कथा १९ आणि २० फेब्रुवारीची !!
♣१९ फेब्रुवारी १६३० ♣
फार फार वर्ष्यापुर्वीची गोष्ठ आहे, आशिया खंडात एक समृद्ध राज्य होत, जिथे सिंधू संस्कृतीचे लोक राहत होते, खूपच धार्मिक आणि परंपरेने चालत आलेल्या चालीरीती पदराला बांधून सर्व लोक गुण्या-गोविंदाने राहत होते, हळू हळू नागरी व्यवस्था जन्माला आली आणि छोटी-छोटी गाव अस्तित्वात येवू लागली, कालांतराने एक अभ्यासू माणूस (आचार्य चाणक्य )जन्माला आला ज्याने “अखंड भारत” हे स्वप्न पाहिले, याच काळात एक अतिशय अहंकारी आणि गर्वाने भरून असलेला नंद घराण्यातला राजा “धनानंद” याचे राज्य (मगध) होते, बरेच मोठे राज्य होते आणि अतिशय बलशालीही होते, इतके बलशाली होते की जग जिंकण्याची जिद्द उराशी बाळ्घून घरातून निघालेला “सिकंदर” सुद्धा या राज्यावर आक्रमण करताना मागे हठ्ला.
मुळातच खूप अहंकारी आणि गर्वीष्ठ असलेला धनानंद, प्रजेच्या हिताच्या प्रशासनाकडे त्याचे लक्ष नव्हते. यामुळे मगधमध्ये असंतोष व राजकीय अस्थिरता वाढली होती. कालांतराने आचार्य चाणक्य यांच्या कुशल अर्थशास्त्र आणि राजकारणाच्या मार्गदर्शनाने “चंद्रगुप्त मौर्य” याने धनानंदचा पराभव करून “मौर्य साम्राज्य” स्थापन केले व अखंड भारताचा सम्राट बनला. चंद्रगुप्तने अलेक्झांडरचा सेनापती सेक्युलस निकेटरचा पराभव करून ग्रीकांचे वर्चस्व संपुष्टात आणले. चंद्रगुप्त मौर्यने भारताचा मोठा भूभाग मौर्य साम्राज्याचा अधिपत्याखाली आणला, तो विस्तार बिन्दुसारच्या काळात चालू राहिला व सम्राट अशोकच्या काळात ( इ स.पू.२७३ ते२३४) त्या विस्ताराने कळस केला आणि चाणक्य यांची अखंड भारत ही संकल्पना अस्तित्वात आणली.
हा काळ आहे इ स.पू. ३२३ चा. त्यानंतर पुढे इ स.पू. ३०० पर्यंत चंद्र्गुप्तने दक्षिणभाग सुद्धा मगध साम्राज्यात सामील करून घेतला, आणि पूर्ण भारत एका छत्राखाली आणला आणि एक संपण साम्राज्याची उभारणी केली.
(फोटो आभार : इंटरनेट)
सम्राट अशोक (राजा प्रियदर्शी, देवांचाही प्रिय), हा मौर्य साम्राज्यातला अतिशय पराक्रमी राजा, त्याने कलिंग हे राज्य जिंकून ते ही मगध साम्राज्यात सामावून घेतले, सम्राट अशोकच्या मृत्युनंतर ( इ स.पू. २३४ ), मौर्य साम्राज्य पुढील ५० एक वर्षे टिकले. सम्राट अशोकच्या मृत्युनंतर मौर्य साम्राज्य “पूर्व” आणि “पश्चिम” अशा भागात विभागले गेले. पूर्व भागात सम्प्रतिचे शाषन होते तर पश्चिम भागात कुणालचे शाषण होते. परंतु, इ स.पू. १८० पर्यंत पश्चिम भागावर बॅक्ट्रीया (अफगणिस्तान) यूनानी लोकांची सत्ता प्रस्तापित झाली होती. आणि पूर्व भागावर सम्राट दशरथ यांची सत्ता होती, जे सम्राट अशोक यांचे पुत्र होते. शेवटचा मौय सम्राट बृहद्त्त याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने वध केला व मौर्य साम्राज्याचा अंत झाला.
शुंग, शक आणि सातवाहन
मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर उत्तर भारतावर शुंग वंश, पश्चिमेला शक राज्य् व दक्षिणेला सातवाहनांचे प्राबल्य होते. भारताच्या वायव्य प्रांत व अफगणिस्तानवर ग्रीक राज्यकर्त्यांनी पुन्हा वर्चस्व मिळवले परंतु कालांतराने ते भारतीय संस्कृतीत मिसळून गेले.
सातवाहन (इ स.पू २३०- २२५)
मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी इ स.पू. २३०- २२५ पर्यंत दक्षिण भारतातील मोठ्या भूभागावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रूपांतरित झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. ७८ रोजी महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र शातकर्णी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू शालिवाहन शक आजही रूढ आहे. याच काळात शक राज्यकर्त्यांनी पश्चिम भागावर नियंत्रण मिळवले होते. शक हे मूळचे मध्य अशियातील लोक होते.
