सर्व प्रथम तुम्हा वाचकांचे मी आभार मानतो, कारण वेळात वेळ काढून माळवा भटकंतीचा दुसरा भाग वाचण्यासाठी तुम्ही इथे आलात. पहिल्या भागात मी पुण्यापासून इंदोरपर्यंतच्या प्रवासाचे वर्णन केले. २५ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता आम्ही पुणे सोडले होते आणि २६ तारखेला सकाळी ९च्या दरम्यान आम्ही इंदोरमध्ये पोहचलो.
*****
आम्ही बापट चौरहावरती काळे काकांची वाट पाहत होतो. २६ जानेवारीनिमित्त शहरामध्ये चौका-चौकात कार्यक्रम साजरे होत होते. इंदोरमध्ये अति-उत्साही जनता आहे, हे त्यांच्या कार्यक्रमांमधून दिसत होते. मोठमोठे स्टेज, विविध उपक्रम, मस्तपैकी गाणी … लै भारी एकदम. आम्ही जिथे थांबलो होतो तिथे एक माणूस स्टेजवर मस्त पैकी एक देशभक्तीवर आधारित गाणे म्हणत होता परंतु त्याला अल्ताफ राजाच्या गाण्याची चाल होती. एवढं भारी होते ना ते … काय इचारू नका … आम्ही लगेच फेसबुक लाईव्हवरून त्यांच्या त्या जबरदस्त कलाकृतीची झलक सर्व मित्रांपर्यंत पोहचवली. सायकलीवर झेंडे वगैरे विकणारी माणसं….
अतिशय उत्साही आणि दिलखुष करून टाकणारे वातावरण संपूर्ण शहरात दिसत होते. एवढे असतानाही शहर मात्र अतिशय स्वच्छ. २०१७ सालचे देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून “इंदोर” शहराला अवॉर्ड मिळाला आहे. प्रामाणिकपणे सांगतो … रस्त्यावर कुठे कागदाचा तुकडा सुद्धा दिसत नव्हता. पाऊला-पाऊलावर कचऱ्याचे डब्बे, शोचालये इत्यादींची व्यवस्था होती. इंदोरची जनता सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे आपले शहर स्वच्छ ठेवते, ते ही तितकेच खरे.
थोड्यावेळात काळे काका तिथे आले आणि त्यांच्या गाडीच्या मागे-मागे आम्ही आमची गाडी लावली. चौकातून अगदी हाकेच्या अंतरावरच त्यांचे घर होते. पण मस्तपैकी गल्ली-बोळातून, आजूबाजूला उभ्या असलेल्या टू-व्हीलरच्या मधून वाट काढत-काढत आम्ही काळे काकांच्या घरी पोचलो. काळे काकांचा मोठा बंगला, ग्राउंड फ्लोवरला एक रूम आणि किचन जे भाड्याने देण्यासाठी होते जे रिकामी होते. त्यांनी मस्तपैकी गाद्या टाकून ठेवल्या होत्या, आणि एकदम जाडजूड रजया होत्या. इंदोरमध्ये भयंकर थंडी त्यामुळे गादी आणि रजया जशा आम्ही बघितल्या तसे घापकन रजईत घुसलो. मी मनीषाला म्हणले ..
“मनीषा तु आणि शिवबा अंघोळ करून घ्या मग आम्ही करतो … तोवर आम्ही झोपतो…”
शिऱ्या मला म्हणतो …
“पाटील वाहिनी आणि शिवबाचे झाले की तुम्ही अंघोळ करून घ्या, मी कालच केली आहे … मला फक्त आंघोळीसाठी उठवू नका…”.
पण, काळे काका म्हणजे लै निबार माणूस … आम्हाला आंघोळ केल्याशिवाय ते काय सोडणार नव्हते हे नक्की होते. मला आणि शिऱ्याला आजिबात इच्छा नव्हती पण काळे काका सारखे खाली येऊन … गरम पाणी काढले आहे चला आंघोळ करून घ्या मग नाष्टा करून फिरायला जावा … आंघोळ काय चुकवता येणार नाही हे आमच्या लक्षात आले. पण मनीषा आणि शिवबाचं आवरू पर्यंत एक डुलकी शक्य होती.
