DSC_0100

जिंजी – भाग २

जिंजी – भाग २.
——————–

गृहीत धरतो की भाग १ वाचला असेल, नसला तर वाचा राव ….

भाग १ वाचण्यासाठी, http://www.lavatepatil.com/?p=508

रात्रभर प्रवास करून वेल्लोर गाठलं होत, सावंतने गाडी चालवली म्हणून मध्ये तासाभराची झोप झाली होती. बाकीचे अधून मधून डुलक्या मारत होते. वेल्लोरला पोहचताच भुईकोट पाहिला आणि पुढे दोन डोंगरी किल्ले दिसत होते, खर बघायचं झाल तर लय घाण झोप येत होती, डोक पण दुखत होत, झोप नसल्यामुळे आणि रात्रभर वाहनांच्या लाईटमुले डोळपण जाम दुकट होत पण नियोजनाप्रमाणे साजरा-गोजरा हे दोन भाऊ-भाऊ त्याच दिवसी करायचे होते. यावर जालीम उपाय काढला तो आमच्या “Professional, Trekker” यांनी म्हणजे रवी वाघमारे यांनी, डोळ्यावर काळा गोगल होता आणि आम्ही जरा कुठे बसलो की हे महाशय हळूच बसल्या-बसल्या डुलकी मारायचे. मग समजले हा माणूस अंधारात सुद्धा काळा गोगल का काढत नाही.

भुईकोट पाहून झाला, जेवण करून आम्ही साजऱ्याच्या दिशेने गाडी वळवली. गल्ली-बोळातून भाऊ मराठा यांनी पायथ्यापर्यंत गाडीला वाट दाखवली. छोटी-छोटी घरे, लहान-लहान गल्ल्या, खतरनाक चेहरे असे वाटते जसे कुठल्या तरी सिनेमाचे शुटींग सुरु आहे आणि आम्ही व्हिलन आहे आणि आमची धुलाई होणार आहे. गाडी लावत असताना आजूबाजूला काही लोकं तमिळ भाषेत बोलत होती आणि त्याच वेळी मी भाऊला विचारत होतो की, दादा इथे गाडी राहील का ? आजूबाजूला पाहून मला नाही वाटत गाडीची चाक राहतील आपण येवूपर्यंत…. भाऊ लागला हसायला …. त्यात सावंत म्हणतो,

भाऊ, ते बाजूला लोकं बोलत आहेत आपल्याला काही कळत नाही .. पण “आत्ता काही लोकं आलेत गाडी लावून किल्ल्यावर जात आहेत या सगळे गाडी आहे आपल काम होतय” असे तर म्हणत नसतील ना…..

सावंत ला म्हणल तुझ्या तोंडात ** पडो माकडा …. चला म्हणल …. “राम भरोसे” गाडी लावली आणि तिथून निघालो…. नियोजन होते प्रथम गोजरा बघायचा आणि नंतर साजरा आणि तसेच चाललो होतो … थोडे पुढे घेल्यावर भाऊ म्हणले आपण वाट चुकलोय, आता पहिला साजरा करायचा …. म्हणल चला कुठलाबी करा …. लागली तर जाम हाय … खडा चढ … डोक्यावर उन … त्यात डोक दुकट होत … किल्ला चढताना फोटोपण काढायचे असतात … नंतर कवा यीन माहित नाही … जमतील तेवढे फोटो घेण महत्वाच … त्यात टाइमल्याप्स पण होत … त्रेक्रिंग करत कामबी लय होती …. त्यात नाईकवाडी-सावंत ही जोड… विचार करा कस आसल चित्र ….

