून कोरले गेले हे नक्की सांगू शकत नाही, कारण पाण्याची सुविधा म्हणल तर पुढे मग मंदिर का केले, पूर्ण भरले तर ते पाण्याखाली जाणार हे नक्की. सध्या तर तिथे पाणी आहे कारण पावसाचे पाणी सरळ आत जात असावे कारण अडवण्यासाठी काहीच नाही, माझ्या मते तर ही राहण्यासाठीच असावी.
पूर्ण गड पाहून आम्ही गड उतरू लागलो, गडाच्या बाजूलाच एक डोंगर आहे ज्यावर एक छोटी गुहा (लेणी) कोरली आहे, अगदी हाकेच्या अंतरावर आहे त्यामुळे लगेच जाता येते… आम्ही १० मिनिटात तिथे गेलो. महादेवाचे मंदिर आहे दरवाज्यावर कोरलेले द्वारपाल आपणास दिसतात दोन खांबी लहानसे मंदिर कातळात कोरले आहे.
गुहा पाहून आम्ही गाडीजवळ गेलो, सगळ्यांना निबार भूक लागली होती, चपाती-चटणी, शेंगदाण्याच्या चपात्या असा मजबूत आहार सोबत होताच, २० लिटर पाण्याचे ३ नग बरोबर होते, तिकडचे पाणी पिण्यासाठी चांगले नाही म्हणून बरोबर पाणी घेवून जाणे असा सल्ला बोम्ब्ल्याने दिला होता. खावून झाले आता पुढचा रस्ता होता तो घटत्कोच लेणी पहायचा.
घटत्कोच लेणी
पुन्हा पालफाट्यावरून जळगाव हायवे ला जायचे होते म्हणजे आलेलाच रस्ता, लहुगड पासून घटत्कोच लेणी मार्ग खालीलप्रमाणे …
लहुगड –> नांद्रा –> जातेगाव –> राजूर रोड –> पालफाटा –> जळगाव हायवे –> उजवीकडे जाणे –> बाबुळगाव –> माणिकनगर –> गोळेगाव फाटा –> उडणगाव –> अंबाई –> नानेगाव –> जंजाळा
जेवण झाले, लहुगड सोडला आणि घटत्कोच लेणी पाहण्यासाठी वरती दिलेल्या मार्गाने आम्ही जंजाळा गावाकडे प्रवास सुरु केला, जळगाव हायवे सोडला की रस्ता बर्यापैकी खराब आहे, स्वातंत्र्यानंतर ६९ वर्ष्यांनी सुद्धा हा भाग किती दुर्लक्षित आहे याची जाणीव नक्कीच होते. कधीतरी एखादी ST आडवी जाते, नाहीतर या लोकांनी स्वताच सोय केली आहे जाण्या-येण्याची … अतिशय दुर्लक्षित भाग आहे आणि जास्तीतजास्त मुस्लिम जनसमुदाय इथॆ आहे … आदळत आपटत आम्ही नानेगाव मध्ये पोहचलो हे गाव म्हणजे खरच एक विषय होता …. पूर्ण मुस्लिम समुदाय असलेले हे गाव, मी कधी भारत-पाकिस्तान सीमेवर नाही गेलो पण जे काही सिनेमात पहिले आहे त्यावरून असे वाटले की मी कदाचित भारत-पाकिस्तान सीमेवरच आहे.
नानेगाव पार झाले एक छोटासा घाट लागला तिथे थोडावेळ थांबलो, खूपच सुंदर देखावा दिसत होता, भरपूर झाडी आणि ढगाळ वातावर होते ….
इथून पुढे लगेचच जंजाळा गाव लागले, गाव खूपच मागासलेले आणि अविकसित आहे, याच गावातून लेणी पहायला जावे लागते पण साधा बोर्ड सुद्धा कुठे लावलेला नाही, पूर्ण मुस्लिम समाजाचे हे गाव, पुढेच एक किल्ला दिसत होता जो आमच्या नियोजनात नव्हता, किल्ला कोणता हेही आम्हाला माहित नव्हते, गावात विचारले तर एकालाही किल्ल्याचे नाव माहित नव्हते….
आम्ही विचारले ….
“वो कोनसा किला हे ? क्या नाम हे उस किले का?” ..
वो किला हे उसका नाम नही हे, हम किला ही बोलते हे ….
अनिल भाऊंनी, मांडे सरांच्या पुस्तकाची पान चाळली मग तो “वैशागड” आहे हे समजले.
गाड्या एका घराच्या समोर लावून आम्ही सगळे निघालो, लेणी पाहून परत यायचे असा बेत होता म्हणून कुणीच ब्यागा घेतल्या नाहीत, मी मात्र माझी ब्याग बरोबर घेतली. १० मिनिटात आम्ही पायऱ्यांजवळ पोहचलो, शासनाने भरपूर खर्च करून पायऱ्यां बांधल्या आहेत, त्यामुळे लेण्यांपर्यंत जाणे सोयीचे झाले आहे. आमच्याबरोबर गावातले २ लोक बरोबर आले …. असच सहज ते बरोबर आले होते .. एकाचे नाव होते “शाहरुक खान” आणि दुसरा होता “रफिक”.