ग्रीक-कुशाण (इ स.पू १८०)
अलेक्झांडरच्या म्रुत्यूनंतर त्याचे साम्राज्य त्याच्या सेनापतींनी वाटून घेतले. भारतावरील त्यांची पकड मौर्य साम्राज्य काळातच ढिली पडली. परंतु भारताशेजारील देशांमध्ये त्यांनी पकड एकदम मजबूत ठेवली होती. पर्शिया (इराण) व बॅक्ट्रीया (अफगणिस्तान) मध्ये ग्रीक राज्ये भरभराटीस आली. मौर्य साम्राज्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबध होते असे दिसते. या राज्यांमध्ये ग्रीक-भारतीय अश्या प्रकारची मिश्र संस्कृती उदयास आली व याच काळात भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला वायव्य प्रांत सांस्कृतीक दृष्ट्या वेगळा बनू लागला. डेमेट्रीयस या ग्रीक राजाने इसपूर्व १८० मध्ये भारतीय-ग्रीक राज्याची स्थापना केली. या राज्याचा विस्तार अफगणिस्तान, पाकिस्तान, पंजाब प्रांतापर्यंत होता. ही ग्रीक राज्ये २ शतकापर्यंत टिकली. या काळात ३० पेक्षा अधीक ग्रीक राज्यकर्तांनी राज्ये केली. ही राज्ये एकमेकांशी तसेच भारतीय राज्यकर्त्यांशी लढत. मिलींद अथवा मिनँडर हा एक महान ग्रीक भारतीय राज्यकर्ता होऊन गेला.
गुप्त साम्राज्य (इ.स. २४० ते ५५०)
गुप्त साम्राज्याचा काळ हा भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो. या काळात भारतात बराच काळ राजकिय, आर्थिक सामाजिक व लष्करी स्थैर्य लाभले. श्रीगुप्त या गुप्त राज्यकर्त्याने गुप्त राज्याची स्थापना केली त्यानंतर काही वर्षातच चंद्रगुप्तने गुप्त राज्याचे साम्राज्य बनवले. समुद्रगुप्त, चंद्रगुप्त, विक्रमादित्य यांसारख्या महान राज्यकर्त्यांनी गुप्त साम्राज्य वाढवले.
गुप्त साम्राज्याचा कार्यकाळ इ.स. २४० ते ५५० पर्यंत मानला जातो. कालिदास हा महान कवी गुप्त सम्राटांच्या दरबारी होता असे मानतात. पुराणांची रचना याच काळात झाली असेही मानतात. गुप्त साम्राज्याच्या नंतरच्या काळात पश्चिम अशियातील हूण आक्रमकांनी केलेल्या आक्रमणांनी गुप्त साम्राज्य क्षीण झाले. त्यानंतर हर्षवर्धन या कनौज च्या सम्राटाने भारतीय राज्ये पुन्हा एका छत्राखाली आणली. त्याचे साम्राज्य तो जिवंत असे पर्यंत टिकले परंतु प्रभावी वारसदार नसल्याने ते त्यानंतर लगेचच कोसळले. ७ व्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येउन लयाला गेली.
(वरील फोटो हा श्री.निनाद बेडेकर यांच्या पुस्तकातून घेतले आहे.)
मध्ययुगीन भारत
गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. ७ व्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येउन लयाला गेली. १३ व्या शतकातले विजयनगरचे साम्राज्य हे शेवटचे मध्ययुगीन हिंदू साम्राज्य होते. यानंतर भारतातील बौद्ध धर्माचे प्रस्थ कमी झाल्याचे समजले जाते. या काळात दक्षिण भारत व महाराष्ट्रात राष्ट्रकूटांचे राज्य होते तर मध्य व पश्चिम भारतात मालव प्रांतात प्रतिहारांचे पूर्वेकडे बंगालमध्ये पाल साम्राज्य उदयास आले ज्यांनी काही काळ जवळपास संपूर्ण उत्तर भारत व अफगाणिस्तानापर्यंत आपल्या सीमा वाढवल्या होत्या. प्रतिहारांनी उमय्यद खलीफांच्या काळात झालेल्या पहिल्या इस्लामी आक्रमणाचा प्रखर सामना केला व पुढील तीन चार शतके इस्लामी आक्रमणे होण्यापासून भारताचे रक्षण केले. प्रतिहारांचे मध्य व पश्चिम भारतावरील साम्राज्य कालांतराने क्षीण झाले व अनेक लहान सहान राज्यांमध्ये विभागले जी राज्ये राजपूत राज्ये (राजस्थानमधील) म्हणून ओ़ळखली जात, त्या राज्यांनी अगदी भारत इंग्रजांपासून स्वतंत्र होईपर्यंत आपले अस्तित्व टिकवले होते.