DSC_0100

या भागातले किल्ले म्हणजे दगडच-दगड, चालताना नुसता मोठ-मोठ्या दगडांवरून चालायचं … खालनबी गरम आणि वरणबी गरम … शिजून शिजून मरतंय … नुसती काडी अंगावर जरी वढली तरी पेटल आस गरम होतंय. कस-बस आपल आम्ही चढत होतो, किल्ला चढत असताना साजऱ्याचे रूप लयच भारी दिसत होत … विशल्याला म्हणल भावा इथ एक टाइमल्याप्स होणा मंगता हे …. पण २० मिनिट बसायचं कुठ ही अडचण होती, कुठही एक यितबर भी सावली नव्हती …. मोबाईल उन्हान जळू नये म्हणजे झालं असे वाटत होते … लावला ट्रायपॉड …. रुमाल वगैरे मोबाईलवर ठेवले होते जेणेकरून जास्त तापू नये … बोम्बल्या आणि बाकीचे पुढे गेले आणि थोड्या वेळात वरती पोचले सुद्धा आणि वरून आम्हाला शिव्या देत होते … चला-चला म्हणून …. आओ म्हणल झाल ५ मिनिट …. बोम्बल्या जाम वैतागला होता म्हणल चला नायतर पवार इसकटायच …. आम्ही बी मग पटापटा वरती गेलो ….

किल्ल्यावरून दिसणारा वेल्लोर शहराचा देखावा

DSC_0104

वरती पोहचलो आणि बघतोय काय तर सर्कस चालू होती, उलट दिशेने आल्यामुळे तटबंदीवर चढून जायचे होते … आयला म्हणल हे हाय का इथ …. दुष्काळात १३वा दुसर काय …. उनात नुसत चालायला जीव जात होता आणि आता तटबंदीवरून चढून वर जायचं …. खालच्या फोटोत बघू शकता आमची तटबंदीवरची कसरत

DSC_0114

असे काही असले की, मी आणि बोम्बल्या सर्वात शेवटी असतो, सगळ्याना वरती पाठवून मग आम्ही दोघे वरती गेलो. तटबंदीवरील दगडांच्या खाचेला धरून वरती जायचे होते. कोणताही दुसरा पर्याय नव्हता गपगुमान सगळे वरती गेले.

नेहमीप्रमाणे “Professional, Trekker” काळ्या गोगलच्या आडूशाला झोपले होते आम्ही आपल फोटो काढत होतो. अतिशय सुंदर किल्ला आहे, बांधकाम अजूनही चांगल्या स्थितीत आहे. मजबूत तटबंदी आणि बुरुज आहेत. किल्ल्यावरून भुईकोट आणि पूर्ण शहर अगदी एका नजरेत बसते.

DSC_0115

DSC_0116

वरील फोटोमध्ये पाहू शकता उजव्या बाजूला एक झाड आहे तिथून दरवाज्यातून खाली जाता येते. एका चोरदरवाज्यातून गडावरून खाली उतरता येते. दरवाज्यातून खाली जाताना दगडावरून सांभाळूनच जावे लागते कारण रितसर पायऱ्या नाहीत, खालील फोटोत पाहू शकता पवार साहेब अगदी हळू-हळू खाली उतरत आहेत.

DSC_0129

इथून खाली आल्यावर डाव्या बाजूला एक अतिशय सुंदर विहीर आहे, अगदी कोरीव विहीर आहे खाली जायला पायऱ्या आहेत, म्हणजे एक छोटासा दरवाजा आहे जिथून खाली पायऱ्या जातात त्या सरळ विहिरीमध्ये जातात. आजपर्यंत पाहिलेल्या विहिरींपैकी एक अतिशय सुंदर अशी विहीर.

DSC_0134

चोर दरवाज्यातून खाली उतरायचे आहे आणि खिंडीतून गोजऱ्याकडे जाता येते इथून गोजऱ्याकडे जायला अंदाजे १ तास लागतो. रस्ता चकवा देणारा आहे. आमचे काही सहकारी चुकून दुसऱ्या मार्गाने गेले नंतर कसतर आम्हाला येवून मिळाले. दरवाज्यातून बाहेर पडताच गडाचे स्वरूप समजते प्रचंड उंच असे बुरुज आणि तटबंदी. तिकडचे दरवाजे आयताकृती आहेत. आणि आकाराने छोटे आहेत.

DSC_0137

मोठमोठ्या दगडाचा बुरुज म्हणून जबरदस्त उपयोग केला आहे आणि त्यावर तटबंदी बांधून त्याला मजबुती दिली आहे. हे दगड खरच अतिशय मोठे आहेत आणि त्यावर बांधलेली तटबंदी आजही अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे.

