इंदोरचे होळकर राजघराणे हे मराठेशाहीतील एक सुविख्यात राजघराणे. होळकर हे नामाभिधान सुभेदार मल्हारबांपासून पडले असावे. अर्थात हे वंशनाम “होळ” या ग्रामनामावरून पडले असावे असे सांगितले जाते. होळ नावाची महाराष्ट्रात तीन गावे आहेत. एक पुणे जिल्ह्याच्या भीमथडी तालुक्यात, दुसरे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात, आणि तिसरे सातारा जिल्हातील फलटण तालुक्यात. यापैकी पुणे जिल्ह्याच्या निराकाठजवळ जेजुरी जवळील “होळ” (मुरूम) येथे मल्हारबांचा जन्म झाल्याने या वंशास “होळकर” असे नाव पडले गेलायचे सांगितले जाते.
मल्हारबांचा जन्म १६९३ मध्ये रामनवमीला झाला. खंडूजी होळकर हे मल्हारी मार्तंडाचे अनन्यसाधारण भक्त होते म्हणून पुत्राचे नाव मल्हारी ठेवण्यात आले हा पुत्र मल्हारी पुढे जाऊन मल्हारराव व आपल्या शौर्याने माळव्याचा सुभेदार बनला.
माळव्यात मराठ्यांचा अंमल बसविण्याकरिता आणि त्याहून म्हत्वाचे कारण म्हणजे चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याकरिता पेशवे बाजीराव यांनी मल्हारबांना ऑक्टोबर १७२८ च्या सुमारास रवाना केले. मल्हारबांसोबत बाजी भीमराव, पिलाजीराव जाधव, राणोजी शिंदे व आनंदराव पवार ही मात्तबर सरदार मंडळी होती. ६ ऑगस्ट १७२७ रोजी पेशव्यांनी मल्हारबांच्या सरंजामासाठी ४ गुजरातेत, ६ माळव्यात व १ खानदेश असे दहा जिल्ह्यांचे उत्पन्न लावून दिले. मल्हारबा सरंजामदार बनल्यानंतर जेजुरीच्या खंडोबाची कृपा झाली असे त्यांना वाटू लागले, जेजुरी येथील शंकरभट तानभट खाडे यांची १० जुलै १७२९ रोजी त्यांनी तीर्थोपाध्ये म्हणून नेमणूक केली. जेजुरी येथील मल्हारी मार्तंडाच्या किल्याच्या बांधकामाची सुरवात मल्हारबांनी लागलीच केली. पुढे जाऊन २२ जुलै १७३२ मध्ये मल्हारबांना माळव्यातील बराचसा मुलुख नेमून दिला गेला.
खाजगी “जहागीर” (जागीर) मल्हारबांना बाजीरावांकडून फौजेच्या खर्चासाठी सरंजाम म्हणून माळव्यातील महाल मिळाल्याबरोबर मल्हारबांनी , “माझी सेवा लक्षात घेऊन माझ्या पत्नीला गौतमाबाईंना खाजगी जहागीर (जागीर) देण्यात यावी अशी विनंती केली. छत्रपती शौ महाराजांच्या आज्ञेने २० जानेवारी १७३४ मध्ये बाजीरावांनी मल्हारबांना लिहून कळिवले की यानंतर “खाजगी” व “दौलत” वेगळे राहतील. “खाजगी व दौलत असे दोन्ही पृथक पथक कायम करून तुमचे कुटुंब सौ. गौतमाबाई नावे इनाम घेऊन सनद व वरचे पाठविली आहेत” असे त्या पात्रात नमूद आहे.
या सनदेवरून २० जानेवारी १७३४ मध्ये होळकर घराण्यात “खाजगी” अस्तित्वात आली. त्यावेळी खाजगीमध्ये जवळ-जवळ १० ते १५ गावांचा समावेश होता जायचे उत्पन्न २,९९,०१० इतके होते ……. मल्हारबांचा दूरदृष्टीपणा इथे लोकधात घेणे महत्वाचे आहे, नियमाने घराण्यातील जो कोणी पुरुष असेल त्याची मुख्य पत्नीच खाजगीच वारस होत असे. यामुळे कुटुंबास राज्यकारभारात प्रवेश मिळावा, राज्यकारभाराचे शिक्षण सहज मिळावे हा यामागील हेतू होता. याहून महत्वाची बाब म्हणजे जर का दौलतीस पैशाची आवश्यकता भासली तर पत्नीच्या संमतीने खाजगीतला पैसा दौलतीच्या कामास वापरला जाता येत होता. अर्थात मल्हारबांनी “खाजगी” जहागीर प्राप्त करून राजकीय दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या बळकटी प्राप्त करून घेतली.