या राजपूत राज्यांनी उत्तर भारतातील मोठ्या प्रांतावर अनेक शतके राज्य केले, यापैकी पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजपूत राजा दिल्लीचा राजा होता व इस्लामी आक्रमकांविरुद्ध अनेक युद्धे केली. भारताच्या इतिहासातील पराक्रमी योद्धयांमध्ये पृथ्वीराजची गणना होते. मोहम्मद घौरी याने पृथ्वीराजचा पराभव करून त्याचा वध केला व स्वतः दिल्लीचा शासक बनला व भारतावर अधिकृतरीत्या इस्लामी राजवट सुरू झाली.
१२ व्या शतकात पृथ्वीराज चौहानचा मोहम्मद घौरीने पराभव केला व भारतात अधीकृतरित्या इस्लामी राजवट सूरु झाली. मोहम्मद घौरीने आपल्या तुर्की गुलामांना राज्यकर्ते बनवले व उत्तर भारतावर गुलाम घराण्याची सत्ता राहिली. भारताच्या मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट आली, त्यामुळे भारतीय संस्कृतीत इस्लामी सरमिसळ या काळात सुरू झाली. त्यामुळे अनेक सामाजिक बदल भारतात घडून आले. भारतीय स्थापत्य शैली, संगीत व भाषेवर खूप मोठा इस्लामी प्रभाव दिसून येतो तो या काळात रुजला होता. दिल्ली सल्तनतीत कोणत्याही घराण्याला मोठा काळ प्रभुत्व गाजवता आले नाही. एकूण ३०० वर्षांच्या राजवटीत ५ ते ६ घराण्यांनी दिल्ली सल्तनतीत राज्ये केली. ही सर्व घराणी प्रामुख्याने इस्लामी होती. खिल्जी घराण्याने भारतभर मोहिमा काढून भारतातील अनेक हिंदू राज्ये नष्ट केली.
नंतर, भारतावर खूपच आक्रमणे झाली विशेष म्हणजे ९व्या शतकापासून, एक काळ असा होता की, त्या काळात मराठीप्रदेशांकडे ज्याला त्यावेळी दख्खन म्हणले जायचे, एक सर्वसंपन प्रदेश म्हणून पहिले जात होते. इथे शालिवाहन, शिलाहर, चालुक्य, कदंब अशा अनेक राजवटींनी राज्य केले. देवगिरी ही त्यांची राजधानी होती. इथला प्रदेश सुजलाम, सुफलाम होता. गोदावरी, कृष्णा, भीमा आदी नद्यांमुळे या भागाची सुपीकता अधिकच वाढत होती. पैठण, नाशिक इत्यादी नगरी विद्वज्जनानी, कारागिरांनी,उद्योजकांनी भरून गेल्या होत्या. इथे धर्मशास्त्र, शिल्पशास्त्र, वैद्यकशास्त्र,संगीतशास्त्र, साहित्य अशा अनेक कलांना प्रोत्साहन दिले जात होते. याच वेळी ज्ञानेश्वरासारख्या छोट्या बालकाने तर धार्मिक प्रगतीचा उचांक घाठ्ला होता. एक सर्वसंपन प्रदेश, असे हे वैभव इथे नांदत होते.
चंद्रगुप्त मौर्य नंतर “अखंड भारत” हि संकल्पना का संपली ?
समाज आणि प्रशासक, धार्मिक गोष्टींची चौकट करून बसले होते, आमचीच ती संस्कृती श्रेष्ठ आणि त्या बाहेरच आम्हाला काही दिसतच नव्हते. जातीव्यवस्थेचा साप समाजात फिरत होता. आमचा धर्म एक असूनही, आमच्या घराघरात वेगवेगळे देव होते, मनामध्ये, माणसामाणसामध्ये जातीधार्मांची खंदक होती, “अखंड भारत” ही संकल्पना कुठेतरी विसरली गेली होती.
युद्धकला, डावपेच, आधुनिक शस्त्रे जी त्या काळी उपलब्द होती त्याकडे कुणाचेच लक्ष्य नव्हते. जर कुणी राज्यावर आक्रमण केलेच तर ते थोपवावे कसे ? बाहेरून येणारा शत्रू कोण आहे त्याची संस्कृती काय आहे, त्याची शक्ती किती आहे याकडे पूर्ण दुर्लक्ष. युद्धनीती कशी असावी, शत्रूचे सामर्थ्य आणि लष्कर व्यवस्था पाहून आपण आपली युद्धनीती आखली पाहिजे यावर विचार नाही.सुखशांतीच्या काळात आजूबाजूच्या प्रदेश्यात काय चालले आहे, कोणी नवीन शत्रू जन्माला आला आहे का नाही. याकडे पूर्णपणे डोळेझाक होती.
गझनीच्या मोह्मदाबरोबर एक विद्वान आला होता, “अल बेरुनी” त्यांने इथल्या लोकांबद्दल खूप छान लिहून ठेवले आहे, तो म्हणतो,
“यांची संस्कृती आहे महान, पण यांना यांचीच संस्कृती महान असे वाटते, जगामध्ये काय चाललय हे यांना माहितच नाही”
आणि याचेच प्रमाणपत्र घेवून, अल्लाउद्धीन खिलजी फ़क़्त आठ हजार क्रूर अफगाणी घेवून चालून आला, विशेष म्हणजे लढाया झाल्या त्या दोनच !!!