थोड्या पायऱ्या उतरून गेल्यावर लेण्यांचे दर्शन झाले, बाजूला घनदाट जंगल आणि डोंगरात कोरलेली ती अप्रतिम लेणी, जीव ववाळून टाकणारा देखावा होता तो …
लेण्यान्बाद्द्ल खूप काही शोधण्याचा प्रयत्न केला होता पण काहीच माहिती मिळत नव्हती, १-२ ठिकाणी काही माहिती मिळाली ती म्हणजे, ही लेणी ६ व्या शतकात बौद्ध धर्माच्या अनुयायांनी बांधल्या आहेत, या लेण्याना घटत्कोच हे नाव देण्याचे कारण म्हणजे “पहिला चंद्रगुप्त घटत्कोच” हे असावे.
एक मुख्य दरवाजा आणि ४ खिडक्या असलेली ही लेणी अतिशय भव्य आहे, २० भल्या मोठ्या खांबांवर ही लेणी उभी आहे, आतमध्ये मुख्य गाभ्यामध्ये गौतम बुद्धांची भव्य मूर्ती दगडात कोरली आहे. खर तर वर्णन करणे फारच अवघड आहे या लेणीच, भव्यता काय असते हे इथे समजते आणि ते ही एका डोंगरात कोरलेल्या वास्तूचे.
लेणी पाहून परत जायचा विचार होता, अंबाई गावात जावून मुक्काम करायचा आणि तिथून मग सकाळी उठून वेताळवाडीचा किल्ला पहायचा असे नियोजन होते, पण पुढेच एवढा दांडगा किल्ला दिसतोय तो चुकवून कसे जायचे हाही विचार आला, आणि संध्याकाळचे ६ वाजले होते किल्ल्यावर आत्ता गेले की अंधार पडणार मग पुढचे नियोजन फसणार, मग जरा विचार विनिमय करून आम्ही लेण्यांमध्येच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. सकाळी लवकर उठून किल्ला पाहून मग पुढे जायचे असे ठरले.
मी माझी ब्याग बरोबर आणली होती, मग बाकीचे सगळे ब्याग आणण्यासाठी पुन्हा गावामध्ये गेले, त्यात अगदी जोराचा पाऊस सुरु झाला, मी, शाहरुक खान आणि रफिक तिथेच थांबलो, बर्याच गोष्टी ते मला सांगत होते, आणि आमचे बाकीचे सहकारी पावसात अडकले होते, पाऊस कमी झाल्यावर सगळे आले, येताना जेवण बनवण्याच्या तयारीने सगळे सामान घेवून आले.
चूल मांडली सगळ्यांनी तयारी सुरु केली, फोन ला रेंज नव्हती, घरी फोन तर सगळ्यांना करायचा होता, रवि भाऊंनी स्वयपाकाची तयारी सुरु केली, सर एलियन ट्रायपोड लावून फोटो काढत होते, मी, साई आणि जयवंत भाऊ थोड्या पायऱ्या चढून वरती गेलो, रेंज आली फोनवर बोलणे झाले. चुलीपुढे फोटोशूट चालले होते, एकदम मज्ज्यानी लाईफ जगात होते सगळे.
जेवण तयार झाले, बरोबर आणलेले ही बरेच काही होते, गप्पा-गोष्टी करत जेवण झाले, भांडी-कुंडी बाजूला लावून कोण कुठे झोपणार हे चालू झाले, सर एलियन यांनी ५ माणसांचा तंबू आणला होता, तो बांधून मग ते, जगतगुरू, लंडन रीटर्न आणि कर्नाटक डेपो हे तंबूत झोपणार हे नक्की झाले, आम्ही उरलेले सगळ्यांनी आपआपल्या जागा ठरवल्या आणि तयारी सुरु केली, त्याआधी भटकंती आणि इतिहास या विषयांवर माझे जे काही मत होते ते मी सर्वांपुढे मांडले, चर्चा झाली, विचारांची देवाण-घेवाण झाली आणि मग सगळे झोपी गेले.
क्रमश:
अप्रतिमेष्ट
जरी आम्हाला चुकवुन जाता तुम्ही भटकांतीला तरीही ….
नेहमीप्रमाणे सुंदर झालाय ब्लॉग. पुढच्या भागाची वाट पहातोय
लवटे पाटील ,मस्त !! माझ्या मोटारसायकल वारीची आठवण ताजी झालीय…नानेगाव अन जन्जाळा गावची मुस्लीम यजमान भाऊबंद तर मनात घर करून बसलेय.
पुढला भाग येवू द्या लवकर !!
पुढच्या भागाची वाट पहातोय
प्रशांत दा खुपच मस्त लिहले आहे भास होतो आपण तिथे आसलेचा..!
छान मांडणी.
तुमच्या शब्द वर्णनातून सर्व परिसर बघून आल्या सारखे वाटले
पाटील .
पुढील भाग लवकरच येऊ दे
Hi, just wanted to tell you, I enjoyed this post. It was inspiring.Keep on posting!
Thanks