DSC_0136

आता इथून लवकरात-लवकर गोजऱ्याकड जायचं होते, अंधार पडत होता आणि वाटही व्यवस्थित नव्हती आमची हुशारी म्हणजे दोन्ही किल्ल्यावर आम्ही पाठीमागच्या बाजूने जात होतो त्यामुळे नित रस्ता नव्हता. त्यात RK, कुलदीप, सावंत रस्ता चुकले…. ए ओ …ए ओ …ए ओ … असे आवाज आम्ही देत होतो पण यांच काय उत्तर येत नव्हत. मग आम्ही एका टेकडावर बसून आवाज देवू लागलो, थोड्या वेळाने यांचा आवाज आला मग म्हणल आता जरा पाणी पिऊ आणि निघू. त्यात सावंत माहित नाही कुठे घासला होता आणि त्याच्या डोक्याला दगड का काटा काहीतरी वरबडल होत.

DSC_0145

सावंतच्या डोक्याला झालेली दुखापत ……

FB_IMG_1456916000355

अंधार पडेल म्हणून पटापटा आम्ही गडाकडे जात होतो, पुढे गेलो तर तटबंदी दिसली पण वरती कस जायचे हे काय समजत नव्हत, भाऊ इकडे तिकडे बघत होते, कुठेतरी दरवाजा असेल या अपेक्षेने शोध घेत होते, पण काही मार्ग सापडत नव्हता, भाऊ म्हणाले चला पुन्हा एकदा सर्कस करत जायचे आहे. पण इथे जरा प्रकार वेगळा होता. तटबंदीची उंची जरा जास्तच होती पण त्यला चिकटलेले झाड होते त्यामुळे फांदी धरून वरती चढता येत होते पण हे जरा अवघड होत. अंधार पडत होता आणि ही तटबंदी पुढे उभा होती आता काय पर्याय नव्हता इथून चढूनच जावे लागणार यावर शिक्कामोर्बत भाऊंनी केले आणि पुन्हा एकदा तटबंदीवरची कसरत सुरु झाली. आमचे ऐरावत साहेब म्हणजे कुलदीप भाऊ झाडात घुसले आणि थोड्यावेळासाठी अडकून बसले, नंतर त्यांनी सांगितले की पायाला गोळा आला होता म्हणून गपगुमान बसलो होतो.

आता शेवटी मी आणि बोम्बल्या …. बोम्बल्या भाऊला म्हणल तुम्ही व्हा पुढ मी मागण टेकू देतो पहिल्यांदा पवार साहेबांचा शक्तिमान झाला म्हणजे वर जावून फांदीला लोंबकळू लागले, परत खाली येवून पुन्हा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला आणि वरती पोहचले. शेवटी मी पण आपल सगळी टाकत लावून वर चढलो आणि भाऊंना म्हणल तुम्हाला गडाचा मागचा भाग का आवडतो राव …. आता हे असल काय नको …. लय फाटली …..

तटबंदीवरची कसरत संपवून आम्ही पुढे गडावर गेलो, अतिशय काटेरी झाड आहेत या गडावर. पावला-पावलाला एक काटा घुसणार अशी वाट आहे. अंधार पडला होता ब्याटऱ्या आम्हाला वाट दाखवत होत्या, एका ठिकाणी गेलो जिथे नंतर कुणीतरी एक छोटस मंदिर बांधले आहे, तिथून मग जरा वाट अडचणीची होती. पुढे गेलो तर कुलदीपला पायाला गोळा आला म्हणून त्याने परत त्या मंदिराजवळ जायचा निर्णय घेतला RK आणि वाघमारे साहेबांनी त्याला तिथे सोडले आणि पुन्हा परत आले. किर्र अंधार होता काटेरी झाड आणि गवत त्यामुळे वाट काय नीट दिसत नव्हती काहीठिकाणी एकदम बारीक वाट एकीकडे काटेरी झाड आणि दुसरीकडे दरी अतिशय काळजीपूर्वक चालायचे होते. एकमेकाला सांभाळून आम्ही पुढे जात राहिलो आणि गडाच्या मुख्य दरवाज्याजवळ पोहचलो. खूप पडझड झाली आहे दरवाज्याची पण तिथे जे काही होते ते पाहून पूर्ण कंटाळा गेला आणि तिथेपर्यंत गेल्याचे सार्थक झाले. दरवाज्याच्या आतल्याबाजूला एका खांबावर महाराजांचे शिल्प कोरले आहे. ज्याचा शोध आमच्या भाऊ मराठा आणि अनिकेत वाघ यांनी लावला आजवर कोणालाही ते दिसले नव्हते आणि ते सहजासहजी दिसण्यासारखे नाही सुद्धा.