पहिली म्हणजे विंध्य ओलांढून पुढे आले की “एलिजपूर” जे आजच्या खानदेश्यात आहे,
आणि दुसरी म्हणजे थेट राजधानी म्हणजे देवगिरी …..
आठ हजारी फौज घेवून एक शत्रू सरळ राजधानीच्या दारात आला, काय व्यवस्था असेल बघा.
प्रचंड लुट, क्रूरपणे कत्तली, स्त्रियांवर अत्याचार, अक्षरशा काळजाचा थरकाप उडवणारा हा प्रकार होता, राजा रामदेवरायांनी राजधानी वाचवायचा प्रयत्न केला. रयत कापून निघतेय याकडे लक्ष्य नाही आणि जरी असले तर पूर्णपणे लाचार झालेला हा राजा, ज्यावेळी कोणताच उपाय उरला नाही त्यावेळी राजा रामदेवरायांनी शरणागती पत्करली.
पुढे जावून, रामदेवरायांनी ठरलेली खंडणी दिल्लीला पाठवणे बंद केले, पुन्हा अल्लाउद्धीन खिलजीने आपला सेनापती मलिक काफुर याला ३०,००० सैन्य घेवून देवगिरी लुटायला पाठवले, राजा रामदेवराय व त्याचा पुत्र शंकरदेव यांनी चांगलीच झुंज दिली पण अपयशी ठरली, रामदेवरायास पकडले आणि दिल्लीस घेवून गेला, पुन्हा खंडणी देण्याचे मान्य करून स्वताची मुक्तता करून घेतली. पण झालेला अपमान सहन करू शकला नाही आणि लवकरच रामदेवराय मृत्यू पावला.
बापाच्या मृत्यूचा बदला, हे नवीन प्रकरण शंकरदेव यांनी सुरु केले, पुन्हा तेच ….पुन्हा मलिक काफुर आला, पण जीव गेला तरी चालेल पण बापाच्या मृत्यूचा बदला घेणार अशी मनात भावना ठेवून हा लढला आणि मरून गेला.
पुन्हा, प्रचंड लुट, क्रूरपणे कत्तली, स्त्रियांचे बलात्कार असे अनेक प्रकार चालू झाले. काफुरणे देवगिरीवर आपल्या मर्जीतले अफगाण सुबेदार नेमले होते. हे सुबेदार जनतेला प्रचंड छळू लागले, रयतेला अक्षरशा भरडून काढले, हे पाहून हरपालदेव हा रामदेवराय यांचा जावई पुढे आले व त्याने कडवी झुंज दिली आणि पुन्हा प्रदेश स्वतंत्र करून घेतला, पण हे स्वातंत्र्य जास्त दिवस टिकले नाही आणि शेवटच्या लढाईत तो शत्रूच्या तावडीत सापडला. याच दरम्यान अल्लाउद्धीन खिलजी मरण पावला होता, त्याच्या नातेवाईकांमध्ये आणि काफुरामध्ये गादीसाठी भांडण झाले आणि कुतुबुद्दीनने काफुराला मारून टाकले आणि दिल्लीचा सुलतान बनला.
त्याने आपल्या स्वभावाप्रमाणे क्रूर आज्ञा दिली, ती म्हणजे हरपालदेवला जिवंत सोलण्याची आणि सोलून झाल्यावर त्याच्या मृत्यूनंतर त्याला देवगिरीला लटकवण्याचा आदेश दिला.
कालांतराने दख्खन मध्ये सुलतान जन्माला आले, नगरचा निजाम, बिदरचा बेरीदशहा, विजापूरचा आदिलशहा, गोवळकोंड्याचा कुतुबशहा, हे सर्व हिंदूंचे कट्टर दुश्मन ! याच काळात १५१० मध्ये गोवा बंदरात पोर्तुगीज अल्फान्सो अल्बुकर्क हा आपल्या सैन्यासह आला होता. मध्यआशियातील फर्झाना प्रांताचा बादशहा “जाहिरुद्धीन मोहमद बाबर” याला त्याच्याच धर्म बांधवांनी पिटाळून लावल्याने तो लष्कर घेवून खैबरखिंडीतून हिंदुस्थानात आला आणि त्याने दिल्लीचा कब्जा मिळवला आणि तेव्हापासून दिल्लीवर मुघल साम्राज्याची सत्ता स्थापन झाली. १६०० साली, इंग्लंडमधील काही श्रीमंत व्यापार्यांनी पूर्वेकडे व्यापार करण्याच्या हेतूने “ब्रिटीश इस्ट इंडिया” कंपनीची स्थापना केली व १६०८ मध्ये राणीकडून परवानगी घेवून बंगालमध्ये प्रवेश केला, त्यांच्या बरोबर फ्रेंच ही आले.
