रविवारच्या सुट्टीचा इतिहास
आठवडाभर राबराब राबायच, सकाळी लेकरू उठायच्या आधी कामावर जायचं आणि लेकरू झोपक्यावर घराकडं यायचं. झोपलेल्या लेकराला मांडीवर घेऊन त्याचं चार मटा मटा मुकं घ्यायच आणि त्याच्या डोसक्यावरुन प्रेमानं हात फिरवत झोपायच. कधी एकदा रविवार येतो आणि मी माझ्या लेकराला बागेत फिरायला घेऊन जाईन त्याला गारेगार खायला घालणं आणि लेकराला गाड्यावर पावभाजी खायला घालून त्याच्याबरोबर जरा वेळ घालवणं. मालकीण सकाळच्या जेवणाच्या डब्यापासनं ते राच्याच्या जेवणापर्यंत न थांबता संसाराचा गाडा ढकलत असत्या एखादा दिवस तीलाबी यातन सुट्टी देऊन आराम द्यावा अशी सर्वसाधारण मराठी मनाची इच्छा (माझ्यासारख्या गरीबाची तर लै).
हा रविवार म्हणजे आपला ऑक्सिजन. संपूर्ण आठवड्याची थकावट हा रविवार दूर करतो. पण हा रविवार नेमका कसा आपल्या पदरी पडला त्यासाठी कोणी किती संघर्ष केला. आपल्यासारख्या कामगार लोकांसाठी एक दिवस सुट्टी मिळावी म्हणून आपले संपूर्ण जीवन कोणी खर्ची केले हे आपणास माहीत असायलाच पाहिजे.
आज इथे मी महाराष्ट्राचे शिल्पकार आणि कामगार संघटनेचे पाहिले नेते ज्यांनी साप्ताहिक सुट्टी ही शासकीय सहमतीने अंमलात आणि श्री. नारायण मेघाजी लोखंडे. यांची संक्षिप्त स्वरूपात माहिती मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
________________________________________________
“यज्ञी ज्यांनी देऊनी निजशिर घडीले मानवतेचे मंदिर,
परी जयाच्या दफणभूमीवर नाही चिरा नाही पणती ||”.
मुंबईसारख्या महानगरामध्ये ज्यांनी कामगारांसाठी मोठी चळवळ उभी करून त्यांच्या हक्कांसाठी पूर्ण जीवन खर्ची केले असे ना. मे. लोखंडे यांच्यासाठी या काव्यपंक्तीतील आशय तंतोतंत लागू पडतो. या थोर व्यक्तीची त्यांच्या मुंबई या कर्मभूमीत अगर अन्यत्र नावनिशाणीसुद्धा नसावी हे पाहून मनाला वेदना नक्कीच होतात.
________________________________________________
कोण होते नारायण मेघाजी लोखंडे ?
नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म १८४८ मध्ये झाला. काहींच्या मते त्यांचा जन्म पुणे जिल्याच्या सासवड मध्ये झाला असावा. यामध्ये थोर चारीतरलेखक धनंजय कीर यांचेही असेच मत आहे. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण ठाण्यात झाले आणि पुढे उदरनिर्वाहासाठी मुंबई येथे भायखळा भागात आले व तिथेच ते राहिले. पण दुर्दैव असे की अशा थोर सत्यशोधकाची माहिती ना त्यांनी स्वतः लिहून ठेवली ना अन्य कोणी लिहिली. नारायण मेघाजी लोखंडे यांना रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे असेही संबोधले जाते. स्वतःच्या चांगल्या नोकरीला लाथ मारून आपले सर्व कुटुंब उपासमारीने होरपळणार आहे हे स्पष्ट दिसत असताना, देशातील लक्षावधी स्त्री-पुरुष कामगारांचे संसार फुलवण्याचे व्रत हयातभर स्वीकारले. गिरणीमालकांच्या दृष्टीने स्वामीद्रोह आणि ब्रिटिश सरकारच्या दृष्टीने राजद्रोह म्हणून केव्हाही काहीही घडण्याची शक्यता असताना श्री. लोखंडे यांनी सत्यशोधक समाजाच्या कावड झेंड्याखाली कामगारांना एकत्र आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आणि महात्मा जोतिबा फुले यांची प्रेरणा घेऊन त्यांनी मुंबईमध्ये “बॉम्बे मिलहॅन्डस असोसिएशन” ही भारतातील पहिली कामगारांची संघटना स्थापन केली. १० जून १८९० साली देशात प्रथमच कामगारांना गिरणी मालकाकडून साप्ताहिक सुट्टी मंजूर करून घेतली. हा दिवस म्हणजे भारतातील कामगार चळवळीच्या इतिहासातील सुवर्ण दिवस होय.
________________________________________________
“मुकी बिचारी कुणी हाका” अशी आपल्या बिचाऱ्या गरीब कामगारांची स्थिती त्यावेळी होती. रात्रंदिवस काम करून घ्यायचा आणि त्याबदल्यात अतिशय किरकोळ पगार द्यायचा आणि एक दिवसाची सुद्धा।विश्रांती नाही, ना कोणत्या आरोग्यविषयक सोयी नाहीत. मरेपतोर काम आणि मिळेल तेवढा मोबदला घेऊन गपगुमान जगावं लागत असे.
