|| जिंजी – भाग १ ||
————————
सर्वप्रथम मान्यवरांची ओळख करून देतो,
१) रवि पवार उर्फ बोम्बल्या फकीर (सह्याद्रीचा हेर)
२) विशाल सावंत (विंग्रजी भाषेचे जगतगुरू)
३) विशाल नाईकवडी (सर एलियन)
४) राहुल कराळे (सिरीयस म्याटर)
५) कुलदीप पाटील (इंद्रावत)
६) रवींद्र वाघमारे (“प्रोफेशनल, ट्रेकर”)
——————————————————————————————————–
जिंजी, मराठेशाहीची तिसरी राजधानी, दुर्गमहर्षी प्रमोंड मांडे सर यांच्याकडून जिंजीचे वर्णन ऐकत होतो, माझ आणि बोम्बल्याच जवळ-जवळ एक ते दीड वर्ष जायचं जायचं असे चालले होते पण योग काही जुळून येत नव्हता, मी सारखं बोम्बल्याला विचारायचो … काय भाऊ, जिंजीच काय नियोजन होतंय का नाही …. १०० अडचणी, कोण कोण येणार … सर्वांना एकावेळी सुट्टी मिळेल का ?… जायचं कस .. गाडी कोणती …. भटकंती आणि फोटोग्राफी हे शौक श्रीमंतांचे पण लागतात गरिबांनाच म्हणून खर्च किती येणार? हा सर्वांचा प्रश्न होता …. ६-७ दिवसात काय काय बघायचं आणि कस नियोजन करायचं … अशा अनेक गोष्ठी पुढे आल्या की कुठ ना कुठ घोळ हा होताच होता …
एलियनने एकदा फेसबुकवर ग्रुप चाट सुरु केले आणि त्यामध्ये मी, बोम्बल्या, सावंत असे ४ जन होतो, नाईकवडीला काय काम नसल की असे ग्रुप बनवून लोकांना त्रास देणे खूप आवडते …. असेच बोलणे सुरु असताना नाईकवडीने विचारले जिंजीला जायचे ना? आणि पुन्हा जिंजीचा मुद्दा जागा झाला आणि मग १८ ते २३ हि तारीख ठरवली आणि प्रत्येकाने सुट्ट्या टाकल्या “खाजगी ट्रेकिंग संस्थेच्या” मुख्य सभासदांना विचारण्यात आले आणि सगळेच तयार झाले त्यामध्ये अभिजित पासलकर, साई, रोहन भोसले याना सुट्टी न मिळाल्याने त्यांना जमले नाही …. मी माझ्या मित्राला सांगितले की तुझी झायलो पाहिजे बाबा आम्ही चाललोय जिंजीला …. त्याने पण लगेच “घेवून जा” असे सांगितले आणि एक ते दीड वर्षाच्या स्वप्नाला एक वात मिळाली …. सावंतचे मध्येच नाटक सुरु झाले …. भाऊ, पप्पांना तुम्ही जरा फोन करून बोला म्हणजे मला पाठवतील …. तेही झाल आणि सावंत तयार झाला ….
बुधवारचा दिवस, १७ तारीख संध्याकाळी ४ वाजता सगळ्यांनी कात्रजला वैभव पवारच्या घरी जमायचे ठरले, ठरल्याप्रमाणे बोम्बल्या, RK आणि नाईकवडी वैभवच्या घरी आले मी आणि सावंत भोसरीतून निघालो आणि वाटेत नांदेड सिटी मधून कुलदीप आणि रवीला गाडीत टाकले आणि कात्रज गाठले … आम्हाला निरोप देण्यासाठी भूषणदादा, अभिजित दरेकर भाऊ आले होते … भूषणदादांनी गाडीसाठी हार आणला होता, गाडीला हार घालून नारळ फोडून प्रवासाची सुरवात झाली …. आणि सगळ्यांना वेध लागले होते ते जिंजीचे …….
सातारा ओलांडायचा आणि अजयदादा जाधवरावांना मुजरा न करता जायचं असे होईल का ? साताऱ्यामध्ये थांबून दादांबरोबर चहा नाष्टा केला, अनिकेत वाघ पण तिथे आला होता जो आम्हाला पुन्हा जिंजीमध्ये भेटणार होता, खास शिवजयंतीसाठी हा पठ्या दुबईमधून आला होता आणि आमच्याबरोबर जिंजीलाही येणार होता …. चहा-पान घेवून आम्ही रस्ता धरला …. रात्रीचे १-२ वाजायच्या आत जास्तीतजास्त अंतर कापायचे असे ठरवले होते, गाडी मी स्वता चालवत होतो … माझी आवडती गाडी होती आणि रस्ता पण एकदम भारी आणि सर्व दिलदार मंडळी बरोबर होते त्यामुळे प्रवासाचा आनंद वेगळाच होता …
सावंत आणि नाईकवडी एकत्र असले की काय गंमत असते हे तुम्ही समजू शकाल … १० मिनिट यांच तोंड बंद होत नव्हत …. यांना फ़क़्त दोनच गोष्टीच नाद “खाणं” आणि “धुड्कुस घालण”. …. वेगवेगळे विषय … वेगवेगळ्या गोष्ठी !!!