चारीबाजूने हिंदुस्थान हा परकीयांनी व्यापला होता, इथले सर्व हिंदू स्वताचे अस्तित्व हरवून बसले होते, सुलतान लोक साम्राज्य विस्तार हेतूने एकमेकात लढत असत, यामध्ये हिंदू सरदार ही होते, मराठे होते. बादशहाची मर्जी आपल्यावर रहावी यासाठी ते सतत झटत असत. एकमेकात भांडण, सुलतानाची सेवा म्हणून आपल्याच लोकांना मारणे आणि लुटणे यातच ते धन्यता मानत. स्वताचे अस्तित्व हरवून बसले होते, अभिमान गिळून बसले होते.
एवढ्या सर्व यवन राजवटीत एकच हिंदू राज्य होते ते म्हणजे “विजयनगरचे साम्राज्य” तुंगभद्रा नदीपासून ते कन्याकुमारीपर्यंत असे हे राज्य होते. हे एकमेव हिंदू राष्ट्र संपवण्यासाठी सर्व सुलतान एकत्र आले आणि २३ जानेवारी १५६५ या दिवशी “राजा रामरायाला” पकडले आणि हुसेन निजामशहा याच्या पुढे आणले आणि रामरायाचे मुंडके छाटले. हिंदुंच्या हत्या झाल्या यामध्ये हिंदू सरदारही होते जे आपल्याच माणसांच्या हत्या करत होते. युद्ध संपताच निजामाच्या हुकुमानुसार रामरायाच्या कापलेल्या मुंडक्यातून मेंदू आणि मांस बाहेर काढून पोकळ केले आणि ते मुंडके निजामाने विजापुरास नेले आणि आपल्या मोरीच्या तोंडास असे लावले की त्यातून सर्व घाण बाहेर पडेल.
अशा पद्धतीने “अखंड भारत” ही संकल्पना काळाच्या पडद्याआड झाली आणि या हिंदुस्थानातून हिंदूंचे राज्य संपले आणि मुस्लिम राज्य आले. सुलतानांच्या आपापसातील लढाया आणि भांडणे यात पूर्ण दख्खन होरपळला जात होता, रयत पोरकी झाली होती.सुलतानांचा छळ, निसर्गाचा कोप यामुळे रयत पूर्णपणे होरपळून गेली.
कुणीही येवून लुटत असे, बायकांना पळवून नेले जाई, त्यांच्यावर अत्याचार केले जात, घरे जाळली जात यामध्ये रयत मात्र हे सगळ मुकाट्याने पाहत होती, कारण कोणी वालीच उरला नव्हता, दुसरा कोणताही पर्याय त्यांच्याकडे नव्हता. आणि एक मोठी काळरात्र या हिंदुस्थानावर पसरली.
आपणच आपल्या राज्यात गुलाम होवून बसलो आहोत याचा सर्वांना विसर पडला होता. राष्ट्रहितापेक्ष्या स्वहित महत्वाचे वाटू लागले होते आणि “अखंड भारत” हे जे स्वप्न चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांनी पाहिले होते आणि त्याची पूर्तता केली होती ते स्वप्न पुन्हा एकदा मातीत मिळाले होते.
शिवजन्म, “अखंड भारत” या स्वप्नाचा पुनर्जन्म !!!
दिवसांमागून दिवस गेले, शतकांमागून शकते गेली तरीही काळरात्र काही संपत नव्हती. १६व्या शतकात भोसले आणि जाधव यांच्या डोळ्यांनी एक स्वतंत्र राज्याचे स्वप्न पाहिले होते. यांची ताकत एवढी होती की सुलतानसुद्धा यांची विशेष दखल घेत असत. मुघल दरबारात सुद्धा या मराठ्यांच्या पराक्रमाचे गोडवे गेले जात असत, पण हरएक सुलतान यांच्यावर वचक ठेवून असे, यांच्यावर वरचेवर कारस्थाने रचली जात. याच दरम्यान लखुजीराजांचा घात झाला आणि आणि ३-३ तरण्या मुलांसोबत त्यांचा भर दरबारात खून झाला.
आजूबाजूला चाललेली यवनांची चाकरी, वडील, भाऊ यांचा खून, रक्तातल्या नात्यातली एवढी मानस एकदमच नजरेआड झाली या दुखःने जिजाऊ बाईसाहेब यांच्या पायाखालची मातीच सरकली. हे दुख केवळ आपले नाही तर मराठी मुलखात ज्या-ज्या घरात असे प्रसंग घडलेत तेवढ्या सगळ्यांचे हे दुख आहे, पोटचं पोर अकाली जान याच दुख बापापेक्ष्या कूस उजवणाऱ्या आईला जास्त असते, ह्या मुलखातला एक करता पुरुष हा या यवनांच्या कामी आलाय, परक्यांसाठी मरण हाच आमचा धर्म बनलाय. हा जिजाऊ साहेबांचा आक्रोश कदाचित त्यावेळी झाला असावा.