१८७५ मध्ये भारतातील काही महत्वपूर्ण शहरांमध्ये मिळून ५४ गिरण्या चालू होत्या. मुंबईमध्ये हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला होता आणि त्याचबरोबर कामगारवर्ग सुद्धा वाढत चालला होता. ‘दिनबंधूं’ च्या १८९५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अंकात श्री. लोखंडे यांनी गिरण्यात काम करणाऱ्या स्त्रिया आणि बालकामगार यांची संख्या देऊन त्यांच्याकडुन किती काम करून घेतले जाते याची तपशीलवार माहिती प्रसिद्ध केली होती. गिरण्यात काम करणाऱ्या बायकांचा आकडा २५,६८८ इतका होता आणि त्यांच्याकडून सुमारे ९ ते १० तास काम करून घेतले जाई. सुमारे ६,४२४ बालकामगार होते (मुले आणि मुली) ज्यांच्याकडून ७ तास काम करून घेतले जाई. काही गिरण्या सकाळी ५ वाजता सुरू होत आणि संध्याकाळी ५ वाजता बंद होत. एखादा कामगार पाच-दहा मिनिटे उशिरा आला की त्याला दंड होत असे. आजारी असल्यामुळे।नाही आला तर त्याचा पगार कापला जाई. दीर्घ आजार असला की पैसा नाही म्हणून वाणी धान्य व किराणा देत नसे आणि दिले तर पुढच्यावेळी व्याजासकट तो वसूल करी.
________________________________________________
१८८४ साली लोखंडे यांनी कामगारांची जाहीर सभा घेतली व कामगारांच्या वतीने त्यांच्या मागण्या सादर करणारा जाहीरनामा फॅक्टरी कमिशनला सादर केला. १८९० मध्ये त्यांनी “बॉम्बे मिलहॅन्डस असोसिएशन” ही संघटना स्थपन केली ज्यामध्ये अनेक नामवंत मंडळी होती. यामध्ये रघु भिकाजी, गणू बाबाजी, नारायण सुर्कोजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे व नारायणराव पवार इत्यादी मंडळी होती.
१८८४ मध्ये श्री. लोखंडे यांनी २३ आणि २६ सप्टेंबरमध्ये दोन सभा घेतल्या आणि पाच प्रमुख मागण्या सरकारपुढे ठेवल्या,
१) कामाचे तास कमी करावेत
२) सर्व कामगारांना आठवड्यातून एक सुट्टी मिळावी.
३) जेवणासाठी किमान अर्ध्या तासाची सुट्टी मिळावी.
४) कामगारांना पगार वेळेवर व्हावा. किमान मागील महिन्याचा पगार पुढील महिन्याच्या १५ तारखेच्या आत व्हावा.
५) अपघातात सापडलेल्या कामगाराला नुकसानभरपाई व रजेचा पगार मिळावा. मृत्यू झाल्यास कुटुंबाला पेन्शन देण्यात यावी.
पुढे २४ एप्रिल १८९० साली महालक्ष्मी रेसकोर्सवर श्री. लोखंडे यांनी मोठी सभा झाली. यामध्ये कामगारांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळावी अशी जोरदार मागणी करण्यात आली.
“शेवटी १० जून १८९० रोजी रविवार हा सुट्टीचा दिवस म्हणून घोषित करण्यात आला”. हा कामगारांचा व श्री. लोखंडे यांचा मोठा विजय होता.
________________________________________________
१८९५ साली श्री. लोखंडे यांनी सरकारने “रावबहादूर” ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. असा हा भारतीय कामगार चळवळीचा जनक ९ फेब्रुवारी १८९७ रोजी प्लेगच्या साथीत आकस्मितपणे वयाच्या ४९व्या वर्षी मरण पावला.
अशा या महान सत्यशोधक व्यक्तिमत्वाची संपूर्ण भारतीयाने आठवण जपली पाहिजे आणि त्यांचा इतिहास आज जगापुढे आणला पाहिजे.
________________________________________________
संदर्भ:
१) महाराष्ट्राचे शिल्पकार नारायण मेघाजी लोखंडे
लेखक: प्राचार्य डॉ. मा. गो. माळी.
२)१९व्या शतकातील महाराष्ट्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
________________________________________________
प्रशांतजी सप्रेम नमस्कार! तुमचा मी शतशः आभारी आहे.नारायण मेघाजी लोखंडे ज्यांच्या अथक परिश्रमाने आणि प्रयत्नाने भारत वर्षात ब्रिटिश राजवटीत “रविवार” ची सुट्टी मिळविण्याचे अवघड काम केले हा इतिहास जवळपास कोणा कामगार/ लिपिक/ अधिकारी यांना माहीत असेल कि नाही हि मनात शंका येते! मला काही वर्षांपूर्वी थोडी माहिती होती.आपण यावर Goole वर टाकल्याने आनंद झाला.धन्यवाद.मी ७० वर्षांचा श्री गोंदवलेकर महाराज यांचा अनुयायी आहे.जास्तीत जास्त तरुण वर्गाला हे कळविण्याचा प्रयत्न करेन! पुनःश्च धन्यवाद! श्रीराम
Thank you Sir