खाजगीच हा मान लाभला तो फक्त होळकरांना. यावरून बाजीराव पेशवे व शाहू महाराज हे मल्हारबांच्या कामगिरीवर बेहद खुश होते याची जाणीव होते. पुढे जाऊन निजामाविरुद्ध झालेल्या लढाईत मल्हारबांनी उत्तम कामगिरी केली व त्यांचा सरंजाम वाढवून त्यांचा गौरव करण्यात आला.
____________________________________________________________________________________________________________________________________
मल्हारबा आणि पेशवे बाजीराव :
======================
होळकर उदयाला आले तो काळ अत्यंत अंधाधुंदीचा होता.परंतु काळाचा प्रभाव मोठा असूनसुद्धा त्या-त्या काळाला अनुरूप निर्णय घेऊन जे भविष्याची जडण-घडण करतात टाच असामान्य ठरतात.१६९७ च्या आसपास मल्हारबा आपल्या मामाकडे (भोजराज बारगळ) आले होते. बारगळ हे बंड्याचे सरदार होते आणि मल्हारबा बारगळांसोबत होते त्यामुळे वयाच्या १४-१५ वर्षापासूनच मल्हारबांचे सैनिकी जीवन सुरु झाले होते. बाजीरावांनी मल्हारबांना आपल्या सेवेत मागून घेतले ते बारगळांकडेच. मल्हारबांनीसुद्धा आपले शे-दीडशे स्वारांचे स्वतंत्र पथक बनवले होते. मल्हारबांच्या माळव्यावर १७१८ पूर्वीपासूनच स्वतंत्र स्वाऱ्या होत असत. बाजीरावांची भेट होण्याआधीपासून मल्हारबांचा डंका माळव्यात वाजत होता. मल्हारबांचा इंदोरच्या नंदलाल मंडलोई या जमीनदाराशी झालेला पत्रव्यवहार उपलब्ध आहे ज्यावरून मल्हारबांचा त्या भागातील दरारा स्पष्ट होतो. जर भविष्यात उत्तरेत बस्तान मांडायचे असेल तर मल्हारबांसारखा दूरदृष्टी असणारा मुत्सद्दी सेनानी बरोबर असणे हे फायद्याचेच होईल अन्यथा मल्हारबा स्वतहा उत्तरेत स्वतंत्र बस्तान मांडतील हा विचार बाजीरावांसारख्या मात्तबर पेशव्यांच्या मनात न येणे हे अस्वाभाविक आहे. अत्रेंनी बालाजी विशवनाथ यांच्या उत्तरेतील स्वारीमध्ये मल्हारबा स्वतंत्र पथके म्हणून सामील झाले होते हे जे मांडले आहे तो बरोबर आहे असे येथे दिसते.
१७२० ते १७२१ च्या दरम्यान मल्हारबा आपल्या फौजेच्या उदरनिर्वाहासाठी बढवणीच्या संस्थानिकाकडे गेले व त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेतली. पेशव्यांनी बढवणीला वेढा घातला असता दीड हजार सेनेनीशी मल्हारबांनी पेशव्यांच्या सैन्यांचा धुव्वा उडवला. शेवटी बाजीरावांनी मल्हारबांना पत्र पाठवून उभयपक्षी तहाची मुख्यतारी मल्हारबांना दिली. मल्हारबांनी तसा तह करून घेतला व पेशव्यांच्या फौजेची रवानगी केली. परंतु रियासतीत जी माहिती मिळते ती वेगळी आहे :- “कदम बांडे व बाजीराव यांच्या फौजांची एकदा कलागत लागली असता, ती मल्हारबांनी मिटवली. त्यावरून बाजीरावांनी त्यांना बांड्यांपासून १७२१ मध्ये आपणाकडे मागवून घेतले.परंतु याचा एकही संदर्भ रियासतकारांनी दिलेला नाही. पण याला छेद देणारे पत्र दिले आहे जायची तारीख उपलब्द नाही यावरून ज्याववेली बढवणीच्या संस्थानाबरोबर तह करून दिल्यानंतर पेशव्यांनी मल्हारबांना स्वराज्याचे सरदार व्हावे हे सुचवल्यानंतरचे हे पत्र असावे असे म्हणता येते. उभयपक्षी करारानंतर सुद्धा मल्हारबा १७२५ पर्यंत माळव्यात स्वतंत्रपणे आपल्या सैन्यासह वावरत होते व माळव्यातील अनेक प्रांत जिंकत होते. मल्हारबांच्या या मुत्सद्दीपणामुळे व किर्तीमुळे बाजीरावांना मल्हारबांना स्वराज्यात घेणेच फायद्याचे आहे असे वाटणे स्वाभाविक होते कारण असे नसते झाले तर पुढचा उत्तरेतला धोका त्यांना दिसत होता.