*****
तासाभरात सगळ्यांच्या आंघोळी झाल्या. शिऱ्या अंघोळ करून सुद्धा फ्रेश दिसत नव्हता कारण आंघोळ न केल्यावर तो जेवढा फ्रेश दिसतो तेवढा केल्यावर दिसत नाही असे तो म्हणतो… त्याचा तो लहानपणापासूनचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. काकूंनी मस्तपैकी पोहे, गुलाबजामून असा नाष्टा आम्हाला दिला. काळे काकांसोबत गप्पा मारत नाष्टा करत होतो. इंदोरमध्ये काय-काय पहायचं ते सांगत होते. आता गाडी घेऊन इंदोरमध्ये फिरायचं, रस्ते विचारा, पार्किंगचा प्रॉब्लेम यात खूप वेळ जाणार म्हणून शिक्षा करावी असे आमचे ठरले. काकांनी त्यांचाच एक पुतण्या आहे सुनील काळे जो रिक्षा चालवतो, त्याला फोन करून बोलवून घेतले. आता तो जवळचा माणूस आणि नक्की काय-काय आणि कसे पहायचे हे त्याला एकदम रास्त माहित होते. त्यामुळे आमचा प्रॉब्लेम मिटला होता. इंदोरमध्ये स्वतःची गाडी घेऊन फिरायला हरकत नाही परंतु रस्ते शोधणे, पार्किंगसाठी मारामारी यापेक्षा रिक्षा करून शहर फिरणे हे कधीपण फायद्याचे. अर्ध्या-एक तासात सुनील आला. काकांनी त्याला कुठे-कुठे फिरायचं ही ठिकाण लिहायला सांगितली आणि त्यानुसार नियोजन करायला सुनीलला सांगितले. सगळी महत्वाची ठिकाण दाखव असे काकांनी त्याला सांगितले.
झालं मग … नाष्टा-पाणी आवरून आम्ही रिक्षामधून निघालो, शिवबा हौसेने पुढे बसला होता. रिक्षात बसल्यावर हळूच आपलं बायकोबरोबर एक सेल्फी काढला, शिवबा आम्हाला दोघांना सेल्फी काढू देत नाय, जरी काढला तर हळूच मोबाईल घेऊन फोटो डिलीट करतंय कडू.
सुरवात आम्ही होळकर वाड्यापासून केली. शहराच्या मध्यभागी असलेला हा वाढा म्हणजे मुगल, मराठा आणि फ्रेंच बांधकाम कलेचे एक उत्तम उदाहरण आहे. भव्य असा लाकडी दरवाजा, दगडी बांधकाम, राजमाता अहिल्यादेवी यांच्या काळातील देवघर व त्या देवघरा मध्ये त्या वापरत असलेले शिवलिंग,सभा-मंडप आदि पहावयास मिळते. २६ जानेवारी सुट्टी असल्याने वाडा बंद होता पण मागील बाजूने एक दरवाजा आहे जिथून लोक जात होती. होळकरांच्या सर्व पिढ्यांची माहिती असणारी फोटो आणि एक सुंदर असे मंदिर वाड्यामध्ये आहे.
तसा मी हा वाढा २०१३ साली पहिला होता. भोपाळला एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा इंदोरला खास हा वाडा पाहण्यासाठी गेलो होतो. वाड्यातून बाहेर पडून आम्ही आजूबाजूला असणारे मार्केट फिरत होतो. बोम्बल्याने सांगितले होते की तिथे कपडे खूप स्वस्त भेटतात. म्हणून आपलं फिरत होतो. मार्केट फिरून मग बाजूलाच दोन छत्र्या आहेत. एक आहे ती महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पत्नी कृष्णाबाई आणि महाराजा तुकोजीराव द्वितीय आणि त्यांचे पुत्र शिवाजीराव होळकर. समाध्या आणि स्मारके कशी असावीत आणि ती कशी ठेवावीत हे मध्यप्रदेशात पहायला मिळते. मार्केट फिरत होतो मला माझा आवडता आयटम म्हणजे गळ्यात अडकवायचा स्टोल ते बी प्लेन कलरमध्ये पाहिजे होता. मग जिथे कुठे प्लेन कलरवाला स्टोल मिळेल ते आम्ही घेत होतो. एका खादी-भांडार मध्ये गेलो तिथे मस्त पैकी कुर्ते घेतले. ५०० रुपयाला एक कुर्ता होता पुण्याहून नक्कीच स्वस्त होता आणि दर्जेदार. फिरत फिरत शिवबाला दोन पॅन्ट घेतल्या. एक दुकान होते जिथे तिरंग्याची डिजाईन असलेल्या बऱ्याच काही वस्तू भेटत होत्या, परंतु एकदम खादीमध्ये बनवलेला तिरंगा इतका भारी होता की काय सांगू, आणि किंमत फक्त ३० रुपये म्हणून मग ते ४ घेतले. मार्केटला राऊंड मांडून आम्ही छत्र्यांजवळ गेलो जिथे आमची रिक्षा उभी होती.
आता गंमत बघा कशी असते, मी आणि मनीषा कृष्णाबाई होळकर यांची छत्री पाहत होतो. तिथे चार माणसं आली जी तिथलीच होती. त्यातल्या एकाने दुसऱ्याला विचारले की …
“हे किसकी छत्री हे” …
भाऊंनी उत्तर दिले …
“यशवंतराव होलकर नामक एक महान इतिहासकार थे जिन्होने होलकरोंका इतिहास लिखा उनकी पत्नी अहिल्यादेवी थी और ये उनका स्मारक हे” …..