IMG-20160302-WA0014

बोम्बल्याने जोरदार गारद दिली, काय माहित या गडाने किती वर्षानंतर महाराजांचा जल्लोष ऐकला. महाराजांचे शिल्प पाहून सगळे एकदम ताजेतवाने झाले. मनामध्ये असंख्य आठवणी घेवून आम्ही तिथून परतीचा मार्ग धरला. पुन्हा सगळे कुलदीपजवळ आलो तिथे काहीकाळ बसून गप्पा-गोष्टी झाल्या. खाजगी ट्रेकिंग संस्थेतर्फे मी भाऊ मराठा यांचे आभार मानले कारण त्यांच्यामुळेच आम्ही हे किल्ले पाहू शकलो कारण इथे वाट सापडणे खूप अवघड आहे. भरपूर गप्पा मारल्या, भाऊ त्यांचे अनुभव सांगत होते. रात्रीची वेळ होती कुणीही गडावर नव्हते. मस्त वारा वाहत होता, गडावरून सुवर्ण मंदिर आणि शहराचा देखावा खूपच सुंदर दिसत होता.

बोम्बल्या मला प्रोत्साहित करत होता कारण डोक एवढ भयानक दुकत होत की इचारू नका …. वेल्लोर मध्ये थांबून सकाळी जिंजीला जायचे का रात्रीच जायचे यावर चर्चा चालू होती … स्गेवती रात्रीच जिंजीला जायचे ठरले … आता खाली उतरणे ही एक मोठ्ठी बाब होती कारण वाट काय दिसत नव्हती आणि सरळ उतार होता. बारीक दगड आणि माती त्यामुळे घसरगुंडी होणार हे लक्ष्यात आले होते.

इथे खरी परीक्षा होती टी सावंतची, कारण हा हाडाचा भुईकोट ट्रेकर आणि आता हा असला उतार, बोम्बल्या आणि नाईकवडी सावंतला घेवून हळू-हळू गड उतरत होते …. किमान ४ वेळा सावंत घसरून पडला … सावंतच्या नितंबानी खूपच त्रास सोसला …. त्याच्या नादात नाईकवडी पण एकदा घसरला. अशा रीतीने हळू-हळू आम्ही गड उतरून खाली आलो. खाली आलो तर आमची गाडी दुसऱ्याठिकाणी होती. भाऊ आणि रवी यांना रीक्ष्याने गाडीजवळ पाठवायचे ठरवले आणि आम्ही सगळे तिथेच थांबलो.

रिक्षा शोधत होतो तर एक काकू रिक्षा घेवून आल्या … ५० का ७० यावर १० मिनिटे वाद घालत होतो पण काकू काय ऐकत नव्हत्या … या १० मिनिटात काकुनी अंदाजे २० वेळा मला विचारले ..”मिल्ट्री म्याना” ??
मी म्हणल हा हा हा मिल्ट्री म्याना …. काकू आम्हा प्रत्येकाला खालपासून वरपर्यंत बघत होती … दोघेही रिक्षात बसले … काकूंना मध्ये कोल्डड्रिंक प्यायची इच्छा झाली म्हणून त्यांनी मध्येच रिक्षा थांबवून कोल्डड्रिंक घेतली आमची लोकं आपली गप रिक्षात बसून होती …. लय डेंजर काकू होती.

आता पुढे आम्हाला जिंजीला जायचे होते आणि तिथे मुक्काम करून सकाळी सकाळी जिंजीचे किल्ले पहायचे होते …. वाटेत एका ठिकाणी जेवण करून आम्ही जिंजीला पोचलो … २ रूम्स घेतल्या आणि सगळे उताणे झालो.

क्रमश:

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

2 comments on “जिंजी – भाग २Add yours →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *