विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय आणि श्रीलंका
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आमचे जरा पाय अडकले आणि इतर कोणाचाही इतिहास आम्हा मराठी मनाला स्पर्श करू शकला नाही. त्यामुळेच कदाचित भारताच्या इतिहासातील अनेक पैलू आम्हाला माहीत नाहीत. मग तो गुरू गोविंदसिहांचा असो वा महाराणा प्रतापांचा असो वा आपल्या शेजारील राज्याचा म्हणजे कर्नाटकाचा असो. दक्षिणेतील इतिहास आम्हाला जेवढा शिवाजी महाराजांशी निगडित आहेत तेवढाच कदाचित माहीत असेल. मराठी मन शिवरायांच्या बाहेर जाऊन विचार करू शकलं नाही कदाचित ते लोकांनी स्वीकारले नसते या भीतीने किंवा मग इतिहासकार किंवा इतिहासप्रेमी म्हणून शिवरायांच्यापेक्षा मात्तबर व्यक्तीमत्व दुसरं नाही जे महाराष्ट्रात आपणाला रातोरात सुपरस्टार बनवेल याची काळजी असावीच.
असो … बाहुबली सिनेमा पाहताना नक्कीच आपल्या देशात असे एक ठिकाण आहे ज्याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते ठिकाण म्हणजे “हम्पी”. ज्याला विजयनगरचे साम्राज्य असे म्हणले जाई. १४व्या शतकात ही महासत्ता उभी राहिली जी हळूहळू वाढत गेली, समृद्ध झाली व सोळाव्या शतकाच्या मध्यानंतर एका जबरदस्त परकीय हादऱ्याने ती संपली. त्यावेळी ती पूर्ण नामशेष नक्कीच झाली नाही परंतु पुन्हा कधीच उठू शकणार नाही अशी कोसळली. आज २०१७ साली सुद्धा या साम्राज्याचे अवशेष पाहताना अंगावर काटा येतो आणि आपण एका वेगळ्याच दिशेने कल्पना करत जातो आणि आपल्या तोंडातून एकच वाक्य येते,
“इतक्या वर्षानंतरही हे असे आहे मग त्यावेळी याचे वैभव काय असेल?”.
साधारण २०० वर्षांच्या या विजयनगरच्या इतिहासात अनेक घडामोडी आहेत ज्या आपल्या देशाच्या महान इतिहासाची आठवण करून देतात बहुदा अभिमानाने छाती फुगावी असाच इतिहास या साम्राज्याचा आहे. या साम्राज्याची स्थापना इ.स. १३३६ च्या आसपास झाली. यामध्ये एक सम्राट जो अनेक अंगांनी यशस्वी ठरला तो म्हणजे “सम्राट कृष्णदेवराय ज्यांचा कार्यकाळ इ.स. १५१० ते इ.स. १५२९ हा आहे. यांचा बऱ्यापैकी कार्यकाळ इस्लामी सत्तेशी लढण्यात गेला. पण एवढाच काय तो इतिहास सम्राट कृष्णदेवराय यांच्याशी निगडित नाही. त्यांचा कार्यकाळ अनेक घटनांनी भरला आहे. त्यातील एक घटना म्हणजे,
“कृष्णदेवराय आणि श्रीलंका”.
__________________________________________________________________________
विजयनगरच्या श्रीलंकेवर अनेक स्वाऱ्या झालेल्या होत्या. कृष्णदेवराय यांच्यापुर्वी इ.स. १३८५ मध्ये आणि इ.स. १४४३ मध्ये तरी नक्कीच झाल्यात ज्याचे उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये व शिलालेखामध्ये आहेत. श्रीलंकेकडून विजयनगर खंडणी वसूल करायचे अशीही हकीकत आहे. यावर जास्त काही माहिती मिळत नाही परंतु जे तत्कालीन साहित्य आणि शिलालेख उपलब्द आहेत त्यावरून श्रीलंका बेटावर काही भारतीय राजांनी अधिपत्य गाजवले आहे हे नक्कीच सिद्ध होते.
सम्राट कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीतील विजयनगर आणि श्रीलंका ह्यांच्यातील राजकारणातील काही माहिती उपलब्द आहे ज्याला तत्कालीन पुरावे आहेत. इ.स. १५२१ च्या सुमारास पोर्तुगीजांनी श्रीलंकेवर हल्ला केला होता. त्यावेळी श्रीलंकेचा राजा सातवा “विजयबाहु” ह्याने झामोरिन जो सम्राट कृष्णदेवरायचा मंडलिक म्हणून तिकडे होता याच्याकडे मदत मागितली. पोर्तुगीजांना हे बेट घेणे जमले नाही परंतु ह्याचवेळी श्रीलंकेच्या राजघराण्यात कौटुंबिक बंड झाले आणि विजयबाहुचा एक मुलगा व दोन पुतणे त्याच्या विरुद्ध उठले. त्यांनी विजयबाहुला पदच्युत करून राज्याचे तीन भाग केले. पुढे जाऊन या तिघांमध्ये वैर निर्माण होऊ लागले आणि त्यामुळे रयतेत बंडाळ्या माजल्या हे पाहून सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयबाहुचा मुलगा भुवनैकबाहू यास गादीवर बसवले व एकट्याची स्थिर सत्ता प्रस्थापित करून चांगली व्यवस्था बांधून दिली.
श्रीलंकेप्रमाणे पेगु वगैरे बंगालच्या उपसागराकडील ब्रह्मदेशाच्या (म्यानमार) भागातील काही राज्यांकडून विजयनगरला खंडणी मिळायच्या अशा तत्कालीन साहित्यात नमूद आहे. हे सर्व अभ्यासताना एक प्रश्न असाही पडतो की, सम्राट कृष्णदेवराय यांच्याकडे एवढे सुसज्ज आरमार होते काय? यावर एकही तत्कालीन पुरावा दिसतं नाही किंवा सापडले नसावेत ( विजयनगर साम्राज्याच्या इतिहासाचे बहुतांश पुरावे हे कन्नड, तामिळ, तेलगू, मल्ल्याळम या भाषेत आहेत जे आजवर मराठी इतिहासकारांना अभ्यासणे जमले नाही ).
परंतु इ.स. १५०६ मधील एक नोंद मिळते व इ.स. १५१० मधील एक घटना आहे जी यासंदर्भात गृहीत धरल्या जाऊ शकतात.
घटना अशी,
“पश्चिम किनाऱ्यावरील गोव्याच्या दक्षिणेस गोव्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर होनावर हे एक विजयनगर राज्यातले बंदर असून तो एक प्रांतही होता. ( जर विजयनगर राज्यातले बंदर असेल तर विजयनगरकडे सुसज्ज आरमार असणे हे मानावे लागेल). तेथील मंडलेश्वर तिमोज ह्याच्यावर गोव्यावर स्वारी करण्याची कायमची जबाबदारी सोपवली होती. (एका बंदरावरून जर गोव्यावर स्वारी करायची झाली तर ती नौसेनेशिवाय कसे शक्य होईल?).
विजयनगरचा पुष्कळ मोठा इतिहास आहे, तो राजकीय तर आहेच आणि तेवढाच सांस्कृतिकसुद्धा आहे. तो इतिहास घडवणाऱ्या अनेक कर्तुत्वसंपन्न व्यक्तींपैकी एक म्हणजे सम्राट कृष्णदेवराय. चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून ते सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत विजयनगरच्या अनेक सम्राटांनी अनेक क्षेत्रात या देशाला बरेच काही दिले आहे.
आणि या गौरवशाली इतिहासाची माहिती आपणास असायलाच हवी.
__________________________________________________________________________
संदर्भ: “विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय”.
लेखक: सदाशिव आठवले, श्रीविध्या प्रकाशन.
__________________________________________________________________________
1 no