अर्रर्रर्रर्रा म्हंटल … इथं भी हायत उच्चशिक्षित मंडळी …. त्यास्नी मी बोलावलं आणि मग ती छत्री कोणाची… यशवंतराव होळकर कोण… अहिल्यादेवी होळकर कोण याची जरा माहिती दिली … मग म्हणत्यात … अच्छा अच्छा ऐसा हे क्या … म्हंटल बर झाले राजेनरेश जाधवराव इथं नाहीत, नाहीतर तुमास्नी येडं करून ठेवलं असत.
जरा वाईस भूक लागली होती म्हणलं जेवण करायला अजून वेळ आहे म्हणून दोन पिरू घेऊन आम्ही खाल्लो. आता आम्ही काच महल पाहायला निघालो. गेलो तर एवढं काय ते भारी नव्हतं … पण तिथले रखवालदार काय इचारू नका…. आता फोटो काढायचे नाहीत असे लिहिले होते आणि आम्हाला फोटो काढण्यात काही इंटरेस्ट पण नव्हता पण फोन आला की उचलायचा नाय व्हय ? शिऱ्याला फोन आला त्याने उचलला तर ते म्हातारं उगाचच बोंबलायला लागलं … तिथे एक बेंच होता त्यावर बसलो तर मला म्हणतंय “उठो उठो … ये बैठने के लयी नही हे” … म्हणलं फिर किसके लिये हे ….. उग वाकडं बघत होतं म्हतार … म्हणलं चला उग इथं लफडं नको…. वयाच्या मानाने म्हतार लैच आक्रमक दिसत होतं … आता स्वभाव होता का फ्रस्टरेशन हे माहित नाही. तिथून मग आम्ही वैष्णवीदेवीच्या मंदिरात गेलो. आता हा प्रकार सगळा शीख लोकांचा …. लै भारी इन्व्हेस्टमेंट करून ठेवली आहे त्यांनी जिथून टोलेजंग मिळकत होते. उत्तरेत जे वैष्णवीमताचे मंदिर आहे, म्हणजे एकदम ते गुहा वगैरे … सेम च्या सेम तसे बनवले आहे. अंगावर कातड्याच काय घालायचं नाय … मोबाईल मधून फोटो काढायचे नाहीत … असे ढिगभर नियम होते. बर असू दे हो … एक नियम तर जगावेगळा होता ….आत जाताना घंटा वाजवायची म्हणजे वाजवायची …. मनीषा विसरली तर ते सरदार काका म्हणतंय
“मंदिर में जाणे से पहिले घंटा बजाना जरुरी हे, माता के लिये इतना भी नही कर सकते क्या ?”
आता हाय का हे लफडं … आणि मातेच्या मूर्तीपर्यंत जाईपर्यंत ते गुहा वगैरे लै डेंजर काम होतं ते …. टाईमपास करायचा असेल तर मग इथे नक्की जावा.
आता इथून आम्हाला पुरातत्व संग्रहालय बघायचे होते. मग रिक्षा आमची तिकडे वळवली. १५ मिनिटात तिथे पोहचलो. गेटवर आम्हाला त्यांनी सोडले आणि आत चालत चालत चाललो. गेटमधून दोनचाकी जाऊ शकते पण मोठ्या गाड्यांना परवानगी नव्हती. आम्ही आता जाताना एक बाई गाडी आत घेण्याचा प्रयत्न करत होती आणि नवरा बघत होता बहुतेक त्या दोघांचं काहीतरी भांडण झाले होते आणि त्या टेन्शन मध्ये तिची गाडी गेटमध्ये अडकत होती आणि पुढे जाईना झाली होती आणि सगळी लोकं पाठीमागे उभी होती. मी आपलं मागे धरून गाडी जरा उचलून डावीकडे सरकवली मग काकू पुढे गेल्या. चालत चालत आत गेलो तर पुरातत्व संग्रहालय बंद होतं. आता म्हणलं जरा झाडाखाली बसू. तिथे सगळी लोक एकदम उत्साहाने येत होती आणि बंद आहे हे पाहून त्वांड वाकड करून जात होती.
नेहमीप्रमाणे शिऱ्याला इथे UPSC लेव्हलचे प्रश्न सतावत होते … इथे जी कोणी बाई किंवा मुलगी येईल ती एवढी भयंकर नटून यायची की काय सांगू नका … गंध-पावडर, लाली, एकदम कपड्यांना मॅचिंग सॅन्डल …. काय नव्हच ….शिऱ्याला प्रश्न पडत होता की ह्या बाया एवढं नटून का येत असत्याल … आणि दे दाणा दन सेल्फया …. लै मजा …. हसून हसून मारायचं बाकी होतं फक्त.