मल्हारबांनी त्यांच्या हयातीत एकूण ५२ लढाया केल्या ज्यामध्ये डभईचा संग्राम जो दाभाडे आणि मराठ्यांच्यात झाला जायचे नेतृत्व बाजीराव पेशवे करत होते. या लढाईमध्ये दाभाड्यांना निजाम आणि बंगश मदत करणार होते. हे पाहता बाजीरावांनी निजाम आणि बंगश यांना रोखण्याची जबाबदारी मल्हारबांकडे दिली. मल्हारबांनी बंगश आणि निजामाला तीन महिने बेजार करून सोडले त्यामुळे त्यांना दाभाडेंच्या मदतीला जाता आले नाही. आणि यामुळे डभईचे यश बाजीराव पेशव्यांच्या पदरी पडले. दयाबहादूर वरील स्वारी व विजय ही मल्हारबांच्या जीवनातील महत्वाची घटना होय या युद्धामध्ये मल्हारबांनी केलेला पराक्रम आणि राजकीय डावपेच यामुळे त्यांनी दयाबहादूरचा संपूर्ण पराभव केला ज्यामध्ये तो मारला गेला. या विजयामुळे मराठे मावळात शिरले आणि बाजीरावांची आणि शाहूंची मल्हारबांवरील मर्जी अजून वाढली.
इतिहासातील प्रसिद्ध अशी लढाई म्हणजे बुंदेलखंड वाचवण्यासाठीची लढाई महंमदखान बंगश हा बुंदेलखंडवर स्वारी करणार हे समजताच राजा छत्रसाल यांनी शाहू महाराजांकडे शिवाजी महाराजननी केलेल्या वाचनाची आठवण करून देत मदत मागितली. मदतीच्या विनंतीचे पत्र पोहचताच शाहूमहाराजांनी बाजीरावांना बुंदेलखंडाच्या मदतीस जाण्याची आज्ञा केली. बाजीराव माळव्यात दाखल झाले जिथे त्यांची भेट मल्हारबांसोबत झाली आणि संयुक्त फौजा बुंदेलखंडाकडे चालून गेल्या. या युद्धात मराठ्यांचा विजय झाला आणि बुंदेलखंड वाचले. मल्हारबा आणि बाजीराव यांच्यात खूप जिव्हाळ्याचा व आदरयुक्त मैत्रीचा संबंध होता. शिंदे-होळकर उत्तरेत धुमाकूळ घालून खंडणी मिळवत असता बाजीरावांनी त्यांना पत्र पाठवले व कळविले की छत्रपतींच्या आज्ञेवरून मी सिद्धीवर स्वारी करण्यास जात आहे. इकडे पैशाची फार अडचण आहे. तुम्ही उत्तरेत बादशाही मुलखात स्वाऱ्या करून खंडणी मिळवावी व आम्हास जरूर पैशाचा पुरवठा करावा. शिंदे-होळकरांच्या भीतीपोटी कित्येक वेळा अनेक बादशाही सरदारांनी तहाची बोलणी केली परंतु श्रीमंतांशी बोलणी केल्याविना ते कोणताही तह करत नसत जरी खाजगीतला फायदा कितीका असेना. लढाया चालू असताना मल्हारबा खंडणी गोळा करण्यात अजिबात आळस करत नव्हते व लुटीचा व खंडणीचा गडगंज ऐवज बाजीरावांकडे पाठवत असत.
मल्हारबांनी अनेक युद्धे पहिली. हजारोवेळा सेनेस इकडून तिकडे हालिवले आणि लाखोगणती रुपयांची दौलतीची व खाजगीची तिजोरी भरली आणि राजकारणाचे नाजूक धागेदोरे उकलीले. माल्कम त्यांच्याविषयी म्हणतो, “लौकिक मिळवून चाळीस वर्षे अधिक त्यांनी सैन्याच्या अधिपत्यात घालवली. ते आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस तर मराठ्यांच्या जुटीत अग्रगण्य संमेलनात होते यात संशय नाही. साध्या गृहस्थी चालीविषयी, धैर्याविषयी मराठे लोक त्याजहून दुसऱ्यास विशेष गणित नाही.
मल्हारबांच्या जीवनातील चढ-उतार, यश-अपयश पहिले तरी या सर्व गोष्टी खर्चाकडे टाकूनसुद्धा एक उत्तम शिपाई, युक्तीवान सेनापती, उत्कृष्ट राजसेवक व उदार प्रजापालक असेच शेवटी बेरजेत उत्तर येईल.
शेवटी मल्हारबांना मनाचा मुजरा !!!
0 comments on “सुभेदार “मल्हारराव होळकर” : मराठा साम्राज्याच्या उत्तरेचा अजिंक्य बुरुज” Add yours →