रात्रीचा प्रवास होता, पुणे-बंगलोर महामार्ग …. सकाळी ६ वाजता बंगलोर गाठायचे असे नियोजन होते … २-३ दिवस पुरेल एवढे जेवण घेतले होते … महामार्गावरूनच कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दंडवत घालून प्रवास चालू ठेवला. RK आणि रवि वाघमारे अधून मधून डुलक्या घेत होते. नेहमीप्रमाणे मी आणि बोम्बल्या जागे होतो. नाईकवाडी आणि सावंत अधून मधून काहीतरी फालतू जोक्स करत होते.
९च्या सुमारास कर्नाटकात प्रेवेश केला थोड्या अंतरावर जावून सावंत आणि नाईकवाडी यांनी भूक लागल्याची बोंबाबोंब सुरु केली. रस्त्याच्या बाजूलाच एक छोटेशे हॉटेल होते तेथे दोन डाळ तडका घेतले, चपात्या आमच्याकडे होत्या. एक नंबर डाळ होती. सर्वांनी थोडेफार खावून घेतले आणि पुन्हा प्रवास सुरु झाला. सकाळ झाली बंगलोर आले, NICE रिंग रोडने आम्ही इलेक्ट्रोनिक सिटी गाठली सकाळचा वेळ होता म्हणून वाहतूक काय जास्त नव्हती. आता फ़क़्त ९० किलोमीटरचा प्रवास राहिला होता मग आम्ही वेल्लूरला पोहचणार होतो.
सकाळचा कार्यक्रम आटोपण्यासाठी कुठेतरी थांबायचे होतो. एखादा पेट्रोलपंप बघत होतो जिथे सर्व सुविधा मिळतील, थोड्याच अंतरावर होसूर गाव आले तिथे एका पेट्रोलपंपावर थांबलो. गाडी जशी थांबली तशी सावंत हवेच्या वेगाने शौचालयात घुसला यावरून त्याच्या सहनशक्तीचा अंदाज येत होता.
तासाभरात आम्ही सगळे हलके-फुलके होवून वेल्लूरकडे रवाना झालो. वाटेत अनेक किल्ले दिसत होते काही किल्ल्याना येताना जायचे असे आम्ही ठरवले. जसे पोट रिकामे झाले तसे नायकवडीला भूक लागली. वाटेत कुठेतरी टपरी शोधत होतो, कृष्णगिरीच्या अलीकडे ४ किलोमीटर वर डाव्या बाजूला एक छोटीशी टपरी होती जिथे गरम-गरम इडल्या बनत होत्या. उजव्या हाताला कोसूमलाईचा एक मोठा रॉक होता, डावीकडे रोड जातो तो कृष्णगिरी कलेक्टर ऑफिसला जातो. तिथे आम्ही थांबलो.
दोन मावश्या होत्या, ज्यांना हिंदी अजिबात येत नव्हते “इडली” हा शब्द फ़क़्त आम्हाला समजत होता.गरम-गरम इडल्या मावशींनी दिल्या आमचे “प्रोफेशनल, ट्रेकर” रवि वाघमारे यांनी चमचा मागितला पण तिकडे तसले काही मिळत नाही भात-आमटी जसे आपण कालवून खातो तसे इडली-सांबर खायचे हाच नियम. सगळ्यांनी दाबून इडल्या खाल्ल्या. नाईकवाडीने एका म्हाताऱ्याला बसवून ठेवले होते आणि त्याचा पोर्टफ़ोलिओ बनवत होता, म्हातार पण एकदम भारी पोज देवून बसले होते.
सकाळी ११च्या सुमारास आम्ही वेल्लोर मध्ये पोचलो, भाऊ मराठा तिथे आम्हाला येवून भेटणार होते त्यांच्याशी फोन झाला आणि १५ मिनिटात ते पोचणार होते. आम्ही वेल्लोरच्या भुईकोट किल्याच्या दरवाज्याजवळ थांबलो आणि थोड्याच वेळात भाऊ तिथे आले. भाऊ आणि माझी पहिलीच भेट होती आजवर मुख्पुस्तिकेवर आम्ही मित्र होतो, प्रत्यक्षात ही आमची पहिलीच भेट होती. सर्वांनी भाऊंची भेट घेतली आणि गाडी गेटमधून आत घेवून एका झाडाखाली गाडी लावली आणि किल्ला पाहण्यास सुरवात केली.