अशा या परिस्थिती जिजाऊमासाहेब पोटाशी होत्या, आजूबाजूची हि राजकीय परिस्थिती, आपल्या स्वामींचे (शहाजी राजांचे) स्वतंत्र राज्याचे स्वप्न, गुलामी, विस्खळीत समाज यामुळे त्यांची मानसिक स्थिती काय असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही, शहाजी महाराज म्हणजे एक असे व्याक्तीम्ह्त्व की त्यांच्या कर्तुत्वाचा डंका अखंड हिंदुस्थानात वाजत होता, तरीही त्यांचे स्वतंत्र राज्याचे स्वप्न पूर्ण होत नव्हते, परंतु त्याचा पाया नक्कीच त्यांनी भरला होता, अशा परिस्थिती जे काही गर्भ संस्कार जिजाऊमासाहेबांनी केले तीच खरी शिकवण ही स्वराज्य उभारण्याची होती.
अशा या राजकीय आणि लाचारीच्या दिवसात १९ फेब्रुवारी १६३० साली, शिवनेरीवर एक युगपुरुष जन्माला आला. हा दिवस या हिंदुस्तानातील सुवर्ण दिवस होता, १८०० वर्ष्याची काळ रात्र संपवण्यासाठी हा युगपुरुष जन्माला आला. आईच्या गर्भातूनच हा युगपुरुष धडे घेवून आला होता.
या अंधारलेल्या आणि विस्कळीत हिंदू समाजामध्ये, ज्याला कोणी वालीच शिल्लक नव्हता, पूर्णता कोलमडलेली संस्कृती आणि हिंदू हा शब्द तरी कुणाला नंतर लक्ष्यात राहील की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली. आपापसात भांडत बसलेली ही जमात, बादशहाची कृपा व्हावी यासाठी आपल्याच लोकांना कापणारी आणि आपल्याच आई-बहिणींची अब्रू लुटणारी ही लोकं, स्वाभिमान आणि निष्ठा या दोन गोष्ठी वेशीला टांगलेली आपली लोकं. परक्यांसाठीच आपण मारायचे आणि आपल्याच लोकांना मारायचे हाच धर्म झाला होता.
आपला समाज विखुरला आहे, आपली ताकत विभागली आहे त्यामुळे स्वहितासाठी लोक आपापसात भांडत आहेत त्यांना एकत्रित करून परकीय आक्रमणापुढे खांद्याला-खांदा लावून उभे केला पाहिजे आणि आपल्या मात्रभूमीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले पाहिजे ही “राष्ट्रीयत्वाची भावना” लोकांमध्ये जागृत करणारा “सम्राट चंद्रगुप्त” यांच्या नंतर एकमात्र व्यक्ती म्हणजे “शिवाजी महाराज”.
महाराजांचा जन्म हा केवळ १७ व्या शतकातील जुलमी सत्तेची मूळ उखडून टाकण्यासाठी नव्हता तर अखंड भारत भूमीच्या संस्काराची आणि राष्ट्रीयत्वाच्या रक्षणाच्या दृष्टीनेही महत्वाचा होता. ही भूमी आपलीच आहे आणि इथे आपलेच राज्य पाहिजे ही संकल्पना १८०० वर्षे कुठेतरी अंधारात गेली होती ती पुन्हा उजेडात आणली ती शिवाजी महाराजांनी.
अशा या परिस्थिती एक “शिवाजी” जन्माला येतो आणि या समाजाला कुठच्या-कुठ घेवून जातो. आधुनिकता काय आहे हे या समाजाला शिकवतो. जिवंत मृतांमध्ये एक जीव ओतला हो या माणसाने, जवळ-जवळ १८०० वर्ष्यानंतर पुन्हा या भयभीत आणि गुलामीने त्रस्त झालेल्या समाजाला “अखंड भारत” या संकल्पनेचे स्वप्न दाखवले. गोर-गरीब आणि शेतकरी वर्गाला हाताला धरून या माणसाने एक स्वतंत्र राज्य स्थापन केले. परकीयांची सावली आपल्या प्रखर तेजस्वी पराक्रमाने निस्तनाबूत करून टाकली.
मुस्लिम बादशाहाची भावल बनलेले हे पराक्रमी मराठे आता आपल्या राजाच्या पायाची पावलं बनली आणि ही पावल जिथ पडली तिथली जमीन स्वतंत्र झाली.