*****
एक दोन ग्रंथालयात जायचं होत पण सुट्टीचा दिवस होता आणि सगळी ग्रंथालये बंद होती त्यामुळे ते सर्व कॅन्सल केले. अजून एक दोन मंदिरे होती पण आता मंदिरं तेवढी नको म्हणलं. आता सरळ सराफा बाजार मध्ये जायचं होत. पंकज झरेकर ने तिथे न जाता आला की पुण्याचे दरवाजे उघडले जाणार नाहीत अशी तंबी दिली होती, बोम्बल्याने सुद्धा तिथे जाऊन मनसोक्त हादडून या असे सांगितले होते. अनेकांनी या खाऊ गल्लीबद्दल सांगितले होते म्हणून आता तिकडे जायचं ठरवले.
गेलो तर मूलकाची गर्दी … त्यात सुट्टीचा दिवस …. सराफा बाजार मध्ये वीकडेजला दिवसा खाण्याची दुकान बंद असतात आणि ते रात्री ९ नंतर उघडतात आणि वीकेंडला मात्र दिवसभर उघडी असतात. पण २६ सुट्टीचा दिवस होता त्यामुळे दिवसभर दुकान उघडी होती. हॉट-डॉग बद्दल लै ऐकलं होतं म्हणून ते खाल्लं … चांगलं होतं … पण भाऊ…. गोड-धोड खाण्याचे तिथली लोकं लै शोकीन … एवढे दुधाचे पदार्थ होते की काय सांगू … आपल्याला ‘कलाकंद’ लै आवडलं म्हणून एक-दोन वाट्या खाल्ल्या. भूकपण लागली होती आणि गोड, तिखट सगळंच पुढे होते …. पोटभरून खाल्ले.
आता बोंबीने सांगितले होते की लेडीज आणि लहान मुलांचे कपडे सुंदर आणि होलसेल दरात मिळतात … सराफा मार्केट क्रॉस करून पुढे गेले की सगळं कपड्याचा मार्केट लागते जिथे होलसेल दरात कपडे मिळतात … मनाबाईला दोनचार ड्रेस घ्यावे म्हणून आम्ही तिकडे गेलो. जाम खाल्लं होतं, चालायची काय इच्छा नव्हती, एकदम लोडेड ट्रकसारखं झालं होतं पण आता काय म्हणलं चला… जरा चाललं की खाल्यालं पचेल तर …. गेलो सगळी दुकानं फिरत होतो, एका दुकानात गेलो … मनीषाला म्हणलं तू बघ आणि जे आवडेल ते घे आम्ही जरा बसतो…. मनीषा ड्रेस मटेरियल बघत होती आणि ते दुकानंदार माझ्याकडं बघून म्हणतंय आप रजनीकांत जैसे दुखते हो….. हाय का आता …. मनीषा म्हणली ती जनावरासारखी दाढी ठेवल्या म्हणून धोनीचा रजनीकांत झाला…. आग जाऊ दे म्हणलं काय आता …. तू ड्रेस घे … दाढीच आपण घरी गेल्यावर बोलू.
मध्यप्रदेशात एक अडचण लै मोठी …. फार कमी ठिकाणी कार्ड स्वपिंगची व्यवस्था आहे. सगळी लोकं कॅश पायजे म्हणत्यात … अगदी मांडू, महेश्वर सगळीकडे हीच बोंबाबोंब. मग मी आणि शिऱ्या ATM शोधत फिरत होतो, शेवटी एक ATM सापडलं, पैसे काढले आणि मग ड्रेस घेऊन नीट रिक्षाकडे गेलो. त्याला म्हणलं भाऊ आता सरळ घराकडं चल … लै झोप आल्या. आता घरी काळे काका आमची वाट पाहत होते … आमची इच्छा होती की त्यांना जेवणाचा त्रास नको म्हणून आम्ही खाऊनच निघालो होतो…. म्हणून मी त्यांना निघताना सुद्धा फोन करून सांगितले की … काका आम्ही जेवण करून आलो आहे, आमचे जेवण नका करू…. काका आपलं हो..हो म्हणले आणि घरी गेलो तर त्यांनी जोरदार तयारी केली होती…. डालबाटीच नियोजन होतं. वरती टेरेसवर मस्त पैकी शेकोटी लावून त्यात काकू ते कणकीचे गोळे भाजत होत्या आमी आपलं गप्पा मारत बसलो होतो…. मस्त पैकी डालबाटी खाल्ली आणि नीट आडवे झालो… सकाळी लवकर उठून मांडू किल्ला पाहून महेश्वरला मुक्कामाला जायचं होतं….
क्रमश:
Post Views:
646
0 comments on “माळवा भटकंती: भाग – २” Add yours →