वेल्लोर …. याभागाशी आणि इथल्या ३ किल्ल्यांशी एक वेगळीच जवळीकता आपल्या मराठी माणसांची आहे आणि उत्सुकता ही तेवढीच, त्याचे कारण म्हणजे “महाराजांचा दक्षिण दिग्विजय” या दरम्यान हे किल्ले मराठा साम्राज्यात आले. २५ मे १६७७ रोजी राजेंनी वेल्लोर किल्ला वेढला. किल्ला अब्दुलखान हबशीच्या ताब्यात होता. त्याला देखील राजांनी तह करून किल्ला देण्याची मागणी केली. परंतू त्या हबशाने ती धुडकावून लावली. तो कोट होता देखील तसाच कडक बेलाख.
सभासदाने किल्ल्याचे केलेले वर्णन:
येळूरकोट यामध्ये इदलशाई ठाणें होते. तो कोट म्हणजे पृथ्वीवर दुसरा गड असा नाही. कोटांत जीत पाणियाचा खंदक. पाणीयास अंत नाही असें. उदकांत दाहा हजार सुसरी. कोटाचे फांजीयावरून दोन गाडिया जोडून जावें ऐशी मजबुती. पडकोट तरि चार चार फेरीयावरी फेरे. ये जातीचे कोट.
वास्तविक वेढे देणे हे काम मराठ्यांना कधी माहितच नव्हते. कारण वाघाचा फक्त एकच खाक्या झटपट झटापट मार झडप की कर गडप ४ महिने, ६ महिने वर्षे दीड वर्षे खेळत बसणे ही मराठ्यांची युद्धनीती देखील नव्हती पण स्वराज्यापासून लांब त्यात तोफखान्याची मदत न मिळाल्याने वेढा देणे भाग पडले.
तटबंदीवरून फिरत असताना कुठेतरी दिवळीत एखाद जोडप प्रेम व्यक्त करत बसलेल असायचं. असल्या कडक उनात काय जोश होता काय माहित. कोण गळ्यात-गळा घालून गुलु-गुलु बोलत बसलेल असायचं, कोण चुंबनाद्वारे प्रेम व्यक्त करत बसलेल असायच … आणि बरेच काही.
आता काय म्हणल काय कराव … त्यासनी सांगाव म्हणल तर भाषा कळत नाही आणि कितीजनांना सांगणार हा एक प्रश्न होताच … भाऊ म्हणाले चला पाटील हे इथे असाच असतय.. द्या सोडून … जरा पुढे गेलो तर एक बहाद्दर एका दगडान तटबंदीवर नाव कोरत बसला होता, मी भाऊंना म्हणल, विचारा याला हे बेन काय करतय… तर त्यान उत्तर दिल …
“सगळे लोक आपापल्या लवरच नाव कोरून गेल्यात, मी पण कोरतोय” ….
च्याआयला येड्या भो** …. मी त्याला मराठीत भेडसावत होतो आणि ते त्याच्या भाषेत, भाऊ आपल मधून मधून त्याच्या भाषेत बोलत होते….. मी भाऊंना म्हणल या चू ला आपल्या बरोबर घेवून चला ….
यावर बोम्बल्या काका मला म्हणतात … पाटील तुम्ही मराठी माणसाबरोबर हिंदीत बोलताय आणि बाहेरच्या माणसांबरोबर मराठीत … ह्यला काय म्हणायचं …. म्हणल हे प्रेम आहे प्रेम बोम्बल्या तुम नाही समजोगे …. पुढे जावून पोलिस भेटले त्यांनी मला विचारल … “मिल्ट्री म्याना” म्हणल …. “इल्ले”.
भुईकोट पाहून झाला होता, आता सर्वाना भूक लागली होती. गाडीजवळ सगळे जमा झालो प्रत्येकाने २-२ आईस्क्रीम खाल्ली आणि मग आणलेले जेवण उघडले … जेवत असताना साजरा-गोजरा बद्दल माहिती भाऊ देत होते आणि पुढचे नियोजन चालू होते. सर्वकाही नियोजन भाऊंचे होते आम्ही फ़क़्त ते म्हणतील तिकडे जायचं … जेवण संपले आणि आम्ही पुढे साजरा-गोजराकडे निघालो …
क्रमश:
खूपच छान वर्णन,दादा ! पुढच्या पोस्टसाठी वाट पाहतोय जी…
जय जिजाऊ ! जय शिवराय !! जय शंभूराजे !!!
खूपच छान,दादा ! अप्रतिम ! पुढच्या पोस्टची वाट पाहतोय जी !
जय जिजाऊ ! जय शिवराय !! जय शंभूराजे !!!
Jinjila aalya sarkhe vatey…..
हाहाहा, ट्रेक पूर्ण झाला ८-१० दिवस उलटून गेलेत तरी पण पाटील तुम्ही एखाद्याचा बाजार उठवण्याचे काम इमाने इतबार करत राहावा…
बाकी फोटो झक्कास काढलेत…. ☺
patil jabardast bhatkanti o
ani likhan pan…!
Ek number !
Waiting for further episodes…..