परकीय आक्रमण थांबवण्यासाठी “अखंड भारत” हाच एकमात्र पर्याय आहे याची जाणीव शिवाजी महाराजांनी या समाजाला करून दिली. आणि हीच जाणीव पुन्हा जिवंत करायची गरज आहे. म्हणुन आज मला रियासतकारांनी महाराजांच्या व्यक्तिमहत्वाचे मांडलेले शब्दचरित्र आठवते, ते म्हणतात,
“ज्या पुरुषास कधी कोणतेही दुर्व्यसन शिवले नाही, ज्याने परस्त्रीस मातेसमान मानले, ज्याने स्वधर्माप्रमाणे परधर्मास आदर दाखवला, ज्याने युद्धामध्ये पाड़ाव केलेल्या शत्रूच्या लोकांस त्यांच्या जखमा बऱ्या करुण स्वगृही पोचवले, ज्याने फौज, किल्ले, आरमार इत्यादी योजनांनी स्वदेशरक्षणाची योग्य तजवीज करुण ठेवली, ज्याने सर्वात आधी स्वता संकटात उडी मारून आपल्या लोकांना स्वदेशाची सेवा करण्यास शिकवले, ज्याने अनेक जीवावरच्या प्रसंगी केवळ बुद्धिसमर्थ्याने स्वतःचा बचाव केला, ज्याने औरंगजेबासारख्या प्रतापी बादशाहाचे भगीरथ प्रयत्न सतत ३० वर्षे पावेतो यत्किंचित चालु दिले नाहीत, इतकेच नव्हे, तर तीन राज्यांच्या पाड़ाव करुण अखिल भारतखंडात अपूर्व असे स्वतंत्र राज्य स्थापन करुण, त्याची किर्ती पृथ्वीवर अजरामर करुण ठेवली; त्या प्रतापी व् पुण्यशील पुरुषाची योग्यता पूर्णपणे वर्णन करण्यास कोण समर्थ आहे ! …..
….. कोणास कधी जागीरी अगर जमीनी तोडून न देणारा, न्यायाचे कामांत कोणाची भीड़मुर्वद न धरणारा, दुष्टांचा काळ पण गरीबांचा कनवाळू, एकंदर रयतेस पोटच्या मुलांप्रमाने वागवणारा, सदैव सावध व् उद्योगी, नेहमी मातेच्या अर्ध्या वचनात राहून अहर्निश राष्ट्राची चिंता वाहणारा, स्वदेश, स्वभाषा व् स्वधर्म या विविध संपत्तीचे संगोपन करणारा, पापभीरु परंतु रणशुर, असा हां आधुनिक काळाचा अद्वितीय राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी, प्राचीन पुण्यश्लोकांचे पंकतीत बसण्यास सर्वथैव प्राप्त आहे.“
१८०० वर्ष्यांची भारत भूमीवरची काळरात्र संपून स्वातंत्र्याचा सूर्य उगवला तो १९ फेब्रुवारी १६३० साली. आजच्या देशापुढील प्रत्येक समस्येचे एकच उत्तर आहे, आणि ते उत्तर म्हणजे “शिवाजी महाराज”.
♣ २० फेब्रुवारी १७०७ ♣
२० फेब्रुवारी १७०७, हा दिवस तसा पहायला गेले की महत्वाचाही आणि दुर्दैवाचाही, कारण सम्राट अशोका नंतर अफाट साम्राज्याचा सम्राट जर कोणी या भूमीत झाला असेल तर तो “बादशाहा औरंगजेब”, ज्याचा हा मृत्यू दिवस.
दिवस महत्वाचा यासाठी, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहूमहाराजांच्या शासन व्यवस्थेत मराठा साम्राज्याचा (राज्याचे साम्राज्यात रुपांतर) खरा उदय सुरु होतो, शिवरायांचे अखंड भारताचे जे स्वप्न होते त्याच्या पूर्णत्वाची सुरवात इथून सुरु होते.
दिवस दुर्दैवाचा यासाठी, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या सरदारांनी एका मोठ्या साम्राज्याचे केलेले तुकडे आणि याचाच फायदा घेत इंग्रजांनी ब्रिटीश सत्तेच्या पायाभरणीची केलेली सुरवात, जी शाहूमहाराजांच्या मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने मजबूत होत गेली. (Divide & Rule policy of British)
आजवर आपण औरंगजेब म्हणल की आपल्याला काही ठराविक गोष्टीच आठवतात, जशा “क्रूर औरंगजेब”, “धर्मांद औरंगजेब”, “हिंदुंचा शत्रू औरंगजेब” वगैरे वगैरे.
पण याच बरोबर औरंगजेब हा अतिशय महत्वकांक्षी आणि मुत्त्सदी राजकारणी होता आणि त्याचबरोबर अतिशय चिकाटी असणारा आणि दृढनिश्चयी बादशाहा होता, याचे उदाहरण म्हणजे औरंगजेब हा हिंदुस्थानातल्या अखंड इतिहासातील एकमेव राजा होता ज्याची राजा म्हणून ६० वर्षांची कारकीर्द आहे. (इ.स. १६५८ ते १७०७) जो आपल्या देश्याच्या इतिहासातील अतिशय महत्वाचा कालखंड समजला जातो. त्याने प्रस्तापित केलेले साम्राज्य हे ब्रिटीश सत्तेच्या उद्यापर्यंत कधीही अस्तित्वात न आलेले एक विशाल आणि एकसंघ साम्राज्य प्रस्तापित केले.
६० वर्षांच्या दीर्घ आणि कष्टप्रद राजवटीचा शेवट प्रचंड अपयशात घडून आला असला तरी हा बादशाहा बुद्धिमत्ता, चरित्र आणि दुर्घोद्योग ह्या गुणांत आशियातील सर्वश्रेठ सम्राट होता याची दखल आपण घेतलीच पाहिजे. एकंदरीत त्याच्या राजकीय बुद्धिमत्ता, शक्ती आणि धैर्य याच्या जोरावर संपूर्ण हिंदुस्थान त्याच्या हुकुमातीखाली आला आणि त्याच्या खंबीर व जागरुत धोरणांमुळे मुघल साम्राज्य बळकट व समृद्ध होत गेले. पूर्ण आशियामध्ये असा एकही योद्धा किंवा राजा नव्हता जो बादशाहा औरंगजेबला आव्हान देईल. काही उपवाद सोडता त्याकाळचे पराक्रमी समजले जाणारे राजपूतराजेही औरंगजेबाला शरण गेले, पराक्रमाचे प्रतिक समजले जाणारे राजपूत ज्यांचा इतिहास हा मुघलांपेक्ष्या गौरवशाली व जुना आहे असे राजपूत सुद्धा अशा या सम्राटाला शरण आले यावरून औरंगजेबाची बुद्धिमत्ता, शक्ती आणि धैर्य दिसून येते.
पूर्ण ६० वर्षांमध्ये स्वताच्या व्यक्तिमह्त्वाचा दरारा ज्याने पूर्ण हिंदुस्थानावर ठेवला, एकाही मात्तबर सरदाराला मनमानी करू दिली नाही आणि कोणत्याही सरदाराने बंड करण्याचे धाडसही केले नाही.
अशा या बादशाहाला त्याच्या शेवटच्या काळात अशी कोणती गोष्ट मनाला हुरहूर लावून गेली ?
आणि त्याचे कारण कोण आणि काय होते ?
या प्रश्नाचे उत्तर म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० म्हणजे एका युगपुरुषाचा जन्म.
ज्या औरंगजेब बादशाहाला पूर्ण आशिया खंडामध्ये कोणीही आव्हान दिले नाही ते शिवाजी महाराजांनी केले. मराठ्यांची वाढलेली ताकत पाहून खुद्द दिल्लीपती औरंगजेब बादशाहाला दिल्ली सोडून दख्खन मध्ये यावे लागले दुर्दैवाने महाराजांचा मृत्यू झाला आणि त्याची गाठ पडली ती शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांशी.
२७ वर्षे हा दिल्लीपती सम्राट स्वताचे तख्त आणि महाल सोडून दख्खन मध्ये छावणीत राहिला आणि अखेरच्या श्वासापर्यंत त्याने मराठ्यांशी झुंज दिली. कितीतरी वेळा त्याने शिवाजी महाराजांचे दाखले त्याच्या सरदारांना आणि स्वताच्या मुलाला दिले. स्वताच्या मृत्यूपत्रात सुद्धा तो म्हणतो की,
“माझ्या आयुष्यातली एक चूक जी मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाचे कारण ठरले ती चूक म्हणजे शिवाजी माझ्या कैदेतून सुटला”.
या वाक्यातूनच त्याने स्वताची हार मान्य केलेली दिसून येते. दक्षिणेतील मोहीमेत अपेक्षेच्या उलट मराठ्यांनी कडवी झुंज दिल्याने एवढ्या प्रदीर्घ आणि खर्चिक मोहिमेतून त्याला काहीच साधता आले नाही. ही एक फार मोठी खंत हा एक बलाढ्य सम्राट मनामध्ये ठेवून गेला. औरंगजेबाची राजनीती आणि डावपेच कधीही कोणाला कळले नाही अपवाद होते ते फ़क़्त शिवाजी महाराज.
१७व्या शतकात,
“शिवाजी” हे व्याक्तीम्ह्तव काय आहे हे ओळखलेला माणूस म्हणजे “औरंगजेब” आणि
“औरंगजेब” हे व्याक्तीम्ह्तव काय आहे हे ओळखलेला माणूस म्हणजे “शिवाजी”.
अशा या पराक्रमी आणि कपटी बादशाहाला आव्हान देवून, दिल्ली सोडून दक्षिणेत येण्यास भाग पाडणारा हा शिवाजीराजा.
आणि
“दुश्मन हो तो सिवा जैसा” असे म्हणणारा १७व्या शतकातील बलाढ्य सम्राट “औरंगजेब बादशाहा” ज्याचा मृत्यू दिवस म्हणजे २० फेब्रुवारी. अशा या बलाढ्य परकीय आक्रमणाचा नाश करण्यासाठी १९ फेब्रुवारी हा दिवस महत्वाचा आणि एका गुलामीचे पर्व संपून दुसऱ्या गुलामीची एक संथ सुरवात झाली तो दिवस म्हणजे २० फेब्रुवारी.
Ly veglya prkare itihasachi nandani keli … tornyavrch bhashan pn manat ghar krun gel… ek num
Nice article. Impressive intensive study by writer.
apratim lekh !
history subject bore ahe ase vatnaryanni jarur vachava.
Great.
nice and good informative article
इतिहास पुन्हा जागा होतोय …….मुजुरा!!
_/\_
“सत्य असत्याचा मन केलियले ग्वाही , मानयिले नाही बहुमता ”
•सत्य मग ते शत्रु संबंधी का असेना .
•नेमकेपणा